Next
‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’
मानसी मगरे (manasee.magare@myvishwa.com)
Saturday, September 08 | 01:00 PM
15 0 0
Share this story


आरत्यांमध्ये हमखास चुकीच्या म्हटल्या जाणाऱ्या शब्दांवर कोटी करणारे संदेश हल्ली सोशल मीडियावर फिरत असलेले दिसतात. अशाच काही संदेशांवरूनच पुण्यातील सायली दामले यांना एक भन्नाट कल्पना सुचली. प्रबोधनाचा उद्देश ठेवून त्यांनी या चुकीच्या शब्दांना गंमतशीर चित्रांमध्ये उतरवलं. ‘उच्चारण’ या नावाने सुरू केलेली प्रबोधनाची ही अनोखी संकल्पना लोकांच्या पसंतीला उतरली आहे. या अनोख्या संकल्पनेबद्दल...
....................
गणपती आल्यावर आरत्यांमधल्या चुकीच्या शब्दांवर विनोद करणारे मेसेज व्हायरल होतात. त्यात विनोद असला, तरी होणाऱ्या बहुतांश चुका त्यात नेमकेपणाने वर्णन केलेल्या असतात. ‘ओवाळू आरत्या कुरवंड्या येती’ याऐवजी ‘सुरवंट्या येती’ असं म्हटलं जातं... किंवा ‘फणिवरबंधना’ याऐवजी ‘फळीवर वंदना’ असं म्हटलं जातं. हे चुकीचं आहे हे लक्षात राहण्यासाठी समोर खरोखरच सुरवंट येऊन उभा राहिला तर... किंवा फळीवर बसलेली वंदना स्वतःच तसं म्हणू नका, असं सांगत असली तर... हसूही येईल आणि चूक कायमची लक्षातही राहील ना!... पुण्यातल्या सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या सायली भगली-दामले यांनी नेमकं हेच केलं. आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी या चुकांना क्रिएटिव्ह चित्रांच्या माध्यमातून समोर आणलं आहे. त्यांची प्रबोधन करणारी ही चित्रं लोकांनाही भरपूर आवडली आहेत.

सायली भगली - दामलेसॉफ्टवेअर अभियंता असलेल्या सायली दामले डिझायनिंगच्या क्षेत्रात काम करतात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या, आरतीतल्या चुकीच्या शब्दांवर भाष्य करणाऱ्या विनोदी संदेशांवरून त्यांना यावर काहीतरी ‘क्रिएटिव्ह’ करता येईल, अशी कल्पना सुचली. स्वतःचा डिझायनिंगच्या कामातला अनुभव आणि आवड यांची सांगड घालून त्यांनी या संकल्पनेवर काही चित्रं तयार केली. 

ही चित्रं बनवण्यामागची त्यांची अगदी साधी-सरळ भूमिका आणि गंमतीचा भाग म्हणून त्या हे सगळं करत असल्याचा संदेश त्यांनी एक सप्टेंबरला त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला. सोबत त्यांनी रेखाटलेली चित्रंही पोस्ट केली. त्यांची ही संकल्पना लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरली. आठच दिवसांत शेकडो जणांनी ती चित्रे लाइक आणि शेअर केली आहेत. त्या चित्रांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. 

ही चित्रं काढण्यामागची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सायली यांनी लिहिलं आहे, ‘ठराविक वेळेलाच घंटा जोरात वाजवता वाजवता, प्रसंगी ताटलीवर चमचा वाजवता वाजवता किंवा एकदम एकाच क्षणी जोरात टाळी वाजवून किती लोकांनी अगदी कॉन्फिडंटली चुकीचे शब्द वापरून आरती म्हटली आहे? खरं तर मी ही त्यातलीच एक... ‘पुलं’ म्हणतात, तसं, संस्कृत ही देवांची मातृभाषा जरी असली, तरी देवांना उत्तम मराठी येत असणारच. ‘लव लवती विक्राळा’ म्हणताना आपण जरी डोळे मिटले असले, तरी ‘शंकर’रावांनी एक भला मोठा कन्फ्युज लूक दिला असेलच, असं आपलं मला कायम वाटत आलंय...! आणि म्हणूनच माझ्यासारख्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठी ही काहीतरी मजेशीर संकल्पना मला सुचली.’ 

‘खरं तर या सगळ्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विचार मी मुळीच केला नव्हता... मीच तयार केलेली चित्रं जेव्हा लोकांनी मलाच मेसेज केली, तेव्हा ते पाहून आलेलं फीलिंग खूप भन्नाट होतं. सामाजिक माध्यमातून आलेल्या या संदेशाचं हे स्वैर कलात्मक रूप असून यामागे कोणाच्याही वैयक्तिक भावना दुखावण्याचा किंवा त्यांची चेष्टा करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.  

फावल्या वेळात सायली यांनी केलेल्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाल्यानं त्यांचा यातला उत्साह वाढला आणि यात आणखी काही नवीन करता येईल का, यावर त्यांनी विचार केला. नुसती चित्रं न काढता, ती चित्रं असलेल्या की-चेन, टी-शर्ट, फ्रिज मॅग्नेट अशा काही वस्तूही त्यांनी ‘उच्चारण’ या मालिकेअंतर्गत आणल्या. इतकंच नाही, तर या संकल्पनेतून रेखाटलेल्या चित्रांचा वापर करून लग्न अथवा इतर समासंभाच्या पत्रिका, विविध प्रसंगी दिली जाणारी शुभेच्छापत्रं अशा कैक गोष्टी त्यांनी तयार केल्या आहेत. मागणीनुसार या सर्व वस्तू उपलब्ध करून देण्याची सुविधा त्या देत आहेत. गणपतीप्रमाणेच पुढे नवरात्र आणि दिवाळी या सणांच्या निमित्तानं ‘उच्चारण’मार्फत काहीतरी कलात्मक करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Radhika Kulkarni About 66 Days ago
अतिशय चांगली कल्पना! चित्रांद्वारे प्रबोधन!
0
0

Select Language
Share Link