Next
‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण’
डॉ. संदीप पटवर्धन यांचे मत
BOI
Thursday, October 04, 2018 | 06:07 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारामध्ये आर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपीची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे शरीराची हालचाल सुधारण्यास मदत होते’, असे मत संचेती हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक आर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटवर्धन यांनी व्यक्त केले. 

येत्या शनिवारी, सहा  ऑक्टोबर रोजी ‘सेरेब्रल पाल्सी दिना’च्या निमित्ताने संचेती हॉस्पिटल येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देताना ते बोलत होते.  ‘हा कार्यक्रम सकाळी साडे नऊ वाजता सुरू होणार असून, यामध्ये आर्थोपेडिक पेडियाट्रिक सर्जन,फिजिओथेरपीस्ट,क्रीडा प्रशिक्षक,आहारतज्ञ,थेरपीस्ट,शिक्षणतज्ञ आदी या विषयावर मार्गदर्शन करतील’, असे ही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, ‘सेरेब्रल पाल्सी हा मेंदूशी निगडीत विकार असून, त्यामुळे लहान मुलांमध्ये हालचाल आणि स्नायूंची स्थिती यांवर परिणाम होतो. सेरेब्रल पाल्सी हा विकार बरेचदा बालकाच्या जन्माआधी किंवा जन्मवेळी किंवा जन्म झाल्यावर लगेचच मेंदूला झालेल्या इजेमुळे होऊ शकतो. हा विकार जरी वयाबरोबर वाढत नसला तरी,मूल जसजसे मोठे अणि उंच होते,त्याचे स्नायू कडक होतात आणि त्याला त्याचा योग्य वापर करता येत नाही.यामुळे बालकाच्या  सामान्यपणे चालणे,बसणे आणि उभे राहण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. या कडक किंवा ताठ झालेल्या स्नायूंना लहान वयातच फिजिओथेरपी, स्ट्रेचिंग, योग्य प्रशिक्षित पुर्नवसन यांच्या मदतीने आराम देणे गरजेचे आहे. बालकाच्या तीन ते पाच  वर्षांच्या वाढीमध्ये स्नायूंवर उपचार करण्यासाठी साधारणत: बोटूलिनम इंजेक्शन्स दिली जातात आणि त्याचसोबत प्लास्टर्सच्या मदतीने आम्ही स्नायूंना त्यांच्या सामान्य स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो.यामुळे बालकाचे पाय,गुडघे योग्य स्थितीमध्ये येण्यास मदत होते व ते बालक कॅलिपर,ब्रेसेस किंवा वॉकरच्या मदतीने उभे राहू शकते किंवा चालू शकते.  बालकाचे वय वाढत जाते तसे हा दोष दूर करण्यासाठी आणि सांध्यांना स्थिर करण्यासाठी पहिली शस्त्रक्रिया सात ते दहा वर्षादरम्यान करण्याची गरज भासू शकते. ज्यामुळे बालकाला हालचालीमध्ये सुधारणा दिसू शकते.त्यानंतर १४  ते  १६ वर्षे वयादरम्यान स्नायू सैल करण्यासाठी व निर्माण झालेली विकृती दूर करण्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया केली जाऊ शकते,ज्यामुळे त्या बालकाची हालचाल अगदी सामान्याच्या आसपास पर्यंत होऊ शकते.’

‘सेरेब्रल पाल्सी हा मेंदूचा विकार असला तरी,त्यामुळे स्नायू हे ताठ होतात व विकृती निर्माण होते त्यामुळे १६ वर्षापर्यंत वाढते वय असते त्या संपूर्ण कालावधीमध्ये फिजिओथेरपी व आर्थोपेडिक उपचाराचा समावेश असतो. हालचालींच्या नियंत्रणाबाबत मेंदूचे नुकसान झाले असले, तरी या बालकांमध्ये इतरांसारखीच सामान्य बुध्दिमत्ता व कार्यक्षमता असते आणि ते इतरांबरोबरच शाळांमध्ये जाऊ शकते.आर्थोपेडिक उपचारांमुळे बालकाला अधिक स्वातंत्र्य मिळण्यामध्ये मदत होते; तसेच घरात व शाळेत हालचाली करण्याच्या क्षमतेत सुधारणा होऊ शकते.त्यामुळेच सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये आर्थोपेडिक शस्त्रक्रियांची भूमिका महत्त्वाची असते’, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारात बॅकलोफेन पंप व मल्टीलेव्हरल सिंगल इव्हेंट सर्जरीज यामुळे सेरेब्रल पाल्सीच्या उपचारात आमुलाग्र बदल झाले आहेत आणि या उपचार पध्दतींमुळे हे रुग्ण जवळपास सामान्यांसारखेच चालू शकतात. या सर्व उपचारांदरम्यान पालकांचे समुपदेशन होणे गरजेचे असून, त्यांना सर्व प्रकारे सहकार्य मिळणे गरजेचे आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search