Next
रमणीय रत्नागिरी – भाग ६ (दापोली तालुका)
BOI
Saturday, June 08, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

दाभोळचा सूर्यास्त

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण रत्नागिरीच्या दापोली तालुक्याच्या किनारपट्टीवरचा उत्तर भाग पाहिला. आजच्या भागात पाहू या त्या तालुक्याच्या उर्वरित भागातील ठिकाणे...
........... 
इसवी सन ३०० ते ५००दरम्यान सापडलेली लेणी बौद्ध, वैष्णव आणि शैव पंथाचे दर्शन घडवितात. दाभोळ बंदरातून पूर्वी पाश्चात्य व मध्य पूर्वेतील जगाशी व्यापार होत असे. चोळ, शिलाहार राजवटींनी येथे राज्य केले. त्यानंतर इ. स. १२००नंतर मुस्लिम राजवटी या भागाने पाहिल्या. हा परिसर निसर्गरम्य तर आहेच. सागरी मार्ग झाल्यामुळे या भागातील वर्दळही वाढली आहे. कर्देपासून कोळथऱ्यापर्यंत अनेक सागरकिनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. 

दाभोळ : वाशिष्ठी नदी सागराला मिळते, तेथे दाभोळ हे निसर्गरम्य, ऐतिहासिक ठिकाण आहे. प्राचीन काळी दालभ्य ऋषींच्या येथ असलेल्या वास्तव्यावरून याला दाभोळ हे नाव पडले, असे मानले जाते. इजिप्तवर राज्य करणाऱ्या मॅसिडोनियन वंशातील टॉलेमी राजांच्या सर्वांत जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. यावरून दाभोळचा पौर्वात्य लोकांशी संबंध असावा, असे दिसून येते. आदिलशाहीत या बंदराचे महत्त्व अधिक वाढले. मक्केचे द्वार म्हणून ते ओळखले जाऊ लागले. एके काळी दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला (हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसून जात असत. अरबस्तानातून अरबी घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्ग होता. आजही पंढरपूर-कराड-चिपळूण-गुहागर रस्त्याचे नाव विजापूर-गुहागर असेच आहे. 

जेकब पीटर यांनी १६९०मध्ये काढलेले दाभोळ बंदराचे चित्र

हे गाव अनेक वेळा परदेशी लोकांच्या लढायांमध्ये उद्ध्वस्त झाले; पण त्याच्या स्थानमहत्त्वामुळे सतत विकसितही झाले. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अशा अनेक प्रवाशांनी दाभोळला भेट देऊन तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत. या बंदरावर समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी आदींची सतत आक्रमणे होत राहिली; मात्र तेराव्या शतकाच्या मध्यापासून सुमारे ३०० वर्षे आदिलशाहीचे वर्चस्व राहिले. ते शिवाजी महाराजांनी संपविले. दाभोळला हामजाबाद, तसेच मैमुनाबाद म्हणूनही ओळखले जायचे. येथे तलम वस्त्रांचा व्यापार चालत असे. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्त्रे विणत असत. दाभोळचा साळीवाडा १९व्या शतकापर्यंत गजबजलेला होता. येथील भंडारी समाज शिवशाहीतील आरमारामध्ये होता. येथील मुसलमान शासकांनी स्थानिक लोकांनाही कारभारात सामावून घेतले होते. त्यामुळे हिंदूंची मंदिरे शाबूत राहिली. गावात व आसपासच्या भागात अनेक थडगी व कबरी दिसून येतात. 

शाही मशीद

माँसाहेब मशीद :
येथील मुख्य आकर्षण म्हणजे शाही मस्जिद (माँसाहेब मशीद). दाभोळच्या सर्व जुन्या वास्तूंपैकी चांगल्या स्थितीमध्ये उभी असलेली वास्तू म्हणजे दाभोळ धक्क्यावर उतरताच प्रवाशांचे लक्ष वेधून घेणरी माँसाहेबांची मशीद. एवढी भव्य, एवढी देखणी आणि अद्यापही चांगल्या स्थितीत असलेली मशीद निदान कोकणपट्टीत तरी दुसरीकडे कोठेही नाही. इतिहास काळातील कला-सौंदर्याची आणि भव्यतेचा साक्षात्कार घडविणारी ही शिल्पाकृती दाभोळचे मोठे आकर्षण आहे. ७० बाय ६० फूट लांबी-रुंदी असलेल्या इमारतीला चार मिनार आहेत आणि ७५ फुटांचा भव्य घुमट आहे. विजापूर येथील शाही जामा मशिदीची ती प्रतिकृती आहे. याच्या मिनारावर सोन्याचा पत्राही होता. या मशिदीच्या निर्मितीबद्दल जो इतिहास लिहिलेला आढळतो, त्याप्रमाणे विजापूरची राजकन्या आयेशाबीबी (माँसाहेब) सन १६५९मध्ये मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. परंतु हवामान ठीक नसल्याने तिचा पुढील प्रवास होऊ शकला नाही. फार मोठा लवाजमा होता व लाखो रुपयांची संपत्ती सोबत होती. प्रवास रद्द झाल्यावर काय करावे, अशा चिंतेत माँसाहेब असताना, बरोबर असलेल्या काझी व मौलवींनी सदर धन काही धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची तिला सूचना केली. तेव्हा तिने या मशिदीचे काम हाती घेतले व ते चार वर्षे चालू होते. त्या वेळी या कामी पंधरा लाख रुपये खर्च आला. ती मशीद कामीलखान नावाच्या शिल्पकाराने बांधली. तिला ‘अंडा मशीद’ असेही म्हणतात. 

चंडिका देवी

चंडिकादेवी मंदिर :
दापोली-दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडे पठारावर तीन किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला मुख्य रस्ता सोडून वसलेले चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू समजले जाणारे स्थान आहे. एकसंध दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणतील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. देवीला चार हात असून, हातात तलवार, ढाल व इतर आयुधे आहेत. हे मंदिर अतिशय पुरातन असून, याला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती, असा उल्लेख इतिहासात आहे. देवीच्या मूर्तीजवळच एक इतिहासकालीन तलवार असून, ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, अशी येथील पुजाऱ्यांची श्रद्धा आहे. चांदीच्या पत्र्याने मढवलेले गुहेचे तोंड लहान असून, आत वाकून जावे लागते. 

चंडिका देवी मंदिर

दालभेश्वर मंदिर :
हे स्थान पुरातन असून, सध्याचे मंदिर मात्र पेशवेकालीन आहे. मूळ मंदिराला आता वरून पत्र्याचे उतरते छप्पर घातलेले आहे. दाभोळ गावातील इतिहासकालीन तळ्यापासून जांभ्या दगडातच खोदलेली पाखाडी (पायऱ्या) चढून गेल्यावर उंचावरील दाट झाडीत हे मंदिर आहे. मंदिरात छोटासा सभामंडप असून, एका बाजूला गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात चार पायऱ्या उतरून गेल्यावर आत गेल्यावर महादेवाची रेखीव पिंडी दिसते. या मंदिरासमोर दुसऱ्या एका मंदिराचे पुरातन अवशेष आढळतात. येथे मारुती व गरुडाची मूर्ती कोरलेली दिसते. शेजारीच एक गुहा असून दालभ्य ऋषी येथे तपश्चर्या करत असत, अशी आख्यायिका आहे. इ. स. १६६१मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीही इथे दर्शन घेतल्याचे सांगण्यात येते. 

अण्णा शिरगावकर हे येथील संशोधक व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. दाभोळमधील हे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी आसपासच्या ठिकाणी फिरून कोकणातील जुन्या-पुराण्या वस्तू जमा करून एक छोटे संग्रहालय उभारले होते. ते त्यांनी ठाणे येथील कोकण संग्रहालयाकडे सुपूर्द केले व आता ते चिपळूण-शिरगाव येथे त्यांच्या मुलीकडे मुक्कामास आहेत. नव्वदीच्या घरात असलेले अण्णा उत्साही असतात. नुकताच त्यांना फोन केला होता. वयोमानाप्रमाणे बोलणे हळू असले, तरी अजूनही त्यांचे उच्चार सुस्पष्ट आहेत. ऐकायलाही चांगले येते. दाभोळबद्दल ते भरभरून बोलले. दाभोळमधील सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. त्यांचा उल्लेख ‘गोनीदां’च्या ‘त्रिपदी’ या पुस्तकात आहे. (‘त्रिपदी’ हे पुस्तक बुकगंगावरून मागविण्यासाठी येथे क्लिक करा. अण्णा शिरगावकरांनी लिहिलेले ‘शोध अपरान्ताचा’ हे पुस्तक मागविण्यासाठी येथे क्लिक करा. अण्णा शिरगावकरांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पन्हाळेकाझी लेणी

पन्हाळेकाझी लेणी :
कोटजाई नदीच्या काठावरील या लेण्यांचा शोध अण्णा शिरगावकर यांनी सन १९७०मध्ये लावला आणि १८०० वर्षांपूर्वीचा हा अनमोल ठेवा लोकांपुढे आला. पन्हाळेकाझी गावात सापडलेल्या एका ताम्रपटाच्या आधारे त्यांनी याचा शोध घेतला. येथे एकूण २९ लेणी असून, यामध्ये बौद्ध वज्रयान पंथाची लेणीही सापडली आहेत. या ठिकाणी श्री गणेश, सरस्वती यांसारख्या देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच भिंतींवर महाभारत आणि रामायणातील काही प्रसंग चित्रित केले आहेत. येथे गौतम बुद्धांच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्ध स्तूप, नाथपंथीय शिल्पपट पाहायला मिळतात. चिपळूणकडूनही बोटीतून येथे येता येते. समोरच खाडीपलीकडे बिवली, मालदोली ही पर्यटनस्थळे आहेत. 

पन्हाळेदुर्ग (प्रणालक दुर्ग) : गिरीदुर्ग प्रकारातील या किल्ल्याच्या पायथ्याशी पन्हाळेकाझीची लेणी आहेत. हा किल्ला दाभोळ बंदरातून गोवळकोटकडे जाणाऱ्या जलमार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधला होता. 

तामसतीर्थ

तामसतीर्थ :
लाडघर येथील हा समुद्रकिनारा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. लालसर मऊशार रेतीतून चालताना एक सुखद अनुभव येथे मिळतो. येथे लाल रंगाचे छोटे मोठे खडे (red pebbles) दिसून येतात. दापोलीच्या आसपास अनेक सागरकिनारे आहेत; पण याचे वैशिष्ट्य वेगळेच आहे. लाडघरच्या किनाऱ्यावरील चमचमती वाळू हे खास वैशिष्ट्य आहे. लालसर रंगाच्या छटा सायंकाळच्या वेळी समुद्राच्या पाण्यात पाहायला मिळतात. त्यामुळे त्याला तामसतीर्थ नाव पडले असावे. येथे पॅरासेलिंग, डॉल्फिन राइडच्या सुविधा आहेत. लाडघरमध्ये कोकणातील ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणार ग्रामीण म्युझियम उभारण्यात येत आहे. स्थानिक कलाकार आणि विद्यार्थ्यांनी साकारलेले कलाग्राम, आर्ट फेस्टिव्हलही पर्यटकांना पाहता येईल. 

श्री परशुराम मूर्ती, बुरोंडी

बुरोंडी :
येथे एका टेकडीवर श्री परशुरामाची २१ फूट उंचीची प्रतिमा ४० फूट व्यासाच्या गोलार्धावर उभारण्यात आली आहे. येथून तामसतीर्थाचा सुंदर सागरकिनारा दिसतो. कोळथरे, तामसतीर्थ, लाडघर व बुरोंडी ही ठिकाणे एकमेकाला लागूनच आहेत. 

कोळथरे : कोळथरे हे क्रिकेटपटू अजित आगरकरचे गाव. भाऊ काटदरे यांच्या सह्याद्री निसर्ग संस्थेच्या प्रेरणेतून कोळथरे गावात २००५पासून कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ, वनविभाग, निसर्गप्रेमी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने कासव संवर्धन प्रकल्प चालवला जातो. समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षित घरट्यातून कासवाची पिल्ले समुद्रात सुरक्षितपणे सोडण्याचा जलार्पण सोहळा येथे पाहता येतो. कोळथरे गावात ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येतो. पर्यटकांना हेरिटेज वॉक करण्याची संधी मिळते. बैलगाडीतून गावाची सफर, शेती आणि मसाल्याच्या बागेची माहिती पर्यटकांना मिळते. दुपारच्या वेळी गावातच केळीच्या पानावर कोकणी शाकाहारी पदार्थांचा आस्वादही घेता येईल. कोळथरे येथे आयुर्वेदिक औषधांचा ६० वर्षांपूर्वीचा कारखाना आहे. जवळच्या डोंगरात समुद्राच्या काठावर घलई नावाचे एक विवर तयार झाले आहे. वाघबीळ नावाची एक नैसर्गिक गुंफाही येथे आहे. कोळथरे गावात अनेक छोटी मंदिरे असल्याने त्याला मंदिराचे गाव असेही म्हणतात.
 
कर्दे किनारा

कर्दे :
दापोलीजवळच चार किलोमीटरवर लांबवर पसरलेली मऊसूत वाळूची पुळण असलेला हा सागर किनारा आहे. लाटांबरोबर किनाऱ्यावर येणारे सुंदर शंखशिंपले हे येथील वैशिष्ट्य. स्थलांतरित पक्षी थंडीच्या मोसमात या किनाऱ्यावर येतात. पर्यटक येथे डॉल्फिन्स राइडचा अनुभव घेऊ शकतात. समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कर्देचा किनारा हा उत्तम व सुरक्षित आहे. सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील अशा होम-स्टेपासून ते स्विमिंग पूल, लाउंज अशा आधुनिक सुविधांनी युक्त अशा अनेक हॉटेल्सची सुविधा कर्देच्या समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध आहे. 

मुरुड किनारा

मुरुड :
समाजसुधारक, स्त्री-शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षणसंस्था काढणारे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे हे गाव. त्यांचा जन्म आजोळी, खेडजवळील शेरवली गावी झाला. गावात त्यांचे छोटे स्मारक आहे. कर्दे बीचवर जाताना हे गाव लागते. येथेही सागरकिनारा आहे. 

वणंद : वणंद हे दापोली गावाला लागूनच आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे माहेर येथे असल्यामुळे या ठिकाणास महत्त्व प्राप्त झाले आहे. बाबासाहेबांच्या कार्यात रमाबाईंचा मोठा हातभार होता. 

गव्हे - रोपवाटिकेचे गाव : दापोलीजवळील हे गाव नर्सरीसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक रोपवाटिका आहेत. येथे आंबे, नारळ यांच्याबरोबर अनेक फळझाडांची रोपे मिळतात. शोभेची झाडे, निरनिराळ्या वेली, टबमधील कमळे, औषधी वनस्पती, कुंडीत येणारी बकुळफुले असे नानाविध प्रकार येथे पाहायला मिळतात आणि त्यांची रोपे विकत घेता येतात. 

केशवसुतांच्या घराचे अवशेष

केशवसुतांचे वळणे :
केशवसुतांचा जन्म मालगुंड येथे झाला असला, तरी त्यांचे गाव वळणे. दापोली-दाभोळ रस्त्यावर थोडे आतल्या बाजूला हे गाव आहे. त्यांचे राहते घर आता मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. त्यांचे बालपण येथेच गेले. येथे केवड्याचे बनही आहे. 

चिखलगावचे लक्ष्मी-केशव मंदिर : हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव. येथे त्यांचे घर होते. मूळ घराच्या जोत्यावर त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या गावाच्या बाहेरच्या बाजूस केशव रूपातील विष्णूचे मंदिर आहे. येथील मूर्तीही आकर्षक आहे. प्रसिद्ध कवी कै. द. वि. केसकर (घरात हसरे तारे) यांची कन्या रेणू दांडेकर व त्यांचे पती राजा दांडेकर यांनी या गावात मोठे शैक्षणिक संकुल उभारले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना अनेक प्रकारचे शिक्षण येथे मिळत आहे. 

जालगाव : दापोली शहराजवळच हे गाव असून श्री गणपतीचे ४०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांचा तळ होता. मंदिरासमोरील तलाव त्यांच्या घोड्यांना पाणी पाजण्यासाठी बांधला होता, असे सांगितले जाते. 

शिर्दे-भोमेश्वर मंदिर : येथे विष्णूची अप्रतिम मूर्ती आहे. भग्नावस्थेत असली, तरी तिचे सौंदर्य जाणवते. कोकणात विष्णूच्या अनेक प्रतिमा पाहायला मिळतात. दापोलीच्या आसपासच्या आठ-१० ठिकाणी तरी अशा सुंदर मूर्ती आहेत. प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य अनोखे आहे. साधारण शिलाहार राजवटीत या मंदिरांची व मूर्तींची स्थापना झाली असावी असे वाटते. मंदिराच्या मागे उघड्यावरच एका सुंदर दगडी मूर्तीचे भग्नावशेष दिसतात. या मूर्तीचे हात, पाय आणि शिर तुटलेल्या अवस्थेत असले, तरी त्यावरील कोरीव काम व कलाकुसर अचंबित करणारी आहे. गावातील ओढ्याच्या काठी अलीकडेच जीर्णोद्धार केलेले भोमेश्वर मंदिर आहे. या मंदिरात असलेले ४ फूट उंचीचे वारूळ बघण्यासारखे आहे. या वारुळालाच देव मानले जाते. त्याशेजारी महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आली आहे. 

विष्णूमूर्ती, सडवे

सडवे येथील विष्णू मंदिर :
दापोलीच्या अगदी जवळ असूनही हे मंदिर फारसे परिचित नाही. दापोलीच्या एक-दोन दिवसांच्या मुक्कामात संध्याकाळी सागरकिनारा, सकाळपासून दुपारपर्यंत अंतर्भागात असलेली पुरातन मंदिरे पाहावीत. या मंदिरातून ८०० ते ९०० वर्षांपूर्वीच्या मूर्ती बघितल्यावर त्या काळचे वैभव आपणास आजमावता येते. खरे कोकणी जीवनही अनुभवता येते. असेच एक ठिकाण म्हणजे सडवे व तेथील विष्णू मंदिर. येथे पुरातन कोकणी शैलीतील बांधकाम असलेल्या मंदिरात काळ्या पाषाणातील सुंदर अशी श्री केशवाची मूर्ती असून, देवाच्या उजव्या पायाजवळ गरुड आणि इतर देवतांची शिल्पे आहेत. येथे एक शिलालेख आहे. देवनागरी लिपीतील आणि संस्कृत भाषेतील हा लेख असून, त्याचा अर्थ असा -  श्री विष्णूची मूर्ती सुवर्णकार कामदेवाने केली आणि तिची स्थापना सोमवारी, रोहिणी नक्षत्रावर केली. तज्ज्ञ संशोधकांच्या मते, या काळात उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा मांडलिक जैत्र सामंत याचा प्रधान देवूगीनायक इथे अंमलदार होता. पादपीठावर असा काल दर्शविणारा शिलालेख अन्यत्र कोठेही नाही. अशीच एक मूर्ती दापोली-खेड रस्त्यावर टाळसुरे येथे असून ती भग्नावस्थेत आहे. टाळसुरे येथे अनेक पुरातन मूर्ती असून, एक दहातोंडी मूर्तीही आहे. 

उन्हवरे येथील कुंडावर लेखक माधव विद्वांस

उन्हवरे :
या ठिकाणी दाभोळहून, तसेच दापोली-खेड रस्त्यावरूनही जाता येते. हे ठिकाण निसर्गरम्य आहेच; पण ते प्रसिद्ध आहे ते गरम पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यामुळे. या झऱ्याच्या प्रवाहात योग्य रीतीने बांधकाम करून त्याचे पाणी व्यवस्थित पाटाद्वारे तीन कुंडांत खेळविले आहे. झऱ्यातून आलेले अतिशय आधण असलेले पाणी अंगावर घेणे शक्य नसते. म्हणून त्याची तीव्रता कमी करून स्नान करता येईल, अशा स्वरूपातील पाणी शेवटच्या कुंडात सोडले आहे. येथे स्नानगृहेदेळी बांधण्यात आली आहेत. 

उन्हवरे

कसे जाल दापोलीला?
जवळचे रेल्वे स्टेशन खेड - २८ किलोमीटर जवळचा विमानतळ पुणे - १८२ किलोमीटर. मुंबई विमानतळ - २२७ किलोमीटर. पुण्याहून ताम्हिणी घाटातून आंबेत, मंडणगडमार्गे किंवा वरंध घाटातून शिवथर, मंडणगडमार्गे जाता येते. सातारा-महाबळेश्वरकडून येण्यासाठी नव्याने होणारा रघुवीर घाट, तसेच कुंभार्ली घाटामार्गे जाता येते. दापोली गावात, तसेच आसपासच्या सागरकिनारी चांगली हॉटेल्स आहेत. अतिपावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जावे. 

(या लेखातील काही फोटो ratnagiritourism.in या वेबसाइटवरून घेतले आहेत.)

- माधव विद्वांस

ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रवीण जगन्नाथ जोशी About 131 Days ago
माहिती फारच छान दिली आहे.
1
0
Tulshidas M Shinde About 131 Days ago
Very Good information.keep it up!
1
0

Select Language
Share Link
 
Search