Next
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Friday, May 11, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने गेल्या २५ वर्षांत अनेक ‘आविष्कार’ घडवले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊ या ‘लेणे समाजाचे’ या सदरात...
............
आपल्यातील कमतरता लपविण्याकडे, आपल्यातील समस्या उघडपणे सांगून त्यावर उत्तरे व पर्याय शोधण्यापेक्षा त्यावर पांघरूण घालण्याकडे आणि त्याची जबाबदारी इतरांवर ढकलण्याकडे आपला कल अधिक असतो. त्यामुळे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना समानुभूती (एम्पथी) न देता सहानुभूती (सिम्पथी) आणि दया दाखविण्याचे किंवा हेटाळणी करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. या सामाजिक पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील ‘आविष्कार’ ही संस्था अशा मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी गेली २५ वर्षे धडपडत आहे.

१४ जुलै १९९२ रोजी रत्नागिरी शहरातील शेरे नाका येथील डॉ. शेरे यांच्या घरात प्रौढ मतिमंदांच्या कार्यशाळेत व्यवसाय प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ १३ मुलांना घेऊन कार्यशाळा सुरू झाली. मुलांच्या कुवतीनुसार त्यांचा अभ्यासक्रम डॉ. शेरे आणि शमीन शेरे यांच्या मार्गदर्शनाने बनवण्यात आला. मुले हळूहळू कामात रस घेऊ लागली. मेणबत्त्या तयार करणे, कागदी पिशव्या, पाकिटे, रेक्झिनपासून सहज बनविता येण्यासारख्या पर्स, पिशव्या तयार करणे असे उपक्रम सुरू झाले.

व्यवसाय प्रशिक्षण सुरू असताना २००३पासून कार्यशाळेला शासनाकडून अनुदान सुरू करण्यात आले. त्याचदरम्यान नॅशनल ऑलिंपिकसाठी रत्नागिरीतून प्रथमच कार्यशाळेतील विद्यार्थी हरियाणाला गेले. तेथे मुलांनी सुवर्णपदके मिळवली; तसेच सुमय्या पटेल ही विद्यार्थिनी स्पेशल ऑलिंपिकसाठी बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चीनला जाऊन आली.

दानशूर शांताबाई भिडे यांनी दिवंगत श्यामराव भिडे यांच्या नावे कार्यशाळेला ११ लाख रुपयांची देणगी दिली. २२ एप्रिल २००४ रोजी शांताबाई भिडे यांच्या हस्ते कार्यशाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले आणि प्रौढ मतिमंदांच्या पुनर्वसनाचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. कार्यशाळा व त्यातील मुलांच्या आवडी व कुवतीनुसार प्रशिक्षण केंद्र जोरात सुरू झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व स्तरातील लोकांची ही सामाजिक गरज असल्यामुळे कार्यशाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रौढ मतिमंदांची संख्या वाढत गेली. १३ विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या कार्यशाळेत आज ७८ विद्यार्थी आहेत. गृहशास्त्र, फाइल मेकिंग, हस्तकला विभाग, शिवण विभाग, मेणबत्ती विभाग, सुतारकाम विभागात हे विद्यार्थी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेत आहेत.

मूल मतिमंद आहे की नाही, एवढाच अर्थबोध बुद्ध्यांकाद्वारे होतो; पण त्याच्या प्रत्येक क्षमतेमध्ये ते कोणत्या पातळीवर आहे, हे समजून घेऊन त्याचे शिक्षण सुरू करण्याचे आव्हान असते. या विशेष शिक्षणामध्ये विशेष शिक्षक, आवश्यकता भासल्यास भौतिकोपचारतज्ज्ञ, वाचा उपचारतज्ज्ञ अशा सर्वांची मदत लागतेच; परंतु या सर्वांबरोबर पालकांचा सहभागही महत्त्वाचा असतो. पालकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच ‘आविष्कार’ची ही खडतर वाटचाल सुकर होण्यास मदत झाली आहे.

वंचितांना दयाबुद्धीने काही दान करण्यापेक्षा त्यांना व्यावसायिक कौशल्य शिकवून सक्षम बनवणे अनेक पटींनी श्रेष्ठ आहे, हे पटवून देण्यासाठी याहून चांगले उदाहरण सापडणार नाही. शाळा संपल्यानंतर अशा विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक संक्रमणाबाबत फारशी काळजी घेतली जात नाही, हा पायंडा बदलणे गरजेचे आहे. विशेष शिक्षणाचे अंतिम ध्येय हे त्या व्यक्तीमध्ये व्यावसायिक क्षमता आणि स्वतंत्रपणे जगण्याची क्षमता निर्माण करणे हेच आहे. ‘आविष्कार’ची श्यामराव भिडे कार्यशाळा यासाठी गेली २५ वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहे.  

‘१४ जुलै १९९२ रोजी स्थापन झालेल्या आविष्कार कार्यशाळेचे २२ एप्रिल २००४ रोजी श्यामराव भिडे असे नामकरण करण्यात आले. गेल्या २५ वर्षांत कार्यशाळेने अनेक विद्यार्थ्यांचे यशस्वी व्यावसायिक पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून समाजाचा एक उत्पादक घटक बनविले आहे. या प्रगतीच्या जोरावर काही पालकांनी एक पाऊल पुढे टाकून आपल्या पाल्याचा विवाहदेखील लावून दिला आहे आणि त्यांना झालेले अपत्य हे सर्वसामान्य आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थी मोबाइलचा वापर अगदी सुलभपणे करताना दिसतात. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. आपल्या मोबाइलवरून संपर्क साधतात. शिक्षक आले नसतील तर का आले नाहीत, याची अगदी आस्थेने चौकशी करतात. हे अनुभवताना मन भरून येते आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची जणू पोचपावतीच मिळते,’ असे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी सांगितले.

‘आज या प्रगतीची परिसीमा गाठणाऱ्या दिव्यांगांना खरी गरज आहे ती त्यांना समजून घेण्याची, सहानुभूतीची नाही. या विशेष विद्यार्थ्यांच्या क्षमता आपण वेळीच ओळखून त्यांच्या क्षमतेप्रमाणे उच्चतम पातळीपर्यंत प्रशिक्षित करू शकलो, तर तेदेखील आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ निश्चितच बनू शकतात. हे कार्यशाळेने दाखवून दिले आहे. आता खरी गरज आहे ती त्यांना तुमच्या-आमच्यात सामावून घेण्याची. विद्या मोडक आणि पारस खातगुणकर हे दोन विद्यार्थी २०१९मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिंपिकमध्ये खेळतील अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने पुढचा सराव सुरू आहे,’ असे वायंगणकर म्हणाले.

आविष्कार संस्थेच्याच विशेष शाळेला सहा डिसेंबर २००८ रोजी सौ. सविता कामत विद्यामंदिर असे नाव देण्यात आले. या विशेष शाळेत मुलांना लहानपणापासून सामावून घेतले जाते. त्यांच्या स्वभावगुणानुसार सर्व विशेष शिक्षक आणि कर्मचारी, मदतनीस त्यांना घडविण्याचा प्रयत्न करतात.

‘मतिमंदत्वाच्या क्षेत्रातील संदिग्ध आणि ढोबळ संकल्पना जाऊन मतिमंदत्व असलेल्या व्यक्तीच्या मेंदूच्या विकासात अडथळा ठरणारा कमजोर दुवा शोधून त्यावर उपचारात्मक उपाय करून, त्यांना योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने योग्य वयात शिक्षण दिले, तर ही मुले अविश्वसनीय अशा क्षमतांचे प्रकटीकरण करू शकतात हे दिसून आले आहे,’ असे ‘आविष्कार’च्या सौ. सविता कामत विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका शमीन शेरे यांनी सांगितले.

सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नांतून अधिक भरीव असे काहीतरी निश्चितपणे घडू शकते. कुठल्याही संस्थेसाठी आर्थिक मदत मिळवणे हे तसे जिकिरीचे काम असते; पण आपल्या प्रामाणिक प्रयत्नांतून संस्थेने स्वतःची निर्माण केलेली ओळख लाखो रुपयांची देणगी सहजपणे मिळवून देते; मात्र देणाऱ्या हातांची संख्याही वाढणे तेवढेच गरजेचे आहे. ‘आविष्कार’ने गेली २५ वर्षे यशस्वीपणे चालविलेल्या या कार्याला समाजातील दानशूरांची आणखी साथ मिळणे आवश्यक आहे.

आविष्कार संस्थेविषयी :
पत्ता : ई-९५, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी ४१६ ६३९.
दूरध्वनी : (०२३५२) २२८८५२, २२९५१७
ई-मेल : aavishkar.ratnagiri@gmail.com
वेबसाइट : http://www.aavishkar-ratnagiri.org/

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
किशोर वसंत सावंत(देसाई) About 184 Days ago
मुलांनी तयार केलेल्या वस्तू ( खासकरून सुतार कामातून) विक्री साठी ठेवल्या आहेत का?
0
0

Select Language
Share Link
 
Search