Next
शेतकऱ्याच्या जिद्दीने कातळावर पिकले सोने!
अर्धा गुंठा खडकाळ जमिनीत १२५ किलो हळदीचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन
BOI
Wednesday, March 06, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this story

गुहागर : माती नसलेल्या खडकाळ जमिनीवर म्हणजेच कातळावर शेती करण्याचा वेगळा विचार करणाऱ्यांना बऱ्याचदा वेड्यात काढले जाते; मात्र अशा वेगळ्या आणि धाडसी प्रयोगात उत्तम यश मिळाले, की त्याचे समाधान निराळेच असते. वेळणेश्वर (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील शेखर गाडगीळ हे शेतकरी सध्या असेच समाधान अनुभवत आहेत. कातळ भागातील अर्धा गुंठा जमिनीत केलेल्या हळदीच्या लागवडीतून त्यांनी १२५ किलो हळदीचे उत्पादन घेतले आहे.  

कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. प्रचंड वृक्षसंपदा, वेड लावणारे निसर्गसौंदर्य. रत्नागिरी जिल्ह्यात ४८ टक्के भाग हा वनाच्छादित आहे; मात्र दुसरीकडे उजाड कातळही आहे. हा खडकाळ प्रदेश असल्याने त्यावर झाडे नाहीत; मात्र खुरटी झुडपे विरळ स्वरूपात सगळीकडे उगवतात. काही कातळ भाग केवळ पावसाळ्यातील गवताव्यतिरिक्त माळरानासारखे उजाड दिसतात. शासकीय दप्तरी ‘पोटखराबा’ अशी नोंद असलेल्या म्हणजेच लागवडयोग्य नसलेल्या कातळ भागात ‘ब्लास्टिंग’ने खड्डे करून अनेक ठिकाणी हापूसच्या आंबा बागायती उभ्या केल्या आहेत; पण या बागांचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे; पण जिद्द असेल आणि मेहनतीची तयारी असेल, तर कातळातूनही सोने पिकवता येते, हेच गाडगीळ यांच्या या प्रयोगातून दिसून येते.

हळदीचे कंद काढताना महिला.

वेळणेश्वर येथील गाडगीळ यांनी पावसाचे पाणी साठवण्याची धडपड म्हणून १३ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. साठलेल्या पाण्याचा उत्पादक उपयोग करण्यासाठी त्यांचे छोटे-छोटे प्रयोग सुरू आहेत. असलेल्या जागेबाहेरून काही आणायचे नाही (म्हणजे माती वगैरे) जागेत पडणारा पालापाचोळा एकत्र करायचा. त्यावर जीवामृत, अमृतपाणी ओतून त्याचे मातीत रूपांतर  करायचे हे काम गेले अनेक महिने सुरू आहे. या प्रयत्नांना यश आले आणि कातळावर लागवड करता येईल इतकी माती तयार झाली. याच मातीत पालापाचोळ्यावर परसदारातील हळद लागवडीचा प्रयोग गाडगीळ यांनी यशस्वी करून दाखवला आहे.

२०१८च्या जून महिन्यात केवळ अर्धा गुंठा जागेत, हळकुंडापासून तयार केलेल्या ‘एसके-४’ (स्पेशल कोकण) या सचिन कारेकरने विकसित केलेल्या हळदीच्या जातीची लागवड केली. त्यातील १५० रोपे या पालापाचोळ्यावर (मातीविरहित जागेवर), तर ५० रोपे माती असलेल्या जागेवर लावली. लागवडीच्या वेळी केवळ गांडूळखत व दर १५ दिवसांनी जीवामृत घालणे सुरू केले. याव्यतिरिक्त अन्य कोणतेही रासायनिक खत घातले नाही किंवा फवारणी केली नाही. त्यातून आता १२५ किलो ओल्या हळदीचे उत्पादन मिळाले आहे. यामध्ये १०० किलो हळकुंडे व २५ किलो कंद यांचा समावेश आहे. काही गड्ड्यांचे वजन दीड ते दोन किलो एवढे भरले आहे.

‘विशेष म्हणजे मातीत लावलेल्या जागेत केवळ ३२ किलो कंदांसह हळद मिळाली, तर उर्वरित ९३ किलो हळद (१७ किलो कंद व ७४ किलो हळकुंडे)  मातीव्यतिरिक्तच्या जागेत मिळाली. या कातळावर सात ते आठ इंच पालापाचोळ्याच्या थरावर हा प्रयोग यशस्वी झाला असून, पुढच्या लागवडीसाठी मातीसुद्धा तयार झाली आहे. १२५ किलो हळदीपैकी एकही कंद किंवा हळकुंड रोगग्रस्त किंवा खराब निघाले नाही हे महत्त्वाचे. या प्रयोगात कृषी विषयातील जाणकार गजेंद्र पौनीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली,’ असे गाडगीळ यांनी सांगितले.

‘परसदारातील कातळावर केलेला हा छोटा प्रयोग प्रेरक असून, इतक्या प्रमाणात आलेले उत्पादन पाहून त्याचे समाधान वाटले,’ अशी प्रतिक्रिया पौनीकर यांनी व्यक्त केली.

संपर्क : शेखर गाडगीळ- ९४२३७ २९७३८ 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BalkriShna gramopadhye About 16 Days ago
Deserves. More. Publicity . Can. Be. Practised. Almost. Eveverywhere.
0
0
सुधीर भालचंद्र गाडगीळ About 18 Days ago
श्री. शेखर काका, तुझ्या कल्पकतेला, जिद्दीला , व अथक परिश्रमाने पिकविलेल्या पिवळ्या सोन्याला मनापासून सलाम व शुभेच्छा.
0
0
Pratibha Baldota About 18 Days ago
Great job. Keep it up
0
0
Neha gadgil About 18 Days ago
Shekharkaka khupch chan.
0
0
Adv Rahul Risbud About 18 Days ago
Congratulations for your achievement and hats off to your hard work. I really feel proud of your work.
0
0
गजेंद्र पौनीकर About 19 Days ago
आमच्या छोट्या प्रयोगांचे वृत्त 'Bytes of India' मध्ये प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद.
2
0

Select Language
Share Link