Next
माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, June 04, 2018 | 02:07 PM
15 0 0
Share this story

माधव गडकरी यांच्याविषयी समग्र माहिती देणाऱ्या   संकेतस्थळाचे उद्घाटन करताना कुंदाताई गडकरी, डॉ. शिरीष यंदे व मानसी यंदे

पुणे  : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक माधव गडकरी यांच्याविषयी समग्र माहिती देणारे, www.madhavgadkari.com  हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन कुंदाताई गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. शिरीष यंदे, मानसी यंदे, ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर, पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार अनिल टाकळकर, पुण्यनगरीचे संपादकीय सल्लागार अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

या संकेतस्थळाची निर्मिती मानसी यंदे यांची असून, रचना मंदार वैद्य यांनी, तर संहिता शरदचंद्र पानसे यांनी केली आहे. संकेतस्थळाच्या अनावरणाप्रसंगी गडकरी यांच्या कारकीर्दीचा आढावा संकेतस्थळाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. या संकेतस्थळावर माधवरावांचा जीवनालेख, त्यांचे विचार, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांना प्राप्त झालेले विविध सन्मान, दुर्मीळ छायाचित्रे,तसेच त्यांच्या विविध भाषणांची दृकश्राव्य झलक अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या वेळी माधव गडकरी यांचे कुटुंबीय व सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

डॉ. शिरीष यंदे म्हणाले, ‘माधव गडकरी हे एक झुंजार व्यक्तिमत्त्व होते, हे जरी आजच्या पिढीने लक्षात ठेवले तरी आमचा उद्देश सफल होईल.’ ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर म्हणाले, ‘ त्यांच्या सहवासात मी बरेच काही शिकलो. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे खुल्या स्वभावाचे आणि समाजाभिमुख होते. एकट्याच्या बळावर कार्य तडीस नेण्याची त्यांची क्षमता होती. ते एक दूरदर्शी नेते होते. ते कधीच कोणापुढे झुकले नाहीत; पण त्यांनी केलेल्या उपक्रमांची नोंद झालेली नाही. या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांचे कार्य नव्या पिढीपुढे ठेवल्याबद्दल मी मानसी आणि शिरीष यंदे यांचे आभार मानतो.’

पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार अनिल टाकळकर म्हणाले, ‘माधव गडकरी हे मनाने कायम तरुण आणि सहृदय संपादक होते. त्यांनी काळाच्या पुढे नेणारे लेखन केले. या लेखनाचे पुस्तक व्हायला हवे. लोकांच्या प्रश्नांविषयी जागरूक राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका असायची.’

ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर म्हणाले, ‘माधव गडकरी यांची प्रतिभा सहज फुलणारी होती. त्यांचे अग्रलेखही खूप गाजले होते. स्वतःसोबतच आपल्या सहकाऱ्यांना मोठे होण्यासाठीही त्यांनी नेहमीच मदत केली. माणसांबद्दल त्यांना अत्यंत आपुलकी होती व जीवनप्रवासात त्यांनी अनेक माणसे जोडली.’

पुण्यनगरीचे संपादकीय सल्लागार अरुण खोरे म्हणाले, ‘पत्रकारितेच्या क्षेत्रात आता व्यावसायिक संबंध असले, तरी पूर्वी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असायचे. माधव गडकरींनी मला नेहमी वडिलांसारखे मार्गदर्शन केले. सामाजिक चळवळींना आणि उपक्रमांना मदत करण्याची त्यांची मनापासून इच्छा असायची.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरीष यंदे यांनी, तर आभारप्रदर्शन मानसी यंदे यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link