Next
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण
मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटरचे बुधवारी उद्घाटन
BOI
Tuesday, January 15, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत बोलताना (डावीकडून) डॉ. सुषमा चोरडिया, डॉ. संजय चोरडिया, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. मानसी जाधव, डॉ. सुप्रिया गुगळे.

पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे. बुधवारी, १६ जानेवारी २०१९ रोजी दुपारी २.३० वाजता संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये मुक्ता पुणतांबेकर ‘व्यसनाधीनता आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत,’ अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी मंगळवारी, १५ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. मानसी जाधव, डॉ. सुप्रिया गुगळे उपस्थित होते.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘लहानांपासून मोठ्यांपर्यंत व्यसनांचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत. तंबाखू, दारू, गुटखा, जंक फूडचे सेवन, सोशल माध्यमांचा अतिवापर, स्क्रीनचे व्यसन यासह मनातील वाईट विचार, सायबर गुन्हेगारीला बळी पडणे, त्यातून निर्माण होणारा ताण-तणाव, नात्यांमधील दुरावा अशा अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ, मार्गदर्शकांना बोलावून त्यामार्फत विद्यार्थी-शिक्षक आणि पालक यांच्या मनाची मशागत करून सदृढ, सुंदर मन घडविण्याचा आमचा मानस आहे. लोकांनी एकमेकांशी चांगले वागावे, संवाद ठेवावा, यासाठी नीतिमूल्यांची शिकवण दिली जाणार असून, त्याची सुरुवात सूर्यदत्ता ग्रुपच्या विद्यार्थी-शिक्षकांपासून केली जाणार आहे. त्यानंतर ही चळवळ देशव्यापी केली जाणार आहे.’

‘दत्ता कोहिनकर, संप्रसाद विनोद, विश्वास नांगरे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना बोलावले जाणार आहे. सूर्यदत्ता ग्रुपसोबतच इतर शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये मान्यवरांची सत्रे आयोजिली जाणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यामध्ये जोडून घेण्यात येत आहेत. ‘मनाच्या अंतर्गत सुंदरतेसाठी जागे होऊया’ हा संदेश घेऊन हे केंद्र कार्यरत राहणार आहे. केवळ व्यसनमुक्ती करणे हा केंद्राचा उद्देश नाही, तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ न देण्याची, दुसऱ्याबद्दल प्रेमभावना जोपासण्याची शिकवण या केंद्रामार्फत दिली जाणार आहे. या केंद्रामार्फत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माहितीसाठी लवकरच अॅप विकसित करण्यात येणार आहे,’ असे डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.


डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, ‘खाण्याच्या बदलत्या शैलीमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. अति खाणे, अति सेवन करणे यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या केंद्राच्या माध्यमातून योग्य आहार आणि दिनचर्येचे नियोजन या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.’

डॉ. मानसी जाधव यांनीही दातांचे आरोग्य आणि त्यासंबंधित घ्यावयाची काळजी या विषयी सांगितले. डॉ. सुप्रिया गुगळे यांनीही या उपक्रमात आयुर्वेदाचा उपयोग करून घेण्याविषयी तसेच शरीर आणि मनाचा समतोल साधण्यासाठी नियमित योग आणि प्राणायाम कसा गरजेचा आहे, या विषयी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link