Next
ब्रिटिशकालीन दुर्मीळ ग्रंथ, गॅझेटिअर्सचा खजिना खुला
सेतुमाधवराव पगडी संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन
BOI
Wednesday, August 28, 2019 | 04:44 PM
15 0 0
Share this article:

सेतुमाधवराव पगडी संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई : राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटिअर) विभागामार्फत इतिहास संशोधक दिवंगत सेतुमाधवराव पगडी यांच्या नावाने संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आले असून, दीडशे वर्षांपासूनचे साडेतीन हजार दुर्मीळ ग्रंथ, जिल्हा गॅझेटिअर्सही येथे आहेत. याचे उद्घाटन मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले.

सेतुमाधवराव पगडी
फोर्ट येथील दर्शनिका विभागामध्ये आयोजित या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर, दर्शनिका विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दर्शनिका विभागाच्या कार्यालयात ब्रिटिश काळापासून संदर्भासाठी वापरण्यात आलेले अनेक ग्रंथ; तसेच १८८० मध्ये ब्रिटिशांनी तयार केलेली अनेक जिल्हा गॅझेटिअर्सही आहेत. त्यामध्ये १८०९ मधील महिकावती उर्फ माहीमच्या बखरीची प्रत, १८८६मध्ये प्रकाशित झालेला ‘राऊंड अबाऊट बॉम्बे’ हा ग्रंथ, १८८९चा पाचव्या इंडियन काँग्रेसचा रिपोर्ट यासह असंख्य दुर्मीळ ग्रंथांचा समावेश आहे. हा सगळा खजिना आता अभ्यासक, संशोधकांना खुला झाला आहे. 

‘या ग्रंथालयातील जवळपास दीडशे वर्षांपासूनचे ग्रंथ अभ्यासक-संशोधकांना उपलब्ध होणार आहेत. दर्शनिका विभागाच्या अखत्यारितील संदर्भ अभ्यासक-संशोधकांसाठी महत्त्वाचे ठरतील’, असे मत विनोद तावडे यांनी या वेळी व्यक्त केले. 

‘या संदर्भ ग्रंथालयात साडेतीन हजारांहून अधिक मौलिक व दुर्मीळ ग्रंथ उपलब्ध आहेत. इतिहास संशोधक दिवंगत सेतुमाधवराव पगडी यांच्या १०९व्या जन्मदिनी हे संदर्भ ग्रंथालय सुरू होत आहे, याचा आनंद आहे. १९६० ते १९७० अशी १० वर्षे सेतुमाधवराव पगडी हे या दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा गॅझेटिअर्सचे काम मोठ्या प्रमाणावर झाले. पगडी यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासक्षेत्रात दिलेले योगदान मोठे आहे. बहुभाषाकोविद ही त्यांची ओळख होती. त्यांना मराठीबरोबरच इंग्रजी, उर्दू, फार्सी, तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषा अवगत होत्या. सेतुमाधवरावांची ही महत्ता आणि योग्यता लक्षात घेऊनच त्यांचे नाव ग्रंथालयाला देण्यात आले आहे,’ असेही तावडे यांनी नमूद केले. 

(सेतुमाधवराव पगडी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search