Next
ब्रेल मॅन ऑफ इंडिया!
BOI
Thursday, July 06, 2017 | 06:45 AM
15 2 1
Share this article:


आपल्या संवेदनशील मनाला सतत जागं ठेवून गेली अनेक वर्षं अंधांसाठी अफाट कार्य करणाऱ्या एका मराठी तरुणाला आज जगभरातले आणि देशातले अंध वाचक आणि डोळस वाचक ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखायला लागले आहेत. ही सगळी कामं हा तरुण कुठल्याही सरकारी मदतीशिवाय किंवा अनुदानाशिवाय स्वखर्चाने करत असतो. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज या अवलियाची ओळख...
...................

‘तू ....
कोवळ्या मनातली हिरवी पालवी 
तप्त उन्हातली दाट सावली
लक्ष काजवे घेऊन हाती
वाटउजळवी काळोखातली ....’

ही गोष्ट आहे एका मुलाची. त्याच्या संवेदनशील, हळव्या मनाची. त्याच्या खडतर प्रवासाची, त्यानं प्रकाशमान केलेल्या अनेक आयुष्यांची! ही गोष्ट आहे एका मनस्वी मुलाची!

चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात या मुलाचे वडील आरोग्य विभागात सरकारी अधिकारी म्हणून काम करत असताना हा मुलगा तिथल्या जंगलात हुंदडायचा. जंगलातली झाडं याला आवळे, चिंचा, बोरं, जांभळं, करवंदं असा रानमेवा भरभरून द्यायची. या रानमेव्याची चव चाखायची आणि मित्रांमध्ये ही फळं वाटून टाकायची हा याचा शिरस्ता. कधी हा मधमाश्यांचं पोळं उतरवायचा. मध काढल्यानंतर खाली शिल्लक राहिलेलं मेण छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरून तिथल्या आयाबायांना कुंकू लावण्यासाठी भरून द्यायचा. त्या खूश व्हायच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून हाही खूश व्हायचा. जंगलात फिरताना झाडांवरचे पक्षी त्याला साद घालत. मग हाही त्यांना तसाच आवाज काढून प्रतिसाद देत असे. हळूहळू आसपासच्या प्राण्यांशी त्याची दोस्ती झाली. जंगलातला निसर्ग या मुलाच्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त व्हायचा. हळूहळू बकरी, गाय, ससे, पोपट, कासव आणि कोंबड्या, त्याही थोड्याथोडक्या नाही, चांगल्या ४० कोंबड्यांचा लवाजमा या मुलाच्या घरीच रमला. पाळीव प्राण्यांचं ठीक; पण हे महाशय विंचवाशी देखील खेळायचे. विंचवांना पकडून हा चक्क त्यांची माळच बनवायचा. या जिवघेण्या खेळात २७ वेळा विंचवानं याला दंश केला; पण आपला नाद काही यानं सोडला नाही. याच्या या करामती बघून त्याचे शिक्षकही वैतागत आणि समज देऊन भागलं नाही तर त्याला अनेकदा चांगला चोपही देत. 


काहीच काळानंतर या मुलाच्या वडलांची बदली अहमदनगर या शहरात झाली. त्याच्या वडलांनी पुण्याचा सकाळ, मुंबईचा महाराष्ट्र टाइम्स आणि इंग्रजी भाषेतलं फ्री प्रेस जर्नल ही वर्तमानपत्रं सुरू केली. आपल्या मुलांनी वाचावं आणि त्यांना जगात काय घडतंय याचं ज्ञान मिळावं, असा त्यांचा उद्देश होता. मुलाला वाचनाची गोडी लागली. हळूहळू नव्या बदलाशी जुळतं घेत मुलगा रमला. 


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मुलाचे वडील सैन्यात होते. तिथून परतताना त्यांनी जर्मन मेकचा ‘बुल्स आय’ नावाचा कॅमेरा आणला होता. मुलगा सातवीत असताना त्यांनी तो कॅमेरा त्याला वापरायला दिला. कॅमेरा हातात येताच जणू काही खजिनाच हातात पडावा, असं मुलाला झालं. कॅमेऱ्याशी खेळता खेळता त्यातली तंत्रं त्याला समजत गेली आणि मग या कॅमेऱ्यातून दुर्मीळ प्राणी, पक्षी आणि निसर्ग टिपला जाऊ लागला. कधी कधी तहानभूक विसरून तासन् तास आपल्याला हवा तसा परिणाम साधण्यासाठी मुलाला एकाच जागेवर काढावे लागत; पण मुलाचा संयम जबरदस्त असल्यानं त्याला यात काहीच कष्ट जाणवत नसत. 

असं करता करता मुलगा अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. मुलाला या सगळ्या काळात चित्रकलेचीही आवड निर्माण झाली होती. कलेतच आपलं आयुष्य काढायचं आणि त्यामुळे पुढलं शिक्षणदेखील चित्रकला या विषयातच घ्यायचं असं त्यानं मनाशी पक्क ठरवलं होतं. मुलानं काढलेल्या माहितीनुसार मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् या महाविद्यालयात हे शिक्षण घेता येणार होतं. तिथे प्रवेश नाहीच मिळाला, तर पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयात दाखल होण्याची स्वप्नं मुलगा बघत होता; मात्र संसाराचा गाडा ओढताना आपल्या मुलाला बाहेरगावी ठेवून त्याचा खर्च उचलणं वडलांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपली असमर्थता मुलाजवळ व्यक्त केली. खरं तर मुलगा शाळेत असल्यापासूनच दिवाळीच्या वेळी आकाशकंदील कर, कधी भेटकार्ड बनव असे ना ना तऱ्हेचे उद्योग करायचा आणि त्यातून त्याला पैसेही मिळायचे. इतकंच नाही, तर त्याच्याकडे शिकवणीसाठी मुलंही यायची आणि हा त्याच्याएवढ्या किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांनाही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवायचा. त्याचेही पैसे मुलं स्वतःहून त्याला देत; पण हे सगळे पैसे त्याला बाहेरगावी राहण्यासाठी पुरेसे नव्हते. मुलाला स्थानिक ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नव्हता. दिवसरात्र विचार करून त्याचा मेंदू शिणून गेला आणि अखेर त्यानं निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मुलगा ठामपणे आपल्या वडलांना म्हणाला, ‘मला यापुढे शिकायचं नाही.’


मुलाच्या या निर्णयानं सगळीकडे एकच खळबळ माजली. ‘या मुलाचं डोकं फिरलंय का, शिकायचं नाही म्हणजे करणार काय पुढे, पोट भरण्यासाठी काय करणार, हे कसले भिकेचे डोहाळे लागलेत....’ अशा प्रकारे एक ना अनेक अर्थांनी घरातले, नातेवाईक आणि स्नेही मंडळी यांनी उपदेश सुरू केले; पण मुलगा आपल्या निर्णयावर ठाम होता. जगायचं तर मन मारून नाही, मनासारखं जगायचं आणि त्या स्वातंत्र्यासाठी हवी ती किंमत मोजायची तयारी ठेवायची असा एव्हाना त्याचा पक्का निग्रह झाला होता. आपल्या निर्णयाची त्याला जरादेखील खंत नव्हती. आता दिवसभराचा वेळ त्याच्या हाती होता. चित्रं काढायची, मनसोक्तभटकायचं, भेटकार्डं बनवायची असे उद्योग त्यानं सुरू केले. अंगी ठायी ठायी कल्पकता भरल्यामुळे त्याला अंतर्गत सजावटीची दृष्टी उपजतच होती. तो लोकांना घर, कार्यालय इथे असणाऱ्या अंतर्गत सजावटीविषयी (इंटिरियर) सल्ले देऊ लागला. मुलगा तरुण झाला होता. नगरमधलीच इंटिरिअर डेकोरेशनची कामंही तो घेऊ लागला. या कामातही त्याचा जम चांगलाच बसला. त्याच्या हाताखाली ४० सुतार काम करत असत. 


याच दरम्यान या तरुणाला नाटकाचंही वेड लागलं. नगरमध्ये समृद्ध सांस्कृतिक वातावरण होतं. सदाशिव अमरापूरकर यांना नगरवासी ‘तात्या’ म्हणत. तात्यांना हा तरुण भेटला, तेव्हा ते त्याला ‘ये उद्यापासून’ म्हणाले. नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाणं, तिथला हॉल झाडून काढणं, माठ धुवून पाणी भरणं, स्पॉटलाइट्स कसे लावायचे हे बघणं, प्रकाशयोजना कशी करायची बघणं, प्रॉम्प्टिंग करणं, संगीत देणं, अभिनय करणं, नाटकाच्या चर्चा ऐकणं आणि वेळच पडली तर मेकअप करणं या सगळ्या गोष्टी तरुण बघता बघता शिकला. इतकंच काय, पण नाटकाचे सेटही तो बनवायला लागला. हळूहळू हा तरुण इतका नाटकवेडा झाला, की स्वतः नाटकाचं दिग्दर्शन करायला लागला. स्पर्धेसाठी नाटकं इतरत्र घेऊन जाऊ लागला. ‘पुरुषोत्तम नाट्य करंडक’सह अनेक नामांकित स्पर्धांतली बक्षिसं जिंकून नगरवासीयांच्या प्रतिष्ठेत भरच टाकू लागला. 

हे सगळं करत असताना हा तरुण नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटरमध्ये युद्ध प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या युद्धभूमीची मॉडेल्स आणि त्रिमिती नकाशे करून देण्याचं काम - म्हणजेच नोकरी करत होता. यासाठी त्याचं भारतभर फिरणं झालं. सगळं काही सुरळीत चाललं असतानाच या तरुणाच्या आयुष्यात एक वादळ आलं. पुढची वाट काटेरी वळणाची होती. या तरुणानं मग ती वाट आपलीशी केली आणि मागचे सगळे बंध सोडून त्याची पावलं पुण्याच्या दिशेनं वळली. 

पुण्यात आल्यावर त्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची होती. तो खचणारा निश्चितच नव्हता. त्याच्या डोळ्यातली स्वप्नं कोमेजणारी नव्हती, त्याची चालणारी पावलं थकणारी नव्हती. पुण्यात आल्यावरही छोट्या-मोठ्या एकांकिका बसवणं, स्पर्धांत भाग घेणं त्यानं सुरू केलं. तसंच पोटापाण्यासाठी छोटीमोठी मिळेल ती कामंही तो करत होताच. एका कार्यक्रमाचं निवेदन करत असताना तिथे पुणे बालचित्रवाणीचे संचालक जोतिराम कदम आले होते. त्यांना हा तरुण खूपच आवडला. बालचित्रवाणीला अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीवर एक माहितीपट बनवायचा असून, त्याचं लेखन करण्याचा प्रस्ताव त्यांनी त्याला भेटून त्याच्यासमोर ठेवला. समोर खूप मोठी संधी आली होती. हा तरुण वेळ पडेल तेव्हा लिखाण करत होता; पण तो काही लेखक नव्हता. तसंच अंधांच्या आयुष्याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. आपल्याला जी गोष्ट माहीतच नाही, ती कशी करावी या भावनेतून तो जोतीराव कदम यांना म्हणाला, ‘मला हे सगळं काहीच माहीत नाही.’ त्या वेळी ते म्हणाले, ‘मग माहीत करून घे. किती वेळ लागेल तुला?’ तो म्हणाला, ‘दोन महिने!’ (आता ते आपल्याला ‘ते शक्य नाही’ असं म्हणतील असा तरुणाचा अंदाज होता; पण तो साफ चुकला) जोतीराम कदम म्हणाले, ‘दोन महिने दिले.’ त्यांनी लगेचच कोरेगाव पार्कच्या अंध मुलांच्या शाळेत आणि कोथरूड इथे असलेल्या अंध मुलींच्या शाळेत फोन लावले आणि ‘हा तरुण उद्यापासून येईल आणि त्याला साहाय्य करा’ असं सांगितलं. 

दुसऱ्या दिवशीपासून तरुण दोन्ही शाळांमध्ये जाऊ लागला. त्याला अंधांचं जगणं जवळून बघायचं होतं. त्या वेळी हा आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरणार आहे हे त्यालाही ठाऊक नव्हतं. काळोखाचं जीवन जगणाऱ्या अंध मुलामुलींना बघून हा तरुण पार हादरला. खोलीवर परतल्यावरही त्याचा अस्वस्थपणा दूर झाला नाही. 

या अस्वस्थ तरुणानं काय करावं, तर त्यानं खोलीत येताच, आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधायला सुरुवात केली आणि त्या काळोखात तो रात्रीपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंतची आपली सगळी कामं करायला लागला. रात्रीचं जेवण, खोलीतला वावर, दाढी करणं, दात घासणं, सकाळी उठल्यावर अंथरुणाच्या घड्या करणं, आंघोळ करणं असं सगळं काही तो डोळ्यांना पट्टी बांधलेल्या अवस्थेत करू लागला. या नवीन अनुभवानं तो थरारून गेला. डोळे बंद झाल्यावर त्याची इतर इंद्रियं कामं करू लागली. त्याचं नाक जास्त तीव्रतेनं गंधाची अनुभूती त्याला देऊ लागलं, तर कान अगदी बारीक आवाजही टिपू लागले. हे सगळं त्या तरुणाला विलक्षण वाटत होतं. या सगळ्या काळात त्याची दोन्ही अंधशाळांतल्या मुलामुलींशी चांगलीच गट्टी जमली. तो त्यांना अनेक पुस्तकं वाचून दाखवायचा, गोष्टी सांगायचा. त्यांच्याशी गप्पा मारायचा. 

असं करता करता दोन महिने संपले आणि ‘काळोखातील चांदणे’ या नावाचा माहितीपटही तयार झाला. हा माहितीपट या आपल्या अंध मित्र-मैत्रिणींना बघता येणार नाही, या वास्तवानं हा तरुण पुन्हा एकदा बेचैन झाला. त्याला इतकं दुःख झालं, की स्वतः लिहिलेला आणि तयार झालेला हा माहितीपट या तरुणानं कधीच बघितला नाही. हा माहितीपट खूप नावाजला गेला. 

आता अंधांसाठीचं काम संपलं होतं; पण या तरुणाला विसरायला ही मुलंमुली तयार नव्हती आणि तोही खेचल्यासारखा त्यांच्याकडे जातच होता. या तरुणानं अंध मुलांमुलींमध्ये आत्मविश्वाडस निर्माण केला होता. त्यांना जगण्याची नवी दिशा दाखवली होती. त्यांना आता ज्ञानाची आस लागली होती. मुलं आता तरुणाजवळ ‘आणखी आणखी वाचायला हवं’, ‘आणखी काही तरी करू या’ असा हट्ट धरू लागली. याच दरम्यान, या तरुणानं शांताबाई शेळके यांनी लिहिलेलं हेलन केलरचं ‘आंधळी’ हे चरित्र वाचलं. त्यानं आंधळीचं नभोनाट्यात रूपांतर केलं आणि सहा डोळस कलाकारांना घेऊन अंध मुला-मुलींसाठी २८ पात्रांचे आवाज करत त्याचं अभिवाचन केलं. 

याच दरम्यान पुण्यात वंदना चव्हाण या महापौर असताना राज्यस्तरीय खुली महापौर एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली. या तरुणानं हे नवं आव्हान स्वीकारलं आणि या दोन्ही शाळांतल्या ८८ अंध मुला-मुलींना घेऊन ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ ही एकांकिका बसवली. या एकांकिकेचं आव्हान स्वीकारल्यावर सगळ्यांनीच त्याला वेड्यात काढलं. ‘अरे बाबा, एकांकिकेत अंध मुलं स्टेजवर कोणाच्याही आधाराशिवाय फिरतील कशी, मुख्य म्हणजे अभिनय करताना कलाकाराच्या डोळ्यात अभिनय दिसावा लागतो. इथं या अंधांच्या डोळ्यात काय ढेकळं बघायला मिळणार?’.... तरुण शांत होता. त्याचा स्वतःवर आणि आपल्या अंध मुला-मुलींवर विश्वा स होता. त्यानं महापौर वंदना चव्हाण यांनाही ‘आपल्या कलाकारांना अंध म्हणून वेगळी सहानुभूतीची वागणूक देऊ नये’ असं विनंती करून सांगितलं. अनेक अडचणी पुढ्यात वाट बघत होत्या; पण या सगळ्यांवर मात करून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तरुणानं ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेनं प्रेक्षक स्तिमित झाले. ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झालेलं हे पहिलंच एकमेव मराठी नाटक ठरलं.

यानंतर या तरुणानं ४४ अंध मुलामुलींना घेऊन पु. ल. देशपांडे लिखित ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केलं. या नाटकानंही ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये विक्रमी नोंद केली. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांनी या अनवट वाटेवरनं चालणाऱ्या तरुणावर भरभरून प्रेम केलं. त्यांना या तरुणाचं खूप कौतुक वाटायचं. याचदरम्यान या तरुणानं लुई ब्रेलविषयी जाणून घेतलं.

फ्रान्समधल्या एका छोट्याशा गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात चार जानेवारी १८०९ या दिवशी लुई ब्रेलचा जन्म झाला. लुई तीन वर्षांचा झाला आणि अचानक एका अपघातात त्याची दृष्टी गेली. संपूर्ण घर दुःखात बुडालं. लुईला पॅरिसच्या अंधशाळेत दाखल केलं गेलं. लुई प्रचंड हुशार होता. त्याचं कुतूहल आणि त्याची जिज्ञासा त्याला प्रत्येक गोष्टीत ‘का’ असा प्रश्न  विचारत असे आणि याच त्याच्या जिज्ञासू स्वभावामुळे १८२५ साली वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी लुईनं अंधांसाठी एक लिपी निर्माण केली, ज्या लिपीमुळे अंधांना वाचता येऊ लागलं. त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे झाले. याच लिपीला ‘ब्रेल लिपी’ असं म्हटलं जातं. चार जानेवारी २००९ या दिवशी भारत सरकारनं लुई ब्रेलच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट काढून त्याच्या कार्याचा गौरव केला. 

या तरुणानं लुई ब्रेलपासून प्रेरणा घेतली आणि स्वतः ब्रेल लिपी शिकून घेतली. त्यानं निश्चय केला आणि साहित्यापासून वंचित असलेल्या नेत्रहीनांसाठी ‘स्पर्शगंध’ नावाचा दिवाळी अंक त्यानं सुरू केला. तीन वर्षांनंतर ‘पुलं’ गेले आणि ब्रेल लिपीतला पु. ल. देशपांडे विशेषांक दिवाळी अंकाऐवजी काढण्यात आला. विशेष म्हणजे या कामी सुनीताबाईंनी या तरुणाला खूप मदत केली. 


यानंतर या अंधांसाठी ‘स्पर्शज्ञान’ नावाचं ब्रेल पाक्षिक सुरू करायचं तरुणानं ठरवलं. छपाईसाठी वेगळं प्रिंटिंग मशीन आणण्यासाठी चार लाख रुपयांची आवश्यकता होती. तरुण आपलं सगळं काही मागे सोडून आला होता. त्याच्याजवळ काहीही नव्हतं. आपल्या कामातून त्यानं काहीच वर्षांत चार लाख रुपये जमा केले. त्यासाठी अनेक गोष्टींत त्यानं काटकसर केली. या पैशांमधून प्रिंटिंग मशीन आलं. देशातलं अंधांसाठीचं पहिलं नोंदणीकृत ब्रेल पाक्षिक ‘स्पर्शज्ञान’ लुई ब्रेलच्या द्विजन्मशताब्दीच्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी २००८ या दिवशी सुरू झालं. या पाक्षिकामध्ये राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी, नाट्य-चित्रपट, क्रीडा, विज्ञान, आरोग्य, पाककला, सामान्यज्ञान अशा विविध विषयांवरचे लेख सामील होऊ लागले; मात्र गुन्हेगारी आणि अंधश्रद्धा या दोन विषयांना या तरुणानं जाणीवपूर्वक दूर ठेवलं. ‘स्पर्शज्ञान’ला अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवलं गेलं. महाराष्ट्रातल्या ३५ पैकी ३१ जिल्ह्यांमध्ये ‘स्पर्शज्ञान’ पोहोचलं आणि २४ हजार अंध वाचक अंक वाचू लागले. 


पुढे या तरुणानं अनेक नाटकं दिग्दर्शित केली. आद्य नाटककार महात्मा जोतिराव फुले यांनी १८५५ साली लिहिलेलं ‘तृतीयरत्न’ हे सामाजिक प्रश्नावर परखडपणे भाष्य करणारं नाटक या तरुणानं तब्बल १४६ वर्षांनंतर म्हणजे २००१ साली दिग्दर्शित केलं आणि अनेक अडथळ्यांना पार करत त्याचे अनेक प्रयोग केले. इतकंच नाही, तर मराठी माध्यमात शिकलेल्या कलाकारांना घेऊन ‘हार्ट ऑफद मटर’ या नाटकाचं यशस्वी दिग्दर्शन केलं. हे सगळं करत असताना या तरुणाची वेळ मिळेल तशी जंगलातली भटकंती सुरूच असते. त्याची फोटोग्राफी, पशुपक्ष्यांना कॅमेऱ्यात टिपणं, त्यांचा अभ्यास करणं हेही सगळं सुरूच असतं. या तरुणानं वन्यजीवनावरची किमान चार लाखांच्या वर छायाचित्रं काढली आहेत आणि व्हिडिओ चित्रणही केलं आहे. भारतातली ५२ राष्ट्रीय उद्यानं आणि ३२० अभयारण्यांना त्याने अभ्यासपूर्ण भेट दिली आहे. आपल्याला जे कळलंय ते तो शाळा-शाळांमध्ये जाऊन ‘स्लाइड शो’द्वारे मुलांना दाखवतो. मुलांशी पर्यावरणावर गप्पा मारतो. आजवर राज्यातल्या ३००हून अधिक शाळांमध्ये जाऊन त्याने मुलांशी संवाद साधलाय. 

या तरुणाचं काम बघून रिलायन्स फाउंडेशन पुढे आलं आणि त्यांनी या तरुणाबरोबर ‘रिलायन्स दृष्टी’ हे देशातलं पहिलं हिंदी भाषेतलं ब्रेल पाक्षिक सुरू केलं. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश आणि देशाबाहेरही हे पाक्षिक रिलायन्स फाउंडेशनतर्फे अंध वाचकांना मोफत पाठवणं सुरू झालं. 

अंधांना सहानुभूतीने नाही, तर स्वाभिमानाने जगता यावं, म्हणून हा तरुण गावोगाव भटकंती करून उशिरा अंधत्व आलेल्यांसाठी ‘मोबिलिटी वर्कशॉप’ घेतो. खचलेल्या आणि नैराश्याच्या खाईत गेलेल्या अनेक अंध मंडळींना यामुळे दिलासा मिळाला आहे. कोणाच्याही मदतीशिवाय अनेक कामं ती स्वतः करू लागली आहेत.


याच काळात गणेश दिघे लिखित ‘अपूर्व मेघदूत’ची संहिता या तरुणाच्या हातात पडली आणि त्यानं हे नवं आव्हानही दिग्दर्शक म्हणून स्वीकारलं. पुन्हा हौशी २२ अंध तरुण-तरुणी एकत्र आली. ‘अपूर्व मेघदूत’चा नाट्यप्रयोग डोळसांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ठरला. या नाटकात यक्ष, यक्षिणी, इतकंच काय, पण कालिदासानं उभं केलेलं अख्खं मेघदूत आपल्यासमोर यशस्वीरीत्या उभं करण्यात या तरुणानं केलेले कठोर परिश्रम बघायला मिळतात. १९ नेत्रहीनांच्या स्टेजवरच्या सहज हालचाली आणि नितांत सुंदर अभिनय, श्रवणीय संगीत, मधुर गायन, मोहवणारी प्रकाशयोजना, अनुरूप वेशभूषा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि लेखन, काय काय नावाजावं? बस्स. ‘अपूर्व मेघदूत’ बघितल्यावर बघणारा ‘अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम’ एवढंच म्हणत घरी परततो. सध्या ‘अपूर्व मेघदूत’चे प्रयोग महाराष्ट्रात गाजताहेत. या नाटकाला ‘झी गौरव पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं.

तरुणाच्या अफाट वाचनानं, त्याच्या भटकंतीनं, त्याच्या स्वातंत्र्यानं आणि त्याच्या संवेदनशील मनानं त्याला घडवलंय. कुठल्याही जातिधर्माचे शिक्के मारून घेणं त्याला मान्य नाही. त्याचे विचार आणि त्याची वाट स्पष्ट आहे. त्याचं काम आता जगासमोर ठळकपणे दिसू लागलंय. त्याच्या अतुलनीय कामाची दखल घेऊन त्याला नाट्यगौरव पुरस्कार, महाराष्ट्र दीप पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, सॅल्यूट मुंबई पुरस्कार, स्नेह पुरस्कार, रिलायन्स फाउंडेशनचा ‘रियल हिरोज’ पुरस्कार आणि लुई ब्रेल पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत. या तरुणाचं कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचलं आहे. कॅनडामधले बेन जोनासन यांनी या तरुणाला घेऊन इंग्रजीतून ब्रेल वृत्तपत्र सुरू करायचं ठरवलं आहे. 

स्वागत थोरातआपल्या संवेदनशील मनाला सतत जागं ठेवून कार्य करणाऱ्या या तरुणाला आज जगभरातले आणि देशातले अंध वाचक आणि डोळस वाचक ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखायला लागले आहेत. ही सगळी कामं हा तरुण कुठल्याही सरकारी मदतीशिवाय किंवा अनुदानाशिवाय स्वखर्चाने करत असतो. विविध स्तरांवर अफाट काम करणाऱ्या या अचाट तरुणाचं नाव आहे ‘स्वागत थोरात!’ 

स्वानंद किरकिरे या कवीच्या ओळींत किंचित बदल करून ‘स्वागत’साठी म्हणावंसं वाटतं : 

बहती हवासा है वो, उड़ती पतंगसा है वो...
गिरता संभलता, मस्ती में चलता है वो
हर लम्हें को खुलके जीता है वो...
सुलगती धूप में छाँव के जैसा
रेगिस्तान में गाँव के जैसा
मन के घाव पे मरहम जैसा है वो...
उल्टी धारा चीर के तैरता है वो....

अशा या स्वागतबरोबर चालण्यासाठी, त्याला साहाय्य करण्यासाठी, ‘स्पर्शज्ञान’ आणि ‘रिलायन्स दृष्टी’ जास्तीत जास्त अंध वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वर्गणीदार होण्यासाठी त्याच्याशी आवर्जून संपर्क साधावा.
स्वागत थोरात : ९४२२३ १७९७९, ९२२३२ १७५६८
ई-मेल : sparshdnyan@gmail.com


- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(‘अनवट वाटेवरचे वाटसरू’  हे सदर दर पंधरा दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते.)

 
15 2 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
dhananjay kulkarni About
No doubt, the mission of Sagar thirst is admirable, this off beat personality is a great source of inspiration for us. Simultaneously the venture Deepa is carrying is of great importance.unfolding the stories & making of real heroes is of great importance, for which she also deserves lot of thanks. Deepa, keep it up.
1
0
Milind M. Kadam, chiplun About
In this world no one is doing for other's everybody is running for money but this man has done great work. Salute to this great man.
1
0
Yojana Deshmukh About
Very nice&very great mam, trivarabhivadan
1
0
Saptahik vyadh Sampadika Desai About
Nice article
1
0
Dr Ramaa Ulhas KKulkarni About
स्वागत खटपट्या आहेच .पण अंधांच्या भूमिकेत शिरून त्यानं जाणलेलं त्याला मोठं करतं .स्वागत हे सगळं अफाट रे बाबा .लोटांगण घालून नमस्कार रे बाबा
1
0
shobha patil About
अफलातून व्यक्तिमत्व! अंतःप्रेरणांना प्रतिसाद देत स्वतःच्या जीवनात प्रकाश निर्माण केलाच परंतु अंधारात चाचपडत जगणारांच्या जीवनात ज्ञान, जीवनकौशल्ये, कला यांचा प्रकाश निर्माण करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वाला कुर्निसात!
3
0
Sonia Sachdev About
Real Hero of India. Apratim. Trivaar abhivaadan
3
0
Wishwas Abhyankar About
केवळ अप्रतिम! नतमस्तक 🙏
3
0
Minal Vedak About
Oh God humm khup sundar jiwan jaglat sir. you are really great sir.mi tumhala khup vela pahile ahe pan bolle kadhi nahi.tumhi ithake ekrup houn kam karta. salute ahe maza tumhala. manane sundar asnyachi shan ahat tumhi. amhi suddha blind madhe wavrlo pan tumchya evdhe mahan kary nahi karu shaklo.amhi social work karto pan tuchya evdhe nahi shaky zale kadhi. tumhala aamche shatasha pranam sir.
2
0
सौ. वेदवती वि. भावे. About
सुंदर लेख,
3
0
Shalaka About
Khup chan! Deepatai dhanyawad!! Aandha mulanshi sawand sadhla tar tyanchya drushtitun jag baghne ha aek awismarniy anubhaw asto.Swagat Thoratanche karya mhanje great ha shabda pan kami padel!!
2
0
Shirin Kulkarni About
अफाट माणूस! दिपा ताई, पुन्हा एकदा धन्यवाद!
2
0
अंजली दिवाण पाटील About
स्वागत, gr8 आहेच.खुप कला गुण त्याचे अंगी आहेत,पण एकदम साधा आहे. इतका उंचीवर असतानाही हा आपल्या सारखाच आहे ही भावना त्याला भेटल्यावर वाटते. स्वागत, तुझ्या अफाट कामाला कायम सलाम...👍👍
1
0

Select Language
Share Link
 
Search