Next
दांडी येथील महिलांना घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
BOI
Wednesday, August 21, 2019 | 05:57 PM
15 0 0
Share this article:मालवण :
दांडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील मच्छिमार महिलांना विविध प्रकारच्या घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक प्रवीण सुलोकर यांनी या महिलांना प्रशिक्षण दिले. घरामध्ये गॅस सिलिंडर वापरताना काय काळजी घ्यावी, गॅसची गळती झाली तर काय करावे, कोणी विहिरीमध्ये पडले तर त्यास बाहेर कसे काढावे, हृदयविकाराचा झटका आल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा (सीपीआर) आदी बाबींचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात आले. दांडी येथील महिलांचा या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक नितीन काळे यांनी केले. ‘या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांना दैनंदिन कामामध्ये होईल,’ असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला. महिलांसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी. के. गावडे यांनी दिली. मालवण येथील ‘सिंधुकन्या’च्या (माविम) व्यवस्थापिका गीता चौकेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि व्यवस्थापन केले.मालवणच्या नीलक्रांती विविध कृषी, मत्स्यपर्यटन व पणन सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. रिलायन्स फाउंडेशचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांचेही सहकार्य होते. या कार्यक्रमाचे नियोजन व आभारप्रदर्शन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहायक गणपत गावडे यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search