Next
मतदार जनजागृतीतून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
फॅम संघटनेचा उपक्रम
मिलिंद जाधव
Friday, December 07, 2018 | 02:48 PM
15 0 0
Share this article:



मुंबई :
निवडणुका जवळ आल्या, की राजकीय पक्षांतर्फे अनेक आमिषे दाखविली जातात. त्यांना न भुलता मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे, ही जागृती करण्यासाठी ‘फेस ऑफ आंबेडकराइट्स मूव्हमेंट’ (फॅम) या संघटनेने मतदार जनजागृती अभियान राबवले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

‘मतदानावेळी पैसे घेऊन आपला स्वाभिमान विकून मत देऊ नका. जो तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करून तुमचा सर्वांगीण विकास करेल, असा लायक उमेदवारच निवडून द्या. जाती-धर्म, भावनिक अस्मिता यांना न भुलता या देशाच्या विकासात जो प्रतिनिधी योगदान देईल त्यालाच मतदान करा,’ असे आवाहन मतदारांना ‘फॅम’च्या कार्यकर्त्यांनी केले.

‘प्रत्येक माणसात बदल हा घडून आला पाहिजे, म्हणूनच आम्ही नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. दर वर्षी १०-२० रुपयांचे हार, फुले, मेणबत्ती आणण्यापेक्षा त्याच पैशांचे वही, पेन आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करू या, अशी संकल्पना ‘फॅम’च्या माध्यमातून साकारली आहे. प्राप्त झालेल्या शैक्षणिक वस्तूंचे सावित्रीबाई फुले, जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दुर्गम भागात वाटप केले जाते. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी हा उपक्रम आम्ही दर वर्षी राबवतो,’ असे ‘फॅम टीम’ने सांगितले. या उपक्रमात छाया गायकवाड, दत्ता जावळे, स्नेहल जाधव, साईराज शेळके, दीपक कांबळे, प्रणव जाधव आदी तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

फॅम या संघटनेला सात वर्षे पूर्ण झाली असून, ‘एक वही एक पेन अभियान’ उपक्रम गेल्या चार वर्षांपासून चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनी राबवला जातो. औरंगाबाद, नाशिक, सोलापूर व इतर ठिकाणीदेखील या उपक्रमाचे अनुकरण केले जात आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search