समोर चांदण्यांनी भरलेले आकाश दिसत होते. क्षितिजाची रेषा कुठेच दिसत नव्हती. प्रत्येक झोपडीतून दिसणाऱ्या त्या एलईडीच्या चांदण्या, आकाशातल्या चांदण्यात केव्हाच मिसळून गेल्या होत्या आणि क्षितिज माझ्या पावलापाशी आले होते. माझ्या डोळ्यातल्या अश्रुधारा ते सगळे सामावून घेत होत्या... ईशान्य भारतात कार्य केलेल्या एका स्वच्छंदी कार्यकर्त्याचे अनुभव कथन करणाऱ्या ‘ईशान्यवाटेचा वारकरी’ या लेखमालिकेचा हा आठवा भाग...
.................

पर्वतराजीतील सृष्टी सौंदर्य, गार वारे, वेगळ्या धाटणीची माणसे आणि घरे पाहत सहा तास केव्हा गेले कळलेच नाही. हंग्रूमला पोहोचेपर्यंत काळोख पसरला होता. अंधारात काहीच दिसत नव्हते. इतक्यात दूरवर मशाली पेटलेल्या दिसू लागल्या. माझ्या मनात चर्रर झाले. आमचा मार्ग रोखण्यासाठी कोणीतरी अतिरेकी ग्रुप आला असावा, असे मला वाटले. ‘कोणी काही बोलू नका, गप्प बसा..’, असे मी निघताना सांगितले. जसे जसे जवळ जवळ जाऊ लागलो, माझी धडधड वाढू लागली. बांबूच्या कड्यांच्या मशाली करून गावकऱ्यांनी रस्ता रोखून धरला होता.

लोकांचा गलका वाढत होता आणि मला त्यांची भाषा कळत नव्हती. मी खाली उतरलो. तेवढ्यात, ‘मामा आया’, असे म्हणत त्या लोकांनी मला गराडा घातला. तेव्हा मला जरा हायसे वाटले. रामकुइंगची म्हणाले, सगळे लोक तुमच्या स्वागतासाठी इथे आले आहेत. आम्ही सगळे खाली उतरलो. गावचे मुखिया त्यांना ‘गावकुरा’ म्हणतात, त्यांनी गावातल्या मुलींना आमचे स्वागत करायला सांगितले. गावातील सर्व लोक आपल्या पारंपरिक वेषात आले होते. त्यांनी आधी लोकरी रंगीबेरंगी फुलांचे हार घातले. नंतर चौघांना त्यांचे पारंपरिक स्कार्फ घातले. मग गावात जाण्यासाठी त्यांची धार्मिक गीते म्हणत वाजत-गाजत आमची मिरवणूक पायी निघाली. संपूर्ण गाव आम्हाला वेशीवरून नेण्यासाठी आला होता. आमच्यासाठी हा एक अलौकिक व अविस्मरणीय अनुभव होता.

त्यांच्या चावडीपाशी, त्याला ‘पाकी’ म्हणतात, तिथे सर्वजन जमा झाले होते. गारठा असल्यामुळे मोकळ्या जागेत लाकडांची मोठी होळी पेटवली होती. सर्व गांवकरी पारंपरिक शाली पांघरून आले होते. सर्वांना तांदळाची दारू देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पारंपरिक नृत्य सुरू झाले. प्रत्येक उत्सवाच्या प्रसंगी असे नियोजन करणे ही त्यांची प्रथा आहे. आपल्या घरात सोलार दिवे येणार, ही घटना कोणत्याही उत्सवापेक्षा कमी नव्हती. त्यानंतर आमच्या काही जणांची भाषणे झाली. ‘सौर दिव्यांनी तुमची घरे आता लवकरच उजळून निघणार आहेत. पुण्यातील नागरिकांनी तुमच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी भरघोस मदत दिली आहे. यामुळे तुमची घरे सौर दिव्यांनी प्रकाशित होतीलच; पण त्याशिवाय आता रॉकेल आणायची तुमची ४० किलोमीटरची पायपीटही वाचणार आहे. याशिवाय चिमणीच्या व लाकडाच्या धुरामुळे होणारे श्वसनाचे व डोळ्यांचे आजार कमी होणार आहेत. या कामाची सुरुवात राणी माँच्या गावापासून करत आहोत, याबद्दल कृतज्ञता वाटते’, असे त्यांना सांगितले.

आम्हाला नंतर ‘राणी माँ पॅलेस’ला नेण्यात आले. राणी माँ पॅलेस म्हणजे खराखुरा राजवाडा नाही, तर एक सर्वसाधारण पत्र्याचे छत असलेले बांबूच्या तट्ट्याचे सर्वसाधारण घर. त्याभोवती अजून तीन झोपड्या आहेत. फक्त राणी माँ येथे राहायच्या, म्हणून राणी माँ पॅलेस. एक झोपडी मध्ये तीन दगडांच्या चुलीभोवती आम्हाला बसवले. सर्व गांवकरी आले होते. ‘मामा, आप लोग दुरसे आया है, आप थक गये होगा. इसलिये आपका पाव को लडकी लोग गरम पानी से मसाज करेगा’, गावबुरा म्हणाले. आम्हाला एकदम संकोचल्यासारखे झाले. आम्ही नाही म्हणालो. पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी एकेकाला छोट्या पाटावर बसवून, त्याचे पाय परातीत ठेवून मुली आमच्या पायावर गरम पाणी टाकून धूत होत्या.

जेवणाचा बेत म्हणजे भात, मसूरच्या डाळीचे पाणी, आले-लसूण-मिरच्या यांच्याबरोबर उकडलेले मासे आणि मोहरीची उकडलेली पाने. पणशीकर शाकाहारी म्हणून त्यांच्यासाठी उकडलेले बटाटे व मोहरीची पाने, असा मस्त बेत जमला होता. तेल, तळण, मसाले हा प्रकार नाही. सर्व काही उकडलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठल्यावर लाल चहा. पूर्वेकडील भाग असल्यामुळे पहाटे पाच वाजता सूर्योदय असतो. लाल चहा म्हणजे गाळण्यावर चहापत्ती ठेऊन त्यावर ओतलेले गरम पाणी. साखर नाही, दुध नाही. परंतु आम्ही येणार म्हणून सांगून ठेवल्याप्रमाणे दुध पावडर व साखर घालून चहा तयार केला होता.

सर्व गावकरी पायकित जमा झाले होते. हरका असोसिएशनच्या एका कार्यकर्त्याला, ज्यांनी एक हजार रुपये दिले होते, त्यांची यादी करायला सांगितली. पॅकिंग उघडून प्रत्येकाच्या यादीप्रमाणे एक सौर पॅनेल व पाच दिवे (एलईडी लाईट्स) द्यायला सांगितले. आता प्रत्येकाची खात्री पटली, की आपल्या घरी सौर दिवे लागणार. प्रत्येकजण आनंदाने ते सगळे सौर पॅनेल व दिवे घेऊन जात होता. काही वेळाने तिथल्या तरुण मुलांना गोळा केले. सौर पॅनेल कसे बसवायचे, कंट्रोल पॅनेल कुठे बसवायचे, वायरिंग कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक पाटसकरांनी दिले.

एक-दोन घरांमध्ये त्यांनी त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्याकडून वायरिंग करून घेतले. त्यांचे समाधान झाल्यावर मग त्यांना इतर घरातून वायरिंग करायला सांगितले. पहिल्या घरात वायरिंग पूर्ण करून तिथले दिवे लागल्यामुळे ती झोपडी अगदी झगझगीत झाली. ते पाहून पाटसकरांना इतका आनंद झाला, की त्यांनी मला घट्ट मिठी मारून, ‘मामा, तुसी ग्रेट हो’, असे म्हणाले. जोशी, पणशीकर हेसुद्धा गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून हरखून गेले. आम्ही घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले होते. मुलांच्या तीन टीम करून त्यांना वायरिंगच्या कामाला पाठवून दिले. गावातील मुख्य ठिकाणी पुण्याहून आणलेले फ्लेक्स लावले. गावात तर अक्षरश: उत्सवाचे वातावरण होते. पाटसकर, जोशी व पणशीकर हंग्रूममधील हुताम्यांचे स्मारक व राणी माँचे पदचिन्ह पाहून आले.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाची व तृप्ततेची झलक दिसत होती. आपल्या घरात इलेक्ट्रिकल दिवा कधीतरी लागेल, हे त्यांचे स्वप्न वास्तवात आले होते. बघता बघता संध्याकाळ झाली. पुन्हा ग्रामसभा भरली. सर्व गावकऱ्यांचे चेहरे उल्हासित होते. लोकनृत्य झाले. ‘मामा आपको रानी माँ का आशीर्वाद है.., उन्होने आपको हमारे लिये भेजा है. आपने हमारे लिये जो काम किया, उससे रानी माँ स्वर्ग में बहुत खुश हुई होगी. आप मरने के बाद राणी माँ आपको स्वर्ग मे मिलेगी और आशीर्वाद देगी’, असे ते म्हणाले. केवढा मोठा आशीर्वाद होता हा..! कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मग आम्हाला भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. भेटवस्तू म्हणून भोपळा, मिरच्या, मुठभर जवस, मोहरी, एक किलो तांदूळ, पालेभाज्या, अंडी, मुठभर घरातील कडधान्य, प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू देत होते. माझे डोळे भरलेले होते. त्यांचे प्रेम व आपुलकी पाहून निशब्द झालो होतो आम्ही. एका अनोळख्या प्रदेशात, अनोळख्या व्यक्तींविषयी इतकी आपुलकी. स्वामी विवेकानंदांचे विचारच देशाला तारक आहेत. माणुसकी हीच ईश्वरपूजा याचा साक्षात्कार इथे झाला. या भागातील विशेषतः नागा जमातीविषयीच्या आमच्या गैरसमजुती दूर होण्यास या लेखाची नक्कीच मदत होईल.

कार्यक्रमानंतर गावात फेरफटका मारताना बऱ्याचशा घरातून चंद्रप्रकाशाचे कवडसे बाहेर आल्यासारखे दिसत होते. संपूर्ण अंध:काराच्या पार्श्वभूमीवर हे एक अलौकिक दृश्य होते. पाटसकर, जोशी, पणशीकर यांना अरुणाचल येथील परशुरामकुंडला जायचे होते म्हणून ते दुसऱ्या दिवशी हाफलांगला गेले. मी हंग्रूमलाच थांबलो. दुसऱ्या दिवशी सर्व गावांतील वायरिंग मुलांनी पूर्ण केले. मी पुन्हा बाहेर पडलो. एका उंच टेकडीवर जाऊन उभा राहिलो. समोर चांदण्यांनी भरलेले आकाश दिसत होते. क्षितिजाची रेषा कुठेच दिसत नव्हती. प्रत्येक झोपडीतून दिसणाऱ्या त्या एलईडीच्या चांदण्या, आकाशातल्या चांदण्यात केव्हाच मिसळून गेल्या होत्या आणि क्षितीज माझ्या पावलापाशी आले होते. माझ्या डोळ्यातल्या अश्रुधारा ते सगळे सामावून घेत होत्या.

पुण्याला परत आल्यावर या उपक्रमासाठी आर्थिक आणि इतरही मदत केलेल्या सर्व देणगीदारांचा एक स्नेहमेळावा घेण्याचे निश्चित केले. त्यांनी दिलेल्या मदतीचे नियोजन करून त्याचा कसा उपयोग केला, हे त्यांना समजणे मला गरजेचे वाटले. सदाशिव पेठेतील मुलांच्या भावे हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा घ्यायचे निश्चित केले. १९ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी चार वाजता हा स्नेहमेळावा घेण्यात आला. प्रोजेक्टरवर स्लाईड शोद्वारे या प्रकल्पाची सर्व माहिती देणगीदारांना दिली व त्यांच्या आर्थिक सहकार्यामुळेच हे शक्य झाले, यासाठी त्यांचे आभार मानले. जरूर पडेल, तेव्हा पुढेही अशाच चांगल्या उपक्रमांसाठी मदतीचे आश्वासन त्या सगळ्यांनी दिले. योगायोगाने त्या दिवशी माझा वाढदिवस होता. माझ्या वाढदिवसाची ही संस्मरणीय भेट होती.
पुढील उपक्रम होता, सायकलवर चालणारे भात सडायचे मशीन करून देण्याचा. त्याचीही रूपरेषा सर्वांना समजावून सांगितली. आपण स्वीकारलेली सामाजिक बांधिलकी व्यवस्थित निभावून नेत होतो. हे सर्व कार्य सत्तरी ओलांडल्यावर करीत होतो हे विशेष.
(क्रमशः)
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५
(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)