Next
‘सवाई गंधर्व : एक अनुभूती’
BOI
Thursday, December 13, 2018 | 04:41 PM
15 0 0
Share this story

तबलावादक नवाझ मिरजकरदेशभरातील दिग्गज गायक,वादक यांची मांदियाळी जिथे जमते त्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी प्रत्येक कलाकार आतूर असतो. अभिजात शास्त्रीय संगीताचा समृद्ध ठेवा खुला करणारा, एक विलक्षण अनुभूती देणारा हा स्वरसोहळा म्हणजे श्रोत्यांसाठीच नव्हे, तर कलाकारांसाठीदेखील एक पर्वणी असते.यंदा प्रथमच या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सनई वादक अपार कल्याण यांना तबला साथ करणाऱ्या नवाझ मिरजकर यांनी व्यक्त केलेल्या भावना...
......

तबल्याचा ताल सगळीकडे घुमला अन् एक वेगळाच नाद रसिकांच्या मनाला भिडत गेला....असे कित्येक कार्यक्रमात घडलेय. एकदा का तबल्याचा ताल बहरला की प्रत्येकजण त्या विश्वात रमून जातो. रसिकांसमोर प्रत्यक्ष तबला वादन करण्याचा अनुभव काही औरच असतो. त्यातून मिळणारी ऊर्जा काही वेगळीच असते. अशी ऊर्जा आणि दाद मला यंदा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त मिळाली. एका मोठ्या व्यासपीठावर आपली कलाकारी सादर करण्याचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. 

आम्हा गायक-वादकांसाठी पंढरी असलेल्या या व्यासपीठावर सनई वादक पंडित कल्याण अपार यांच्या सनई वादनाच्या जोडीला तबल्याची साथ करता आली हे माझे भाग्य. ‘सवाई’ सारख्या महत्वाच्या व्यासपीठावर कला सादर करण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. 

सनई वादक कल्याण अपार
दरवर्षी सवाईत येणाऱ्या रसिकाला काहीतरी नवेपण अनुभवायचे असते. तोच ताजेपणा घेऊन मी तबल्याला ताल लावला अन् सनईच्या सुरात माझ्या तबल्यानेही रसिकांवर मोहिनी घातली. म्हणूनच सवाईत प्रथमच सादरीकरण करण्याच्या माझ्या पहिल्याच प्रयत्नाला भरभरून मिळालेली दाद माझ्यासाठी लाखमोलाची आहे. ‘सवाई’त तबला वादनाचे स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासाठी ही संधी आयुष्यभराची कमाई ठरली. जे व्यासपीठ अनेक दिग्गज कलाकार, गायक आणि वादकांच्या अदाकारीने बहरले,त्याच व्यासपीठावर आणि त्या रसिकांसमोर आपली कला सादर करणे खूपच अभिमानास्पद होते.

मी मूळचा पुणेकर; पण आता सिंगापूरमध्ये स्थायिक झालो आहे. पुण्यातच लहानाचा मोठा झालो. माझे आजोबा उस्ताद मेहबूब खान मिरजकर आणि वडील मोहम्मद हनीफ खान मिरजकर हे माझे गुरु आहेत. त्यांच्याकडेच मी तबला शिकलो आणि त्यांच्यामुळेच घडलो. तबला वादनाने एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा मिळते. याच कलेने मला घडवले आहे.

लहानपणापासून ‘सवाई’ पाहत आणि ऐकत आलो आहे. भारतरत्न भीमसेन जोशी यांना ‘सवाई’त गाताना पाहत आणि ऐकत आलो आहे. ‘सवाई’त आपली कला सादर करण्याचे माझे अनेक वर्षांचे स्वप्न होते; ते आज पूर्ण झाले. आपल्या घरच्याच अत्यंत मानाच्या व्यासपीठावर आपली कला पेश करण्याची संधी मिळणे यापरते भाग्य ते काय! देशविदेशात मी खूप ठिकाणी तबला वादन केले आहे पण, ‘सवाई’चा हा नाद कायम लक्षात राहील. अनेक दिग्गज कलाकारांनी येथे सादरीकरण केले आहे. त्यात माझी गणती होणार हेच माझ्या वादनासाठी प्रेरक आणि आशादायी पाऊल आहे. 

१९९६ मध्ये मी सिंगापूरला स्थायिक झालो. तिथे तबल्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी काम करत आहे. तिथे मी सलग २७ तास १५ मिनिटे तबला वादन करून जागतिक विक्रम नोंदवला आहे. ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’ त्याची नोंद झाली. तबला वादनातील माझ्या कारकिर्दीसाठी मला २०११ मध्ये सिंगापूर सरकारच्या ‘यंग आर्टिस्ट’पुरस्काराने गौरविण्यात आले. मी स्वतः तबल्यावर आधारित तालविश्व महोत्सव आयोजित करतो. उस्ताद झाकीर हुसेन, पं. योगेश समसी यांसारख्या कलाकारांनी आपल्या वादनाने रसिकांची मने जिंकली आहेत. तोच माझा प्रयत्न आहे. 


(सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सनई वादक कल्याण अपार यांना तबलावादक नवाझ मिरजकर यांनी साथ केली. त्याची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link