Next
‘फक्त बोलू नका, सकारात्मक बदलाचे दूत व्हा’
साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Saturday, December 29, 2018 | 05:58 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘भोवताली बोलणारी माणसे जास्त आहेत आणि कृतीशीलतेची कमतरता आहे. अशा वातावरणात कृतीशील होऊन सकारात्मक बदलासाठी प्रत्येकाने काम करून सकारात्मक बदलाचे दूत व्हावे,’ असे आवाहन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (एमसीई) आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’चे वितरण २८ डिसेंबरला डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना  संस्थेच्या असेम्ब्ली हॉलमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘एमसीई’चे सोसायटी अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. या वर्षी डॉ. इनामदार यांनी ७४ व वाढदिवस साजरा केला. हे या सन्मान सोहळ्याचे दहावे वर्ष होते. सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, रोख रक्कम असे या सन्मानाचे स्वरूप होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचा परिसर हा व्यवस्थेने नाकारलेल्यांना उत्तम शिक्षण देणारा कॅम्पस आहे. भारत कसा असावा, याचे हे प्रारूप आहे. डॉ. पी. ए. इनामदार हे सर सय्यद खान यांची शिक्षण परंपरा चालवत आहेत. ते शिक्षणाचा वसा घेतलेले द्रष्टे व्यक्तिमत्व आहे. मुस्लिम मागासांसाठी अजून शिक्षण संस्था आणि डॉ. पी. ए. इनामदार यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे आणि अशा कृतीशील कार्यकर्त्यांचा गौरव करणारे आहेत, याची खात्री या कार्यक्रमाने पटली.’

गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे माजी धर्मादाय आयुक्त आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक शिवकुमार दिघे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, यशदा जलसाक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव, दंत शल्य चिकित्सक डॉ. जे. बी. गारडे यांना डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मानने गौरविण्यात आले.

पश्चिम घाटातील पर्यावरणस्नेही पर्यटनासाठी किशोर धारिया यांना, ग्रामीण भागातील उद्योग संधी निर्माण करण्यासाठी राजेंद्र आवटे यांना आणि वेस्ट रिसायकलिंगसाठी संजय भंडारी यांना डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता दशकपूर्ती सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत सहकाऱ्यांसाठी असलेल्या डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बूटवाला आणि महाविद्यालयाच्या ऑफीस सुप्रीटेंडेंट जुलेखा शेख यांना प्रदान करण्यात आला. संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले. लतीफ मगदूम यांनी आभार मानले. या वेळी सर्व सन्मानार्थींनी मनोगत व्यक्त केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link