Next
‘मनोरुग्णांना प्रेमाने आधार देण्याची गरज’
पुण्यातील हृद्य सोहळ्यात उलगडला डॉ. भरत वाटवानींचा प्रेरक प्रवास
प्राची गावस्कर
Wednesday, September 26, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this story

यंदाचे मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. भरत वाटवानी यांचा ‘पूना सिटीझन डॉक्टर्स फोरम’च्या वतीने आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे : ‘मनोरुग्णांना औषधांबरोबर गरज असते ती मायेची. नेमके तेच आपल्या समाजात होत नाही. अशा रुग्णांना झिडकारले जाते. स्किझोफ्रेनियासारखे मानसिक आजार कोणालाही होऊ शकतात. याची जाणीव नसल्याने समाज अत्यंत असंवेदनशीलपणे त्यांच्याशी वागतो; मात्र त्यांना गरज असलेली माया त्यांना द्यायला हवी,’ असे आवाहन यंदाचे मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. भरत वाटवानी यांनी केले. २५ सप्टेंबर २०१८ रोजी ‘पूना सिटीझन डॉक्टर्स फोरम’च्या (पीसीडीएफ) वतीने आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची प्रकट मुलाखतही घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. त्यामुळे समाजसेवक म्हणून कार्यरत असलेले आणि मॅगसेसे पुरस्कारविजेते तीन डॉक्टर एकाच वेळी व्यासपीठावर असण्याचा योग जुळून आला होता.

आमटे दाम्पत्याच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि कृतज्ञतापत्र देऊन डॉ. भरत वाटवानी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘पीसीडीएफ’चे डॉ. अरुण गद्रे, डॉ. अनंत फडके उपस्थित होते. सत्कारानंतर ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे आणि डॉ. शारदा बापट यांनी डॉ. वाटवानी यांची प्रकट मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. सभागृह खचाखच भरल्यामुळे बाहेरही अनेक लोक उभे होते.

‘त्या चार लाख जणांपर्यंत पोहोचायचंय’
मुलाखतीदरम्यान डॉ. वाटवानी यांचा प्रवास उलगडला. ‘मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत असताना एका रुग्णाला बघून हेलावलो आणि या कामाची सुरुवात झाली. असा एक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, जिथे तुम्ही मागे वळून पाहता आणि वेगळे काही करू इच्छिता. गटारातील पाणी पिणारा एक मनोरुग्ण मी पाहिला आणि परत आलो, त्याला उपचारांसाठी आणले. तिथून कामाची सुरुवात झाली. हे काम मी पुढे न्यावे, यासाठी बाबा आमटे यांनी मला प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. आज तब्बल चार लाख मनोरुग्ण रस्त्यांवर आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे हेच माझे ध्येय आहे,’ असे ते म्हणाले.

‘बाबा आमटेंकडून प्रेरणा’
अनेक हृदयस्पर्शी अनुभव डॉ. वाटवानी यांनी सांगितले. ‘मनोरुग्णांच्या सेवेच्या बाबा आमटे यांच्या इच्छेतून मी व माझी पत्नी डॉ. स्मिता यांनी ठरवून मनोरुग्णांसाठी काम करण्याचे ठरवले. बाबांनी अनेकांना त्यांच्या कार्यातून प्रकाशाचे बेट तयार करून दिले. तसेच मदर तेरेसा यांच्यापासूनही प्रेरणा मिळाली. समाजासाठी काम करणारी प्रत्येक व्यक्ती नेहमीच असमाधानी असते. तसे बाबा आमटे होते. आयुष्याच्या एका वळणावर खूप निराश झाल्यानंतर काही प्रेरणाकेंद्रांना मी भेट दिली. त्यांपैकी एक प्रेरणाकेंद्र होते बाबा आमटेंचे आनंदवन. समाजासाठी झोकून देऊन काम करणारे आमटे कुटुंबीय हीच माझ्या कार्याची प्रेरणा आहे,’ असे ते म्हणाले.

‘और कारवाँ बनता गया’
‘माझ्या कामाला निश्चित दिशा मिळत नव्हती. त्या काळात मी हताश झालो होतो. मला पुढचा मार्ग दिसत नव्हता. तेंव्हा २००४मध्ये बाबा आमटेंना भेटण्यासाठी मी हेमलकसाला गेलो तेव्हा वाटेत साखळदंडाने बांधून रस्त्यात सोडून दिलेला एक मनोरुग्ण दिसला. त्याच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. त्याला सोबत चल म्हटले, तर त्याने नकार दिला. मी पुढे निघालो. दहा-पंधरा किलोमीटरचे अंतर कापून पुढे आलो तरी मनातून त्याचा विचार जात नव्हता. परत आलो. त्या माणसाला चादरीमध्ये गुंडाळून हेमलकसाला घेऊन गेलो. डॉ. प्रकाश आमटे यांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी त्याच्या लोखंडी बेड्या तोडल्या. हे सगळे बाबा शांतपणे पाहात होते. सकाळी उठून पाहतो तर काय, रात्रभर बाबा त्या बेड्या घालून बसले होते. ते म्हणाले, ‘भरत, समाज किती क्रूरपणे वागतो रे या मनोरुग्णांशी, त्यांना केवळ बरे करून चालणार नाही, त्यांचे पुनर्वसनही व्हायला हवे,’ हा बाबांचा शब्द प्रमाण मानून मी काम सुरू केले. आगे कारवाँ बनता गया,’ असे डॉ. वाटवानी यांनी सांगितल्यावर प्रत्येकाच्याच अंगावर काटा आला.

‘कार्यकर्त्यांचा मोठा वाटा’
‘सुरुवातीला दहिसर येथे उपचार केंद्र सुरू केल्यानंतर तिथल्या रहिवाशांनी प्रचंड विरोध केला. न्यायालयात खटला चालला. अखेर निकाल आमच्या बाजूने लागला आणि आमचे काम सुरू झाले; पण लोकांची ही प्रवृत्ती बघून खूप वाईट वाटायचे. त्यानंतर काहींनी माफी मागितली; पण आपण एकटे कुठे पुरे पडणार असे वाटायचे. अशा वेळी प्रोत्साहन दिले ते बाबा आमटे यांनी. त्यांनी हे काम वाढवण्याची प्रेरणा दिली आणि कर्जतजवळ साडेसहा एकर जागेवर ‘श्रद्धा सेंटर’ उभे राहिले. आतापर्यंत सात हजार रुग्णांचे पुनर्वसन झाले आहे; पण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण काहीच नाही. हे रुग्ण घरापर्यंत पोहोचण्यात कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण दिसले, की आमचे कार्यकर्ते त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्याला आपल्याबरोबर येण्यास राजी करता आले नाही, तर वारंवार प्रयत्न करतात. अशा रुग्णांशी संवाद साधताना बोलणे, आवाज, देहबोली आश्वासक, विश्वासार्ह असेल, तर ते लगेच येण्यास तयार होतात. मग स्त्री असो वा पुरुष. नेमका उलटा अनुभव जगाकडून या रुग्णांना येत असतो. लोक फोन करून सांगतात, ‘अमुक ठिकाणी असा रुग्ण आहे, घेऊन जा.’ पण स्वतः त्याच्याशी बोलून, त्याला आमच्यापर्यंत पोहोचवणारे फार कमी लोक आहेत. रुग्णालये, मंदिरे यांच्यासाठी मोठमोठ्या देणग्या देणारे लोक, मनोरुग्णांसाठी देणगी देण्याकडे मात्र पाठ फिरवतात,’ अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 

‘कार्यकर्त्यांचे जाळे आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात खूप मदत होते. कार्यकर्ते त्यांची भाषा, बोलणे यावरून तो कुठल्या भागातील असेल याचा अंदाज घेतात, चौकशी करतात आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधतात. कुठेही असा मनोरुग्ण दिसला तर कार्यकर्ते त्यांना उपचारांसाठी घेऊन येतात. मुलेही शाळा, कॉलेजला जाताना असा रुग्ण दिसला, तर फोन करून लगेच सांगतात,’ असा बदलही डॉ. वाटवानी यांनी नोंदवला.

‘असंवेदनशीलता काळजाला घरे पाडते’
‘मनोरुग्ण सुधारल्यानंतरही समाज किंवा त्यांचे कुटुंब त्यांना स्वीकारायला तयार नसते. ही असंवेदनशीलता काळजाला घरे पाडते. या बाबतीत पोलीस मात्र खूप सहकार्य करतात. असे कोणी रुग्ण आढळले, की ते आमच्याकडे आणून पोहोचवतात. आमचे कार्यकर्ते गावांमध्ये जातात, लोकांशी बोलतात, त्यांना माहिती देतात, औषधे देतात. त्यामुळे मानसिक आजारांवर उपचार होऊ शकतात, औषधांनी या रुग्णांना बरे करता येते, याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढत असली तरी, लोकसंख्येच्या तुलनेत ते प्रमाण कमी आहे. एखाद्या गावातील रुग्णाला दोन महिन्यांचे औषध दिले असेल आणि ते औषध संपल्यानंतर तो घरातून निघून गेला, तर औषध संपले म्हणून त्याचा आजार वाढला, असे म्हणतात,’ असे अनुभव डॉ. वाटवानी यांनी सांगितले.
 
‘देशात एक कोटी मनोरुग्ण, त्यापैकी चार लाख रस्त्यावर’
‘आज आपल्या देशात एकूण लोकसंख्येपैकी एक टक्का म्हणजे एक कोटी लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. परंतु रस्त्यांवर भटकत असलेल्यांची संख्या किमान चार लाख आहे. त्यापैकी पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आहे. पुरुषांमध्ये जात्याच बाहेर जाण्याची मानसिकता असते. त्यामुळे ते घराबाहेर पडतात; पण स्त्रिया घरातच राहत असल्याने रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. मानसिक आजार हे शरीरातील जैवरासायनिक घटकांच्या असंतुलनामुळे होतात. त्यावर औषधे आणि समुपदेशन दोन्ही उपचार महत्त्वाचे ठरतात,’ अशी माहितीही डॉ. वाटवानी यांनी दिली.

महिन्याला वीस लाख रुपये खर्च
‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर’मध्ये एका वेळी सुमारे १२० रुग्णांवर उपचार केले जातात. महिन्याकाठी २० लाख रुपये खर्च येतो. हा सगळा खर्च डॉ. वाटवानी स्वतः करतात आणि मिळणाऱ्या देणग्यांचाही त्यात हातभार असतो.
 ‘माझी सासुरवाडी पुण्याला आहे. आम्ही चार मुले दत्तक घेतली आहेत. एक मूल झाल्यावर दुसरे मूल दत्तक घ्यायचे हे आम्ही दोघांनीही लग्नाआधीच ठरवले होते. त्यानुसार, पहिली मुलगी झाल्यानंतर दोन मुलगे आणि एक मुलगी असे करून एकूण तीन मुले दत्तक घेतली,’ असे डॉ. वाटवानी यांनी सांगितले.


‘प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञांची वानवा’
प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ मिळत नसल्याची खंत डॉ. वाटवानी यांनी व्यक्त केली. ‘पगार कमी, कामाचे स्वरूप अवघड यामुळे मानसोपचार क्षेत्रातील डॉक्टरांची संख्या वाढत नाही. ८० टक्के रुग्णालयांमध्ये मानसोपचारतज्ज्ञ नाहीत. इथे शिकलेली मुले परदेशात जातात. त्यामुळे आमच्याबरोबर काम करण्यासाठी प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञांची कमतरता नेहमीच जाणवते. याबाबत वैद्यकीय महाविद्यालये, संबधित संघटना यांना पत्र लिहिले आहे; मात्र काही हालचाल झालेली नाही,’ असे त्यांनी नमूद केले.

‘नकारात्मक बातम्यांमध्ये वाटवानींचे काम आशादायक’
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, ‘भरतचे काम ३० वर्षांपासून सुरू आहे. बाबांकडे जी करुणा होती, तीच भरतमध्ये आहे. रोग्यांची सेवा करून काही मिळत नाही, तरी त्यांना पुन्हा माणसात आणण्यासाठी अशी माणसे काम करतात. पुरस्कार व प्रसिद्धी मिळणे हा नंतरचा भाग आहे. आपल्या भवती सतत नकारात्मक घडत असताना नकारात्मक बातम्यांमध्ये वाटवानींचे काम ही आशादायक बातमी असते.’ 

लोकांचा सलाम
डॉ. भरत वाटवानी यांच्या ‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर’मार्फत चालणाऱ्या कार्याची माहिती देणारी एक चित्रफीत या वेळी दाखवण्यात आली. ती पाहिल्यानंतर आणि डॉ. वाटवानी यांचे अनुभव ऐकताना अवघे सभागृह हेलावले होते. अनेकांचे डोळे पाणावले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याला लोकांनी सलाम केला. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा’ हे शब्द मनोरुग्णांच्या बाबतीतही अगदी समर्पक ठरतात, याची प्रचीती डॉ. भरत वाटवानी यांच्या कामाची चित्रफीत पाहिल्यावर आणि त्यांची मुलाखत ऐकल्यावर लोकांना आली.

डॉ. भरत वाटवानी व डॉ. स्मिता वाटवानी
डॉ. वाटवानी यांच्या कार्यात सिंहाचा वाटा आहे तो त्यांच्या पत्नीचा म्हणजेच सुवर्णपदकविजेत्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्मिता वाटवानी यांचा. डॉ. वाटवानी या कार्यक्रमाला हजर असल्याने ‘श्रद्धा फाउंडेशन’मध्ये रुग्णांकडे लक्ष देण्याकरिता डॉ. स्मिता वाटवानी तिकडेच थांबल्या होत्या. त्यामुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत.

सुजाता देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. अनंत फडके यांनी आभार मानले.

 (डॉ. भरत वाटवानी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link