Next
सावरकर कुटुंबावर आधारित ‘त्या तिघी’ एकपात्री प्रयोगाला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, May 03, 2019 | 10:55 AM
15 0 0
Share this article:


पुणे : स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर कुटुंबियांच्या घरातील बंधू त्रयीच्या पत्नींचे योगदान मांडणाऱ्या त्या तिघी' या डॉ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी...स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री प्रयोगाला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

क्रांतिकार्यात हालअपेष्टा सोसणाऱ्या, तरीही हार न मानता राष्ट्राचा संसार पुढे नेणाऱ्या या वीरांगनांची शौर्यगाथा पाहताना पुणेकर भारावून गेले. अभिव्यक्त पुणे या संस्थेतर्फे एक मे २०१९ रोजी सुदर्शन रंगमंच येथे हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, लेखिका डॉ. शुभा साठे, ‘श्रेयस’चे दत्ता चितळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या प्रयोगाची संकल्पना, संहिता लेखन अपर्णा चोथे यांचे असून, सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर व शांताबाई नारायण सावरकर या तीनही व्यक्तिरेखा त्यांनी समरसून साकारल्या आणि तो रोमांचक काळच रसिकांसमोर उभा केला. अजिंक्य भोसले यांनी दिग्दर्शन केले. अजित विसपुते यांनी संगीत दिले. नेपथ्य आणि वेशभूषा अश्विनी चोथे-जोशी यांचे असून, प्रकाशयोजना संकेत पारखे, स्थिरचित्रण चैतन्य कुलकर्णी यांनी केले. 

सावरकर बंधूंचा त्याग, पराक्रम, कष्ट इतिहासात नोंदवला गेला आहे; पण हा त्याग, पराक्रम करत असताना त्यांच्या घरातील स्त्रिया कशा जगल्या, कष्टाचे आयुष्य अनेकींच्या वाट्याला येते; पण आनंदी आणि रसाळ मन, उदात्त विचार आणि दुःखाचे हलाहल पिऊनही न ढळणारी देशनिष्ठा हे त्यांचे विशेष गुण त्यांना अढळपदी नेऊन बसवतात. अशा, आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या वीरांगनांची शौर्यगाथा या एकपात्री प्रयोगाद्वारे रंगमंचावर आली. 

डॉ. देसाई यांच्या हस्ते कलाकार आणि तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. ‘सावरकर घराण्यातील प्रत्येकाचा त्याग अतुलनीय असून, या प्रयोगाद्वारे तो अत्यंत प्रभावीपणे मांडला गेला आहे. युवा पिढीने हा प्रयोग जरूर पाहावा आणि प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन डॉ. देसाई यांनी या प्रसंगी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search