Next
वैद्या माधुरी प्रभुदेसाई यांना आयुर्वेद प्रसारासाठी ‘जीवनगौरव’
BOI
Saturday, November 18, 2017 | 05:30 PM
15 0 0
Share this article:

वैद्या माधुरी मुरलीधर प्रभुदेसाई यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार. सोबत धूतपापेश्वर कंपनीचे श्री. पुराणिक.सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या माजी निवासी वैद्यकीय अधिकारी आणि धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा केंद्राच्या संचालिका वैद्या माधुरी मुरलीधर प्रभुदेसाई यांना आयुर्वेदाच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याकरिता नुकताच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आणि प्रभा आयुर्वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकमठाण (शिर्डी, कोपरगाव, जि. अहमदनगर) येथे जंगली महाराज आश्रमात बी. के. पाध्ये गुर्जर नगरीत अलीकडेच राष्ट्रीय आयुर्वेद संजीवनी कार्यक्रम झाला. त्या वेळी हिवरेबाजार गावाचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते वैद्या प्रभुदेसाई यांचा गौरव करण्यात आला.

दोन दिवसांच्या या संमेलनात आयुर्वेदविषयक विविध परिसंवाद पार पडले. जंगलीदास माऊली यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे वैद्य रामदास आव्हाड अध्यक्षस्थानी होते. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करणाऱ्या वैद्यांचा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये वैद्या माधुरी मुरलीधर प्रभुदेसाई यांच्याबरोबरच वैद्य सुहास खर्डीकर आणि सुहास परचुरे यांना पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह आणि जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय प्रधानमंत्री वैद्य दीनानाथ उपाध्याय, अहमदनगर जिल्हाध्यक्ष वैद्य विनायक नागरे, कोषाध्यक्ष शरद ठुबे, अनिल दुहेत, कौस्तुभ भोईर, सतीश भट्टड यांचाही सत्कार करण्यात आला.

या वेळी पोपटराव पवार यांनीही आयुर्वेदाचा गौरव केला. ते म्हणाले, ‘रामायणात लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर हनुमानाने संजीवनी ही औषधी वनस्पती आणली होती, एवढीच आपल्याला माहिती आहे; मात्र आयुर्वेदाची आपल्याला आणखी काही माहिती नाही. आयुर्वेदाचे महत्त्व प्रत्येकाने समजावून घ्यावे. त्यातून सर्व नागरिकांनी आपापले गाव सुधारावे. हिवरेबाजार गावाने स्वच्छता आणि जलसंधारणाच्या कामाबाबत देशविदेशांतील नागरिकांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. येत्या २०३० सालापर्यंत हिवरेबाजार गाव पूर्णपणे रोगमुक्त करण्याचा मानस आहे. त्यासाठी आयुर्वेदीय जीवनप्रणाली नक्कीच उपयुक्त ठरेल.’

‘गेल्या २९ वर्षांपासून शिर्डीमध्ये येणाऱ्या साईबाबांच्या भक्तांना आयुर्वेदाच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. प्रत्येकाने आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आयुर्वेदाला नावे ठेवण्यापेक्षा प्रत्येकाने आयुर्वेद आपल्या जीवनात अंगीकारावा. तसे झाल्यास आरोग्यपूर्णतेमुळे देश प्रथम क्रमांकावर राहील,’ असे महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे वैद्य रामदास आव्हाड म्हणाले.

(दुर्गम ग्रामीण भागात आयुर्वेद उपचारपद्धतींचा अवलंब करताना वैद्या प्रभुदेसाई यांना आलेले अनुभव आणि आयुर्वेदाबद्दलचे त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search