Next
कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे
BOI
Saturday, August 03, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ या सदराच्या गेल्या भागात आपण ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आदी परिसरातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे...
............
कल्याण म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. कल्याण हे पुरातन काळापासून पैठणकडे जाणाऱ्या नाणेघाट मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण होते. बहामनी राज्याच्या स्थापनेनंतर कल्याण बहामनी राज्यात समाविष्ट झालॆ. बहामनी राजवटीची शकले उडाल्यानंतर निजामशाही सुलतान अहमदशहा (पहिला) याने कल्याण आणि इतर मुलुख जिंकून घेतला. नंतरच्या काळात विजापूरचा आदिलशहा व मुघल यांनी निजामशाहीविरुद्ध संयुक्तपणे आक्रमण करून निजामशाही संपवली आणि कल्याण बंदर आदिलशहाच्या ताब्यात गेले. याच आदिलशहाचा कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला होता. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये कल्याणचे स्थानही महत्त्वाचे होते. ब्रिटिश काळात उत्तर व दक्षिणेच्या भागात जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे कल्याण हे महत्त्वाचे जंक्शन झाले व ते महत्त्व आजमितीलाही टिकून आहे. या भागात विस्तारणाऱ्या औद्योगिक क्षेत्रांमुळे मुंबईखालोखाल हा परिसर बहुभाषक होत चालला आहे. कल्याण व डोंबिवली या दोन शहरांची मिळून महानगरपालिका सन १९८२मध्ये अस्तित्वात आली. 

दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवीचे मंदिर (फोटो सौजन्य : kalyancity.blogspot.com)

कल्याण :
नावाप्रमाणे येथे येणाऱ्या सगळ्यांचे कल्याण करणारे हे गाव ऐतिहासिक काळापासूनचे एक प्रसिद्ध बंदर होते. उल्हास नदीच्या खाडीतीरावर असलेले एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून याला कुशाण–सातवाहन काळात महत्त्व होते. येथून रोमपर्यंत व्यापारी संपर्क होता. गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाच्या शासन काळात कल्याणचा रहिवासी आनंदपुत्र उपासक अपरेणू याने कान्हेरी येथे लेणी व मंडपदान दिल्याचा शिलालेख उपलब्ध आहे. कल्याण येथील संपन्न व्यापारी मोठ्या प्रमाणात दानधर्म करत असे, हे कान्हेरी व जुन्नर येथील शिलालेखात दिसून येते. वेणहुनंदि व विष्णूनंदी (पिता) यांच्या कुटुंबीयांनी, तसेच सुवर्णकार ‘स्वामीदत्त’(शिवमित्र) यांनीही देणगी दिल्याचे उल्लेख सापडतात. 

दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी (फोटो सौजन्य : kalyancity.blogspot.com)

सातवाहन काळात या भागात बौद्ध धर्मास मोठा आश्रय होता. तसेच वैदिक धर्मालाही महत्त्व वाढू लागले होते, हे नाणेघाट येथील शिलालेखांतून दिसून येते. व्यापाऱ्यांनी स्तूप, चैत्य, या परिसरातील जलकुंड, बसण्यासाठीचे बाक, पथ यांच्या निर्मितीसाठी दान दिलेले दिसून येते. कल्याणलगत असलेल्या गंधारिका (गांधारी) भागात निवास व भोजन चतुःशाला यांसाठीही दान दिल्याची नोंद आढळते. यामुळे कल्याण परिसराच्या वैभवाची साक्ष मिळते. 

दुर्गाडी किल्ल्यावरील मशीद (फोटो सौजन्य : kalyancity.blogspot.com)

दुर्गाडी किल्ला :
कल्याण शहर, उल्हास नदी-खाडीकिनारी वसलेले आहे. वसईपासून आलेल्या उल्हास नदीच्या खाडीतून फार पूर्वीपासून जलवाहतूक चालू होती. कल्याण भागाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी घेतला. त्याच वेळी कल्याणबरोबर भिवंडीही ताब्यात घेतली. येथील स्थानमहत्त्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे एका टेकडीवर किल्ला बांधायचे आदेश दिले. आबाजी महादेवांना येथे किल्ला बांधण्यासाठी अगोदर पाया खोदताना अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाले, ही दुर्गेचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले आणि दुर्गादेवीचे मंदिर बांधले.

दुर्गाडी किल्ला

दुर्गाडी किल्ल्याजवळच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी स्वराज्याची पहिली गोदी निर्माण केली. यासाठी त्यांनी पोर्तुगीज तंत्रज्ञ नेमले होते. समुद्रापासून आतील बाजूस आरमारी तळ निर्माण करण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याची ओळख होते. पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या अस्तित्वामुळे त्यांनी आरमाराची आवश्यकता जाणली आणि पोर्तुगीज, इंग्रज व सिद्दी यांच्यावर वचक बसविला. या गोष्टीमुळे कल्याणला महाराष्ट्राच्या इतिहासात अधिक महत्त्व आले. या किल्ल्यावरून उल्हास नदीच्या खाडीचे लांबपर्यंत दर्शन होते. त्यामुळे टेहळणी करण्यास हा किल्ला उपयुक्त होता. या गोदीतून लढाऊ जहाजांची निर्मिती करण्यात आली. 

मंदिर, ईदगाह आणि बुरुज यांच्यापलीकडे या किल्ल्यावर बघण्यासारखे काहीही नसले, तरी ही गोदी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील स्वकीयांनी निर्माण केलेली पहिली आरमारी गोदी होती. किल्ल्यावरील दुर्गादेवीचे दर्शन घेतल्याशिवाय कल्याणची भेट पूर्ण होत नाही. देवीच्या दर्शनासाठी येथे सतत भाविकांची रांग लागलेली असते. 

श्री विष्णूश्री विष्णू मंदिर : पूर्वी कल्याण परिसरात असलेला शेणाळे तलाव, दुर्गाडी किल्ल्यालगतचा जलाशय व सुभाष मैदानाच्या जागी असलेला लेंडी तलाव पूर्ण नष्ट झाला. आता फक्त काळा तलाव शिल्लक राहिला आहे. लेंडी तलावामध्ये १०० वर्षांपूर्वी एक विष्णुमूर्ती सापडली. गुजराती समाजाने मंदिर बांधून या मूर्तीची स्थापना केली. तसेच जेथे मूर्ती सापडली, तेथे चौथरा उभारून तेथे पादुका स्थापन करण्यात आल्या. या ठिकाणी पूर्वीपासून असलेला वटवृक्ष पूजनीय मनाला जातो. ही मूर्ती इसवी सन ५००मधील असावी असे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे १५०० वर्षांपूर्वीपासून या ठिकाणचे अस्तित्व आहे. शंख, चक्र, गदा धारण केलेली, साडेपाच फूट उंच समचरण असलेली ही सुंदर मूर्ती पूर्णाकार आहे. मूर्तीला प्रभावळ असून, विष्णुमूर्तीच्या हाती असलेली गदा ही कौमोदकी या नावाने ओळखली जाते. ही मूर्ती चतुर्भुज असून, तिच्या वरच्या हातात चक्र धारण केले आहे. कमरेवर असलेल्या हातात शंख धारण केला आहे. वरचा हात आशीर्वाद देणारा आहे. एका हातात मुद्गलासारखी गदा आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला गदादेवी व डाव्या बाजूला आयुधपुरुष (शंखपुरुष) आहे. डॉ. जामखेडकर यांच्या मते ही ‘कल्च्युरी’ कलाशैलीतील मूर्ती आहे. येथे सर्व धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. 

काळा तलाव

काळा तलाव :
कल्याणमधील जुने तलाव नष्ट झाल्याने अस्तित्वात असलेल्या काळ्या तलावाचे सौंदर्य टिकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही झाले आहे. हा तलाव कल्याणकरांचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. तलावाजवळ मुलांसाठी बगीच्यामध्ये विविध खेळ असल्याने बच्चेकंपनीची गर्दी असते. तलावामध्ये बोटिंगची व्यवस्था आहे. 

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्टेशन १८८७मध्ये अस्तित्वात आले. दिवा व कल्याण यांच्यामध्ये डोंबिवली स्टेशन आहे. येथे ब्रिटिशांनी सन १९२०मध्ये मॅरहॅम वसाहतीची स्थापना केली आणि मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गाला या नव्या वसाहतीत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. तुर्भे बंदरानजीकच्या माहूल गावात इ. स. ११५६चा एक शिलालेख सापडला आहे. त्यात ‘डोंबल वाटिका’ असा उल्लेख आढळतो. परंतु त्याबाबत अनेक मतभेद आहेत. मुंबईत राहणारे अनेक लोक आपल्या चाळीतील खोल्या सोडून विकसकाकडून पैसे घेऊन येथे स्थलांतरित झाले. दादर-गिरगावमधील एक-दोन खोल्यांच्या बदल्यात डोंबिवली-कल्याण-बदलापूरला प्रशस्त फ्लॅट मिळतो हे त्या वेळचे गणित होते. त्या वेळी मिळालेल्या पैशांतून डोंबिवलीमध्ये हक्काचे घर मिळून वर पैसेही शिल्लक राहत होते. त्यामुळे अनेकांनी डोंबिवली गाठली. बघता बघता डोंबिवली हे पांढरपेशांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. आता मात्र परिस्थिती बदलू लागली आहे. औद्योगिकरण येथेही टेकले आहे. साहजिकच त्याचा परिणाम म्हणून हे ठिकाण बहुभाषक होत चालले आहे. कल्याण-डोंबिवली या शहरांची महानगरपालिका एक आहे.

श्री गणेश

गणेश मंदिर :
डोंबिवलीतील लोकांचे श्रद्धास्थान असलेले हे डोंबिवलीचे ग्रामदैवत असून, मंदिराला ९६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मंदिर विश्वस्तांच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. १९१५च्या सुमारास डोंबिवलीत नव्यानेच राहायला आलेल्या मध्यमवर्गीय नोकरदार लोकांच्या सहभागातून हे मंदिर उभारले गेले. वसाहत नवीन होती व आपल्या राहण्याच्या जागेजवळ एखादे मंदिर असावे अशी रहिवाशांची सर्वसाधारण भावना असते. त्यातूनच या मंदिराची कल्पना पुढे आली. यासाठी कै. ढेकणे व कै. बक्षी यांनी ९४ व ९५ क्रमांकाचे प्लॉट वाजवी किमतीत मंदिरासाठी दिले. कै. त्र्यं. रा. गाडगीळ, कै. शंकरराव दातार, कै. न. ग. अभ्यंकर, कै. नारायणराव गोरे, कै. शंकरराव लिखिते, कै. गोविंद सीताराम जोशी, कै. केशवराव कानिटकर इत्यादी मंडळींच्या परिश्रमातून हे मंदिर साकारले. वैशाख वद्य चतुर्थी शके १८४६ (२९ मे १९२४) या दिवशी श्री गणपती, श्री शंकर, श्री मारुती, श्री पार्वती व महालक्ष्मी या देवतांची प्राणप्रतिष्ठा या मंदिरात समारंभापूर्वक करण्यात आली. 

श्री गणेश मंदिर संस्थान

दोन-दोन रुपये वर्गणी काढून ही संस्था उभारण्यात आली. अंबुताई गोडबोले या मंदिराच्या पहिल्या पुजारी होत्या. पुढे १९३३ साली कै. रावसाहेब आठवले यांनी त्यांचे वडील ब्रह्मीभूत स्वामी आनंदयती यांच्या स्मरणार्थ त्यांची समाधी बांधून त्यावर स्वखर्चाने मंदिर बांधून दिले. ही सर्व मंडळी सरकारी कार्यालयात नोकरी करणारी होती. सुमारे वीस वर्षे मंदिराचे सरपंच असणारे कै. शंकर वामन उर्फ दादासाहेब दातार हे मध्य रेल्वेमध्ये ‘चीफ इंजिनीअर ऑफिस’मध्ये हेडक्लार्क म्हणून कामाला होते. त्यांचा डोंबिवलीच्या अनेक सामाजिक कार्यांत सहभाग असायचा. सर्वसामान्य लोकसहभागातून हे मंदिर उभे राहिले, ही एक महत्त्वाची बाब आहे. नुसते मंदिर बांधून ही मंडळी थांबली नाहीत, तर सार्वजनिक उपक्रमांमध्येही मंदिर व्यवस्थापन अग्रेसर राहिले. 

डोंबिवली परिसरातील शालेय व महाविद्यालयीन गरजू, हुशार व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीपोटी या संस्थानाने आतापर्यंत एकंदर कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्त्या दिल्या आहेत. मंदिरातर्फे सकाळी योगवर्ग, सायंकाळी तत्त्वज्ञान, ज्योतिष, संस्कृत, तसेच गीतापठणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दैनंदिन उपक्रम, विशेष कार्यक्रम याचबरोबर ‘ग्रामदैवत’ या त्रैमासिकाद्वारे आध्यात्मिक विषयांची ओळख, दैनंदिन महत्त्वाचे कार्यक्रम, व्यक्तिगत विकासासाठी आवश्यक माहिती देण्यात येते. मंदिर विश्वस्त मंडळातर्फे वैद्यकीय मदतही पुरविली जाते. तसेच रक्तदान शिबिरही भरविले जाते. संस्थांनमार्फत श्री गणेश अल्ट्रासोनोग्राफी सेंटर चालविले जाते. तेथे अत्यंत वाजवी शुल्कात विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात. डॉ. भावना थोरात या केंद्रास सहकार्य करत असतात. 

श्री क्षेत्र भोपर

श्री क्षेत्र भोपर :
डोंबिवलीमध्ये ऐतिहासिक असे काही नाही; पण कोणत्याही गावामध्ये लोकसहभागातून किंवा एखाद्या भक्ताच्या प्रेरणेतून नवीन मंदिरे उभी राहतात, अशी काही ठिकाणे डोंबिवलीत आहेत त्यापैकी श्री क्षेत्र भोपर. येथे संध्याताई अमृते यांच्या प्रयत्नांतून मयूरेश्वराचे मंदिर उभे राहिले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या मंदिरात गणेशभक्तांना समाधान मिळते.

श्री समर्थ स्वामी मठश्री समर्थ स्वामी मठ : १९८२मध्ये डोंबिवली येथील सद्गुरू अण्णा लिमये आणि सौ. लिमये आणि समर्थ सेवा मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांसह एक बैठक घेऊन श्री समर्थ स्वामी धार्मिक व आध्यात्मिक केंद्र स्थापन करण्याचे योजण्यात आले. १९८४मध्ये विश्वस्त मंडळाची अधिकृत नोंदणी शासकीय कार्यालयात करण्यात आली. नांदिवली येथे शांत व निसर्गरम्य जागा संस्थेसाठी निवडण्यात आली. पाच मार्च १९९७ रोजी बांधकामास सुरुवात होऊन ते १८ महिन्यांत पूर्ण झाले. 

त्या वेळच्या अंदाजपत्रकाप्रमाणे या प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे सव्वा कोटी रुपये होती. २०० साधकांसाठी ध्यानगृह, पहिल्या मजल्यावर सुमारे १०० लोकांना बसण्यासाठी कॉन्फरन्स हॉल, मंडळाची सहायक संस्था असलेल्या नंदकिशोर संस्कार केंद्राचे ऑडिओ व्हिज्युअल सेंटर आणि कार्यालय तेथे आहे. मंदिरात श्री राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सुंदर मूर्ती ठेवण्यात आल्या असून, श्री गणेश आणि श्री काळभैरव यांची छोटी मंदिरेही बांधली गेली आहेत. इमारतीच्या सभोवताली सुंदर वनस्पती आणि औषधी वनस्पतींसह एक छोटी बागदेखील आहे. 

स्वामींची जयंती, तसेच पुण्यतिथी उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. डोंबिवली येथील हे एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. गुरुवर्य अण्णा लिमये यांच्या पुढाकाराने रामनगर येथेही नवीन मठ उभारण्यात आला आहे. मठ होण्यापूर्वी राष्ट्रीय कीर्तनकार कै. गोविंदस्वामी आफळे यांचे येथे वास्तव्य असायचे. 

स्वामीनारायण मंदिर

स्वामीनारायणस्वामीनारायण मंदिर : पूर्व डोंबिवलीत रेल्वे स्टेशनजवळ तीन मजली भव्य स्वामीनारायण मंदिराची निर्मिती करण्यात आली असून, यामध्ये अनेक पौराणिक प्रसंगांची चित्रे भिंतीवर काढण्यात आली आहेत. तसेच अनेक देवतांच्या सुंदर मूर्तीही आहेत. 

खिडकाळेश्वर महादेव मंदिर : शीळफाट्यापासून डोंबिवलीला जाण्याच्या रस्त्यावर एका तलावाच्या काठावर हे साधारण २५० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या आत हनुमान, भगवान गणेश व इतर देवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत. तसेच उद्यान आहे. स्थानिक कथेनुसार, पांडवांनी या ठिकाणी भेट दिली होती. ठाणे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिरांमध्ये अंबरनाथच्या मंदिरापाठोपाठ लोनाड आणि खिडकाळी येथील शिवमंदिरांचा उल्लेख केला जातो. खिडकाळी येथील शिवलिंग स्वयंभू आहे. २००० साली  हे मंदिर विश्वस्त मंडळाच्या ताब्यात आले. तेव्हापासून ट्रस्टच या मंदिराची देखभाल करीत आहे. ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी येथे धर्मशाळा, विश्रामगृह बांधले आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे.

खिडकाळेश्वर महादेव मंदिर

पिंपळेश्वर मंदिर :
डोंबिवलीच्या जवळ सागाव येथे १५० वर्षांपूर्वीचे पिंपळेश्वर मंदिर आहे. २००१मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत बगीचा असून, अनेक प्रकारची फुलझाडे आणि अन्य वनस्पतींची लागवड तेथे करण्यात आली आहे. सध्या या मंदिराच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू आहे. 

कसे जाल कल्याण-डोंबिवली परिसरात?
कल्याण-डोंबिवली ही शहरे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर आहेत. कल्याण हे उत्तरेकडून मुंबईकडे येणाऱ्या व दक्षिणेकडून बेंगळुरू, चेन्नई, पुणेमार्गे जाणाऱ्या गाड्यांसाठीचे जंक्शन आहे. जवळचा विमानतळ मुंबई. कल्याण हे शीळफाट्यावरून पुणे-ठाणे मार्गाला जोडलेले आहे. कल्याण व डोंबिवली येथे राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेत. 

(या लेखातील माहितीसाठी मिलिंद जोशी आणि माझी डोंबिवलीची भाची सुनंदा शिधये-आघारकर यांचे सहकार्य झाले.) 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
चंद्रकांत कुलकर्णी कर्वेनगर पुणे ४११०५२ About 78 Days ago
अप्रतीम माहिती.
1
0

Select Language
Share Link
 
Search