Next
क्या खूब लगती हो...
BOI
Sunday, April 28, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अभिनेते फिरोज खान यांचा स्मृतिदिन २६ एप्रिलला होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘धर्मात्मा’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील ‘क्या खूब लगती हो...’ या गीताचा...
...........
भरदार शरीरयष्टी, पुरेपूर उंची, देखणा चेहरा, गोरापान रंग अशी शरीरसंपदा आणि तंग पँट, शर्टाची वरची दोन बटणे न लावलेली, डोक्याला हॅट, हातात पिस्तुल किंवा सिगारेट अशा वर्णनाचा हिरो १९७० ते १९८०च्या दशकात फिरोज खान या नावाने चित्रपटप्रेमींपुढे येत राहिला आणि अमिताभ, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा असे एकापेक्षा एक दिग्गज असतानाही ‘खोटे सिक्के’ घेऊन बाजी मारणारा नायक बनून गेला व ‘जीवन में तू डरना नहीं, सर नीचा कभी करना नहीं’ असे पडद्यावर गात जगण्याची पद्धत सांगत गेला. 

हिंदी चित्रपटसृष्टीतीतील एके काळचा वेस्टर्न स्टाइलचा हिरो फिरोज खान याला या जगातून जाऊन गेल्या २६ एप्रिलला दहा वर्षे झाली. फिरोज खानचे व्यक्तिमत्त्व अनेक नायकांच्या गर्दीत हरवून जाणारे नव्हते आणि फार भव्य, दिव्य, आदर्श अशा त्याच्या चित्रपटांच्या स्मृतीही नाहीत. तरीही तो दखल घेण्याजोगा कलावंत होता, निर्माता होता व दिग्दर्शकही होता. 

अफगाणिस्तानच्या सादिक अली खान या पठाणांच्या चार मुलांपैकी हा एक मुलगा! बेंगळुरूला प्रारंभीचे शिक्षण झाल्यावर मुंबईत आला. पठाण जमातीला शोभेल अशी उंची व शरीरयष्टी आणि लालसर गोरा असा देखणा चेहरा याच्या साह्याने आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील हिरो सहजासहजी बनून जाऊ, असे त्याला त्या सुरुवातीच्या काळात वाटले. सिनेमाची आवडही होती. परंतु भविष्यात मोठा निर्माता, दिग्दर्शक होण्याआधी त्याला कठीण परिस्थितीतून तावून सुलाखून निघायचे होते. 

त्यामुळेच १९५७च्या ‘जमाना’ चित्रपटात वयाच्या १८व्या वर्षी एक छोटीशी भूमिका त्याला मिळाली व त्याची परीक्षा सुरू झाली. साइड अॅक्टर म्हणूनच १९६०चा ‘दीदी’ चित्रपट मिळाला. त्या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत ‘फिरोज’ एवढेच नाव आपणाला दिसते. फिरोज खान हे नाव १९६४च्या सॅमसन या स्टंटपटात दिसून आले. त्याच दरम्यान पाश्चात्य चित्रपट कंपनीच्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटात एक छोटी भूमिका त्याला मिळाली. नियती टाकील ती दाने तो स्वीकारत गेला. आणि १९६४च्या ‘चार दरवेश’ चित्रपटात तो चक्क नायक झाला. सईदा खान त्याची नायिका होती; पण तोही स्टंटपट असल्याने एका विशिष्ट चित्रपट चाहत्यांपुरता हा नायक मर्यादित राहिला. १९६५मध्ये त्याने साकारलेला नायक ‘एक सपेरा एक लुटेरा’ चित्रपटातून दिसून आला व येथे त्याच्या तोंडी चक्क मोहम्मद रफी यांनी गायलेले, उषा खन्ना यांच्या संगीतातील ‘हम तुमसे जुदा ...’ हे सुंदर गीत होते. 

त्यानंतर मात्र त्याचे दैव त्याला अनुकूल झाल्यामुळे त्याला ‘उँचे लोग’ हा चित्रपट मिळाला. फणी मुजुमदारसारखा कुशल दिग्दर्शक, तसेच अशोक कुमार, राजकुमारसारखे मोठे कलावंत, चित्रगुप्त यांच्या संगीतातील श्रवणीय गीते हे ‘उँचे लोग’चे वैशिष्ट्य होते. त्या चित्रपटात फिरोज खान ज्युनिअरच होता; पण ‘जाग दिले दिवाना...’सारखे गीत त्याला मिळाले होते. या चित्रपटानंतर असा सहनायक म्हणून तो आदमी और इन्सान, आरजू, सफर अशा चित्रपटांकरिता निवडला गेला. १९६७च्या ‘औरत’ चित्रपटात राजेश खन्ना, पद्मिनी, प्राण असे कलावंत होते. तेथेही फिरोज खान होता. 

आपल्याला चित्रपटसृष्टीत पाय रोवून उभे राहायचे आहे, हे त्याने पूर्ण लक्षात घेतले होते. त्यामुळेच सहनायक, नायक असे भूमिकेतील भेद विचारात न घेता तो कामे स्वीकारत गेला. चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन यामधील बारकावे शिकत गेला. त्याचा भाऊ संजय खानही चित्रपटसृष्टीत आला होता. उपासना, मेला, नागीन असे फिरोज खानचे चित्रपट येत राहिले. 

१९६९मध्ये तो स्वतःच निर्माता बनला आणि त्याने ‘अपराध’ हा चित्रपट निर्माण करण्यास प्रारंभ केला. एफ. के. इंटरनॅशनल ही स्वत:ची चित्रपट कंपनी त्याने स्थापन केली. या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याने स्वतःच केले. तीन वर्षे चित्रपट निर्मितीत गेली व १९७२मध्ये तो प्रदर्शित झाला. नायक, निर्माता, दिग्दर्शक अशा तीन बाजू फिरोज खानने सांभाळल्या. मुमताज ही त्या वेळी क्रेझ असलेली नायिका घेतली. कल्याणजी-आनंदजींचे संगीत निवडले. ‘अपराध’ यशस्वी ठरला. 

फिरोज खानने हिरॉइनचे रूप बदलले व चित्रपटाच्या हिरोला स्टायलिश केले. त्यामुळेच त्याला खोटे सिक्के, काला सोना यांसारखे अन्य निर्मात्यांचे चित्रपट मिळत गेले व तो हिंदी चित्रपटांमधील दखल घ्यावी असा नायक बनला. तरी त्याच्या चित्रपटांची संख्या प्रचंड झाली असे नाही. स्वत: निर्माण केलेल्या ‘अपराध’ चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे प्रोत्साहित होऊन फिरोज खानने ‘गॉडफादर’ या इंग्रजी चित्रपटाचे कथानक घेऊन त्याला भारतीय साज चढवून ‘धर्मात्मा’ हा चित्रपट तयार केला. अफगाणिस्तानमध्ये चित्रीकरण झालेला हा पहिला हिंदी चित्रपट! तसेच त्या देशातील ‘बुझकशी’ हा घोड्यांचा प्रसिद्ध खेळही फिरोज खानने या चित्रपटात दाखवला होता. नायकाची भूमिका त्याने स्वतःच केली व हेमा मालिनी व रेखा अशा टॉपच्या नायिका, शिवाय प्रेमनाथ, डॅनी, दारासिंह असे कलावंत घेऊन, हा गुन्हेगारी जगतावरचा चित्रपट लोकप्रिय होण्याकरिता पुन्हा एकदा कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताचाही आधार घेतला गेला. मुकेश, किशोर, महेंद्र कपूर, लता मंगेशकर, कंचन यांनी गायलेली सहा गीते हे या चित्रपटाचे आकर्षण होते. ‘धर्मात्मा’ चालला हे वेगळे सांगणे नकोच!

आणि ‘धर्मात्मा’नंतर कुर्बानी, जाँबाज, दयावान, येलगार असे गुन्हेगारी पार्श्वभूमीवरचे चित्रपट त्याने निर्माण केले. ‘आम पब्लिक’करिता आवश्यक असा सेक्स, थ्रिल, फायटिंग असा मालमसाला भरलेले हे चित्रपट फिरोज खानला पैसा मिळवून देऊन गेले. यातच ‘कुर्बानी’मधील नाजिया हसनने गायलेल्या ‘लैला ओ लैला...’ गाण्याने धुमाकूळ घातला. फिरोज खानच्या चित्रपटातील गीते हा चर्चेचा विषय ठरला. नायिकेचे अल्प वस्त्रांतील दर्शन गाण्यांच्या वेळी घडवण्याने ‘हम तुम्हे चाहते है ऐसे...’सारखे गीत श्रवणीय असूनही ‘दर्शनीय’ म्हणून ओळखले गेले. ‘तुमने किसी से कभी प्यार किया है...’सारखे गीत बरे होते; पण बाकी गीतांचा भरणाच जास्त होता. 

‘येलगार’नंतर ब्रेक घेऊन १९९८मध्ये फिरोज खानने आपला मुलगा फरदीन खान याला नायक बनवून ‘प्रेम अगन’ हा चित्रपट तयार केला. नंतर ‘जानशीन’ निर्माण केला. मुलगा यशस्वी ठरला नाही; पण ‘बेस्ट न्यूकमर’चे पुरस्कार त्याला मिळाले होते. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फिरोज खान यांनी ‘वेलकम’ हा मालमसाला ठासून भरलेला चित्रपट सादर केला! 

आता हा उमदा, देखणा पठाण कॅन्सरच्या त्रासामुळे हैराण होऊ लागला होता. १९८०च्या ‘कुर्बानी’चा रिमेक करण्याची तयारी त्याने चालवली होती; पण ती अर्धीच राहिली आणि २६ एप्रिल २००९ रोजी तो कॅन्सरच्या त्रासातून आणि या दुनियेतून मुक्त झाला. 

‘सुनहरे गीत’मध्ये त्याच्या चित्रपटातील गीत येऊ शकते का? हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतांचा सुवर्णकाळ १९७०च्या दशकात राहिला नव्हता, तरी काही काही गीतकार, संगीतकार मधुर गीते देतच होते. तो इतिहास स्वतंत्ररीत्या मांडावा लागेल. येथे फक्त एवढेच नमूद करू इच्छितो, की फिरोज खानने चित्रपट निर्मिती सुरू केल्यावर त्याच्या चित्रपटांत दोन-तीन तरी गीते मधुर चालींची आणि स्मरणीय अशी होती. त्यातीलच एक गीत म्हणजे १९७५च्या ‘धर्मात्मा’मधील ‘क्या खूब लगती हो...’ हे गीत होय!

मुळात कल्याणजी-आनंदजी यांची मोहक व सहज गुणगुणता येणारी चाल, आकर्षक वाद्यमेळ, त्यामध्ये गीतकार इंदिवर यांनी बसवलेले साधे-सोपे शब्द व त्यातून साधलेला प्रेमिकांचा संवाद! मुकेशजींचा सुंदर आवाज, सोबत कंचन यांचा नाजूक स्वर! महत्त्वाचे म्हणजे ‘क्या खूब लगती हो...’ हे जिला खऱ्या अर्थाने म्हणता येईल ती ‘ड्रीम गर्ल’ पडद्यावर, सोबत देखणा फिरोज खान! या सर्वांमुळे गीत ‘सुनहरे’ ठरू शकते, असे मला वाटते. बघा - ऐका - तुम्हीही ताल धरू लागाल आणि गुणगुणू लागाल - 


कोणत्या स्त्रीला तिच्या सौंदर्याची तारीफ केलेली आवडत नाही? त्यामुळेच येथे नायक जेव्हा ‘हे सुंदरी, तू खरोखरच छान दिसतेस, किती सुंदर दिसतेस’ असे म्हणतो, तेव्हा नायिका म्हणते - 

कंचन - फिरसे कहो, कहते रहो, अच्छा लगता है 
जीवन का हर सपना अब सच्चा लगता है

पुन्हा म्हण, म्हणत राहा, तुझे हे म्हणणे चांगले वाटते. जीवनात पाहिलेले प्रत्येक स्वप्न आता सत्यात उतरत आहे, हे जाणवते आहे. 

प्रियकराला हे सांगून त्याच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी ती पुढे विचारते - 

कंचन - तारीफ करोगे कब तक, बोलो कब तक 

माझी ही अशी स्तुती/तारीफ कधीपर्यंत करणार आहेस? सांग ना ते! 

तिच्या या प्रश्नावर तो लगेच सांगतो - 

मुकेश - मेरे सीने में साँस रहेगी जब तक

माझा श्वासोच्छ्वास चालू आहे, तोपर्यंत मी तुझी तारीफ करत राहणार आहे. त्याचे उत्तर ऐकून ती पुढे त्याला छेडते - 

कंचन - कब तक मैं रहूँगी मन में, हाँ मन में

मी कधीपर्यंत/किती काळ तुझ्या मनात राहणार आहे, हे सांग ना!

यावर ‘तो’ सांगतो - 

मुकेश - सूरज होगा जब तक नीले गगन में 

निळ्या आकाशात जोपर्यंत सूर्य असणार आहे, तोपर्यंत तू माझ्या मनात राहशील!

साधा साधा हा प्रेमसंवाद संगीतकार श्रवणीय बनवतो. पुढच्या कडव्यात - 

मुकेश - खुश हो ना मुझे तुम पा कर, हाँ मुझे पाकर’
कंचन - प्यासे दिल को आज मिला है सागर 
मुकेश - क्या दिल में है और तमन्ना 
कंचन - हर जीवन में तुम मेरे ही बनना 

असा साध्या शब्दांतील चार ओळींचा संवाद! ‘मी मिळाल्यामुळे, मला प्राप्त करून घेतल्यामुळे तू आनंदी आहेस ना?’ या ‘त्याच्या’ प्रश्नावर ‘ती’ म्हणते, ‘माझ्या तृषार्त मनाला आज तुझ्या प्रेमाचा सागर मिळाला आहे.’ तिचे हे उत्तर ऐकल्यावर ‘तो’ पुढे विचारतो ‘तुझ्या मनाची अजून काय इच्छा आहे?’ यावर ‘ती’ म्हणते - ‘प्रत्येक जीवनात तूच माझा साथीदार असावास.’ 

अशा दोन कडव्यांत पुन्हा पुन्हा ‘फिरसे कहो, कहते रहो’ ही ओळ घेऊन हे गीत सुंदर बनले आहे. अफगाणिस्तानातील दृश्ये, माउथ ऑर्गन हातात धरून फिरवणारी सौंदर्यवती हेमा मालिनी! नेत्रसुख व श्रवणाचे सुख देणारे सुनहरे गीत फिरोज खान यांच्या स्मृती जागवणारे!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Smita janwadkart About 144 Days ago
The best article
0
0
Rajiv Lawanghare, satara, Maharashtra. About 145 Days ago
Very nice &informative article. 🌷🌷🌷
0
0
जनार्दन अनपट .. सातारा रोड (सातारा) महाराष्ट्र About 145 Days ago
फारच छान लेख,,
0
0

Select Language
Share Link
 
Search