Next
सागर देशमुख आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत
‘स्टार प्रवाह’वर १५ एप्रिलपासून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिका
BOI
Thursday, March 28, 2019 | 12:01 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘भाई’ चित्रपटात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर..महामानवाची गौरव गाथा’ ही मालिका १५ एप्रिलपासून रात्री नऊ वाजता सुरू होत आहे. या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सोनेरी पाने प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहेत. या मालिकेमुळे आणखी एक चरित्र मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची निर्मिती केली आहे.

देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे प्रत्येकासाठी स्फूर्तीदायी आहे. महामानव अशी ओळख असलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्याचा मान सागरला मिळाला आहे. ‘भाई’मधल्या त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण भूमिकेत तो दिसणार आहे. 

सागर स्वत: वकील असून, त्याने सहा वर्ष मुंबई-पुण्यामध्ये वकिली केली होती. त्यामुळे प्रख्यात कायदेतज्ज्ञ असणाऱ्या बाबासाहेबांची भूमिका साकारताना, सागरचे स्वत: वकील असणे त्याच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मालिकेचे दिग्दर्शन अजय मयेकर यांनी केले असून, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागरची निवड केली आहे. विशाल पाठारे यांनी मेकअप केला आहे. 

सागर देशमुख
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी नवे आव्हान आहे. वकिलीचा अभ्यास मी केला असल्यामुळे डॉ. आंबेडकरांशी तसा यापूर्वीच संबंध आला होता. भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेब, त्यांचे विचार, त्यांचं काम माझ्या वाचनाचा महत्त्वाचा भाग होता. आता डॉ. आंबेडकरांची भूमिका साकारताना त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा नव्याने अभ्यास करतोय. त्यामुळे एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. वाचनाबरोबरच प्राध्यापक सुखदेव थोरात यांची बाबासाहेबांवरील व्याख्यानं ऐकतोय. आंबेडकरांच्या चित्रफिती पाहून त्यांचे हावभाव, बोलणं-चालणं टिपण्याचा माझा प्रयत्न आहे,’ असे सागर देशमुख याने सांगितले.
 
स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या मालिकेविषयी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गौरवशाली कार्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे हे महान कार्य मालिकेतून लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्टार प्रवाहसाठी ही अभिमानाची गोष्ट तर आहेच शिवाय खूप मोठी जबाबदारीसुद्धा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण ते महामानवापर्यंतचा प्रवास मालिकेत पाहायला मिळणार आहे. टीव्ही हे अत्यंत प्रभावशील माध्यम असल्यामुळे प्रत्येक जनमानसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजला जाईल यासाठी स्टार प्रवाहची संपूर्ण टीम प्रयत्नशील असेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search