Next
द्वारकानाथ पितळे, संदीप वासलेकर, कृष्णराव देशपांडे, कृष्णराव बाबर
BOI
Tuesday, April 03, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

एकाहून एक सरस ऐतिहासिक आणि अद्भुत कादंबऱ्या लिहून लोकप्रिय झालेले कादंबरीकार नाथमाधव, ‘योग्य मार्गाने जाऊन अनेक युवकांनी एक दिशा शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशाला, आपल्या समाजाला दिशा नक्कीच सापडेल,’ असं मानणारे संदीप वासलेकर, बालसाहित्यकार कृष्णराव देशपांडे आणि लेखक कृष्णराव बाबर यांचा तीन एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
द्वारकानाथ माधव पितळे 

तीन एप्रिल १८८२ रोजी मुंबईत जन्मलेले द्वारकानाथ माधव पितळे ऊर्फ ‘नाथमाधव’ हे कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. वयाच्या २६व्या वर्षी त्यांची ‘प्रेमवेडा’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. 

इतिहासाची आणि शिकारीची आवड असणाऱ्या नाथमाधव यांचं कमरेखालचं शरीर, अशाच एका शिकारीनिमित्त भटकंतीदरम्यान सिंहगडावरून पडल्यामुळे जायबंदी झालं; पण तशाही अवस्थेतून सावरून पुढे त्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. सावळ्या तांडेल, स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याचे परिवर्तन, स्वराज्याची घटना, स्वराज्याची स्थापना, स्वराज्यातील दुफळी, स्वराज्यावरील संकट, अशा त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या होत्या. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवर ‘शिकलेली बायको’ हा मराठी सिनेमा निघाला आणि लोकांना फार आवडला होता. 

निबिड अरण्य, किर्र रात्र, गूढ शूर योद्धा, लावण्यवती अबला, स्फटिकाचा मनोरा अशा प्रकारची रम्य आणि अद्भुत वर्णनं असणारी ‘वीरधवल’ ही एका पराक्रमी योद्ध्याची कहाणी आणि हिंद एजन्सी एक आणा मालेतून क्रमशः प्रसिद्ध होऊन गाजलेली राया, बापू, राजाराम या झावबाच्या वाडीत राहणाऱ्या तिघा मित्रांची आणि श्रीपाद, गोपाळ, मन्या, च्याच्या, बाप्या आणि भाऊ अशा त्यांच्या दोस्त मंडळींनी बनलेल्या सोनेरी टोळीच्या धमाल कारनाम्यांची ‘रायक्लब अथवा सोनेरी टोळी’ हा कथासंग्रह यांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. 

२१ जून १९२८ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.
.........


संदीप वासलेकर 

तीन एप्रिल १९५९ रोजी डोंबिवलीमध्ये जन्मलेले संदीप वासलेकर हे जागतिक घडामोडींविषयी सातत्यानं लिहून तरुणांना स्फूर्ती देणारे जागतिक कीर्तीचे मराठी विचारवंत आहेत. ऑक्सफर्डमध्ये शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी घेतल्या गेलेल्या निबंधस्पर्धेत जगभरातल्या शंभर देशांतल्या तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये ते पहिले आले होते.

आंतरराष्ट्रीय संबंधांचा आणि जगातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा धोरणात्मक अभ्यास करणाऱ्या ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’ या जागतिक पातळीवरील संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. युनायटेड नेशन्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, अरब राष्ट्रसंघ, युरोपीयन संसद अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जगातले किमान पन्नास देशांचे राष्ट्रप्रमुख वासलेकरांशी विविध विषयांवर सल्लामसलत करत असतात.


त्यांचे लेख इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्युन, न्यूयॉर्क टाइम्स, ग्रीन हेरॉल्ड, फायनान्शिल टाइम्स, दी गार्डियन, न्यूजवीक, वॉलस्ट्रीट जर्नल अशा जगातील मातब्बर वर्तमानपत्रांमध्ये आणि नितकालिकांमध्ये प्रकाशित होत असतात.  
..........

कृष्णराव पंढरीनाथ देशपांडे 
तीन एप्रिल १९४१ रोजी खेडमधल्या वाडा इथे जन्मलेले डॉ. कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे हे कथाकार, कवी, कादंबरीकार, चरित्रकार, आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी संशोधनात्मक आणि शैक्षणिक लेखनही केलं आहे.

पुणे विद्यार्थी गृहाच्या समाचार पत्रिकेचं त्यांनी संपादन केलं होतं. 

अग्निकंकण, अग्निफुले, अग्निशिखा, कथा क्रांतिकारकांच्या (२० भाग), क्रांतिचंद्र, जननायक, तृषार्त, मंदोदरी, महानुभावांचे साती ग्रंथ : स्वरूप आणि समीक्षा, खांडेकरांचे समाजचिंतन, सेनापती तात्या टोपे, धैर्यमेरूंच्या कथा, संताजी महाराज जगनाडे असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

त्यांना आचार्य अत्रे पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, तसंच राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत. 
..........
 
कृष्णराव भाऊराव बाबर

तीन एप्रिल १८९५ रोजी जन्मलेले कृष्णराव भाऊराव बाबर हे लेखक म्हणून प्रसिद्ध होते.

आपणाला मिळालेले स्वातंत्र्य, कामधेनू, काळाच्या पडद्यावरील ठळक चित्रे, नशीब, आपला देश भारत, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

भारतीय सण आणि उत्सव या विषयावर त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. नऊ जून १९७४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link