Next
तुम्ही व्यायामशाळेत जाता का..?
BOI
Wednesday, March 14, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


आजकाल तरुणांमध्ये व्यायामशाळेत जाण्याचे फॅड वाढल्याचे दिसते. हल्लीच्या अद्ययावत व्यायामशाळा म्हटले, की तिथे स्पिनिंग, झुंबा, पावर योगा, अॅब्स अशा विविध प्रकारच्या व्यायामाच्या बॅचेस असतात. काहीही विचार न करता, कोणाचाही सल्ला न घेता, ‘पैसे वसूल झाले पाहिजेत’, या आवेगात बऱ्याच चुका होतात... यासाठीच ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या व्यायामशाळेतील चुकांबद्दल...
........................................                       
उत्तम आरोग्यासाठी व्यायामाची नितांत गरज असते, यात कोणाचेच दुमत होणार नाही धावपळीच्या जीवनशैलीत व्यायामशाळेत जाऊन नियमित व्यायाम होतो, कारण आपण तिथे पैसे भरलेले असतात अशी विचारसरणी आता रुजून जुनी झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आजकाल दिवसेंदिवस नवीन व्यायामशाळा उघडताना दिसत आहेत. या व्यायाम शाळांमधल्या अनेक आकर्षक सवलती आपल्याला आकर्षित करतात. व्यायामशाळांची अंतर्गत सजावटपण भुरळ घालते. 

ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण व्यायामशाळेत जायला लागतो. तेथील वातावरणाने भारावून जातो व आता किती व्यायाम करू, अन किती नको असे आपल्याला होते. अद्ययावत व्यायामशाळा म्हटले, की तिथे स्पिनिंग, झुंबा, पावर योगा, अॅब्स अशा विविध प्रकारच्या व्यायामाच्या बॅचेस असतात. काहीही विचार न करता, कोणाचाही सल्ला न घेता, ‘पैसे वसूल झाले पाहिजेत’, म्हणून रोज ज्या चुका बहुतेकजण करतात, त्या आधी पाहू या.. 

- रोज व्यायामशाळेत मशीनवर भरपूर वजन उचलून व्यायाम करायचा आणि नंतर एक तास झुम्बा किंवा स्पिनिंगची बॅच करून एकूण दोन तास अतिश्रमाचे व्यायाम करायचे.   

- सकाळी लवकर येणारे लोक रिकाम्या पोटी येतात ही दुसरी मोठी चूक. व्यायामाला येण्यापूर्वी खाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते. कधी, किती व काय खायचे हे माहित असणे आवश्यक आहे.

- व्यायामशाळेच्या आत, भिंतींवर बॉडी बिल्डर्सचे व्हिडिओ किंवा क्लिप्स लावलेले असतात. त्या बघून स्वत:वर परस्पर प्रयोग करणे.

- एकमेकांचे बघून किंवा इतर लोक काय करतात, ते पाहून व्यायाम करणे व प्रशिक्षकाची मदत न घेता आपापसांत मित्रांची मदत घेऊन चुकीचे व्यायाम करणे.

- इंटरनेटवर खूप प्रकारचे डाएट उपलब्ध असतात. काही डाएटचे प्रकार खूपच अघोरी असतात, काही डाएट चटकन वजन कमी करणारे, तर काही वजन वाढवणारे असतात पण ह्या सर्व प्रकारच्या डाएटमध्ये खूप गोष्टींचा समावेश असतो, ज्याचा अजिबात विचार केला जात नाही. याचे नंतर वाईट परिणाम भोगावे लागतात.  

- पूरक घटक, प्रथिने, जीवनसत्व व खनीजांच्या वेगवेगळ्या गोळ्या वापरतांना त्यांची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते. या गोळ्या कोणी, किती व केव्हा घ्याव्यात, कोणी घेऊ नये यावर जराही विचार होताना दिसत नाही.

- प्रशिक्षित शिक्षक असणे, ही व्यायामशाळेची पहिली महत्त्वाची जबाबदारी असायला हवी. आपल्याला तब्येतीच्या काही तक्रारी असल्यास, त्याची आधीच कल्पना देऊन ठेवणे गरजेचे असते, पण याविषयी लोक म्हणावे तेवढे जागरूक नाहीत.

- व्यायामशाळेतील आरसे हा ही एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आरशामध्ये बघून व्यायाम करताना आपली शारीरिक स्थिती त्यानुसार  बरोबर आहे का?  हे तपासायचे असते. ती चूकीची होत असल्यास अचूक करण्यासाठी ह्या आरशांचा उपयोग करायचा असतो.   

- व्यायाम करताना अतिकर्कश्श, हाय बिट्स संगीत लावणेही धोकादायक ठरू शकते. व्यायाम करताना आधीच आपल्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. त्यात अशा कर्कश्श संगीतामुळे रक्तदाबात वाढ होऊ शकते.

- व्यायामाच्या बाबतीत विद्यार्थ्यांकडून अत्यंत दुर्लक्षित घटक असतो, तो म्हणजे अस्वच्छ कपडे व बूट. यांमुळे त्वचा विकारांची शक्यता बळावते. 

व्यायामाशी संबंधित हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्यायामशाळेत जाणाऱ्यांनी या चुका कशा टाळता येतील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पुढील लेखात यावर आणखी तपशीलवार विचार करू या.  आपल्या शरीरावर अशा गोष्टींचा विपरीत परिणाम होत असतो. त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे असे काही होण्याआधीच सावधानता बाळगलेली उत्तम ठरते.   

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link