Next
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे
BOI
Monday, January 01, 2018 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ. एम. फॉर्स्टर आणि ‘ए कॅचर इन दी राय’  लिहून जागतिक कीर्ती मिळवलेला जे. डी. सॅलिन्जर यांचा एक जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...
विठ्ठल भिकाजी वाघ

एक जानेवारी १९४५ रोजी अकोल्यात जन्मलेले विठ्ठल भिकाजी वाघ हे कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सातासमुद्रापार जाऊन आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांनी संत गाडगेमहाराजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. ‘गोट्या’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले होते. इयत्ता पहिली ते सातवीच्या बालभारती पुस्तकांच्या संपादनात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे, तसंच कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

वऱ्हाडी म्हणींविषयी त्यांनी विशेष अभ्यास केला आहे आणि अमरावती विद्यापीठातून ‘पारंपारिक वऱ्हाडी म्हणींचा सर्वांगीण अभ्यास’ या विषयावर त्यांनी १९८२मध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, तसंच कृषिभूषण डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

गावशिव, साय, वैदर्भी, काया मातीत मातीत, कपाशीची चंद्रफुले, पाऊसपाणी, वृषभसूक्त, वऱ्हाडी म्हणी आणि लोकधर्म, वऱ्हाडी इतिहास आणि बोली, डेबू, म्हणीकांचन, पंढरीच्या वाटेवर, उजेडाचे दान द्यावे अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
....

उत्तम बंडू तुपे

एक जानेवारी १९४८ रोजी साताऱ्यातल्या खटावमध्ये जन्मलेले उत्तम बंडू तुपे म्हणजे वंचितांचं जगणं वाट्याला येऊनही त्यावर मात करून मराठी साहित्यात स्वतःचा  वेगळा ठसा उमटवणारे दलित साहित्यिक. त्यांच्या ‘काट्यावरची पोटं’ या आत्मचरित्राने मराठी वाचकाला उपेक्षितांच्या संघर्षमय आणि खडतर जगण्याची कल्पना दिली.

त्यांच्या बहुतेक कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, गोरगरिबांच्या वेदना, अठराविश्वे दारिद्र्य यांचं वास्तववादी वर्णन असतं, जे वाचकाला अंतर्मुख करतं. बंड करणाऱ्या जगन जोगतिणीची कथा सांगणारी त्यांची झुलवा ही कादंबरी गाजली आणि तिचं नाटकात रूपांतरसुद्धा झालं आणि गाजलं.

इजाळ, आंदन, कळा, कोंबारा, खाई, खुळी, चिपाड, सावळं, नाक्षारी, पिंड, भस्म, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, झुलवा, शेवंती अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१९९७ साली जळगावमध्ये भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार, तसंच राज्य पुरस्कार मिळाला आहे.
....

नामदेव चंद्रभान कांबळे

एक जानेवारी १९४८ रोजी वाशिममध्ये जन्मलेले नामदेव चंद्रभान कांबळे हे पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांच्या ‘राघववेळ’ कादंबरीसाठी त्यांना १९९५ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

अकल्पित, प्रत्यय, स्मरण विस्मरण, अस्पर्श, राघववेळ, ऊनसावली, सांजवेळ अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
....

राजाराम प्रभाकर राजवाडे

एक जानेवारी १९३६ रोजी जन्मलेले राजाराम प्रभाकर राजवाडे हे विनोदी कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते.

किलावेनमानीची रात्र, अस्पृश्य सूर्य, दुबई दुबई, धुमसणारं शहर, दोस्ताना, डॉन व्हॅन, घर आमचं कोकणातलं, माणसं आमच्या कोकणातील असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

२१ जुलै १९९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
.....

एडवर्ड मॉर्गन फॉर्स्टर
एक जानेवारी १८७९ रोजी लंडनमध्ये जन्मलेला हा कथाकार, कादंबरीकार आणि निबंधकार.

ए पॅसेज टू इंडिया, ए रूम विथ ए व्ह्यू, हॉवर्डस् एंड, मॉरिस, दी लाँगेस्ट जर्नी, दी हिल ऑफ देवी, व्हेअर एंजल्स फिअर टू ट्रेड अशी त्याची पुस्तकं गाजली आहेत.

सात जून १९७० रोजी त्याचा कॉव्हेंट्रीमध्ये मृत्यू झाला.
.......

जेरॉम डेव्हिड सॅलिन्जर

एक जानेवारी १९१९ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला जेरॉम डेव्हिड सॅलिन्जर हा अमेरिकन कथाकार आणि कादंबरीकार.

त्याची सर्वांत गाजलेली कादंबरी म्हणजे ‘दी कॅचर इन दी राय.’ साडेसहा कोटींपेक्षा जास्त खप झालेली ही कादंबरी त्याने लिहिली वयाच्या ३१व्या वर्षी! इंग्लिश भाषेतल्या १०० ग्रेट कादंबऱ्यांमध्ये हिचा समावेश होतो.

२७ जानेवारी २०१० रोजी त्याचा न्यू हॅम्पशरमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Padma Nagdeve About 1 Days ago
Good information. More details information Namdev Kambale Marathi auther
0
0
कृष्णा फंदाट About 232 Days ago
आदरणीय माजी प्राचार्य लोक कवी विठ्ठल वाघ यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथे झाला व त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले असे ऐकवात आहे
0
0

Select Language
Share Link
 
Search