Next
‘‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’मध्ये निखळ निसर्गरूप आणि माणूसरूप’
BOI
Thursday, January 25, 2018 | 02:55 PM
15 0 0
Share this article:

महेश लीला पंडित, समर नखाते आणि प्रसाद कुमठेकरमुंबई : ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही प्रसाद कुमठेकर यांनी उदगिरी बोलीभाषेत लिहिलेली आगळीवेगळी कादंबरी. गावजीवनाचा थांग शोधणाऱ्या या कादंबरीचे वाचन आणि चर्चा असा कार्यक्रम नुकताच मुंबईत पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आला होता. ‘पार प्रकाशन’द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून जागतिक सिनेमाचे अभ्यासक व समीक्षक आणि ‘एफटीआयआय’ या संस्थेचे माजी डीन समर नखाते उपस्थित होते. या प्रसंगी लेखक प्रसाद कुमठेकर यांनी ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीतील त्यांच्या खास शैलीतील अर्पण पत्रिकेचे आणि कवी व प्रकाशक महेश लीला पंडित यांनी या कादंबरीतील ‘येडी बाभळ’ पहिल्या प्रकरणाचे अभिवाचन केले. (त्याचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

समर नखाते यांनी या कादंबरीचे रसग्रहण करत असताना अंतरंग अत्यंत सूक्ष्म आणि हळुवारपणे उलगडून दाखवले. ते म्हणाले ‘ ही कादंबरी उदगिरी बोलीत लिहिली आहे. मुळात सजीवतेला जोडलेल्या गोष्टींना जी व्यक्त करते तिच खरी भाषा होय. कोणतीही चांगली कलाकृती माणूस असण्याचं भान समृद्ध करत पुढे नेत राहते. आपली माणसं, रंग, त्यांची मनं, त्यांच्या छटा, त्यांच्या भावभावना, स्वभाव या सर्वांनी मिळून माणूसपणाचं रूप तयार होतं आणि तेच कलाकृतीचं खरं सौंदर्य असतं. कुठल्याही साध्या गोष्टीत सौंदर्यऊर्जा असते आणि चांगला कलाकार ते टिपून त्याला मुक्त करत असतो. आणि याचंच निखळ निसर्गरूप आणि तितकंच निखळ माणूसरूप या कादंबरीत साकारलं गेल्याचं जाणवतं. या कादंबरीत एक कातरता आहे, पण ती चिरणारी नाही, आक्रोश, टाहो नाही. यात करुण, सहृदय धारणाही आहे. एक समाज, एक व्यक्ती, एक समूह, एक भाषा, एक उच्चार, एक देहबोली, भाव, हालचाली, लकबी, वस्तू, वस्त्र, अरण्य, वास्तू, झाड, घरं, चवी या असंख्य गोष्टीतून इथे एक सृष्टी उभारली गेली आहे. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्यां’ची एक सृष्टी आहे आणि ती पाहत असताना इतक्या सहज सुंदर आविष्काराची कमाल वाटते आणि आश्चर्यसुद्धा वाटत राहते. या कादंबरीचा रूपबंध हा खोल तळाचा शोध घेणारा आहे. तो कुण्या एका ठराविक व्यक्तीभोवती फिरणारा नाही, तर गाव, गावातले जीवन, तिथला पुस्तकी नसलेला आहे तसा निसर्ग, त्यातले सौंदर्य, भवतालच्या वातावरणाचा शोध, तिथल्या माणसांच्या गरजा अशा विविध दृष्टिकोनांतून एका मोठ्या अवकाशाला व्यापून ही कादंबरी व्यक्त होते. त्यातली अनुभूती थक्क करणारी आहे. गाडी, बंगला, उच्चभ्रू जीवन हे काहीही झालं तरी जीवनाचं स्वप्न होऊ शकत नाही. त्यात ध्येयवादाचा धागा नाही. ती एक उपभोग्य संस्कृती आहे. मानवी जीवन हे या उपभोग्य संस्कृतीच्या पल्याड जाणारं आहे. सूक्ष्म निरीक्षणानं निसर्गाचं सौंदर्य लक्षात येतं. मानवनिर्मित सौंदर्य आणि निसर्गनिर्मित सौंदर्य ही जिवाशिवाची भेट झाल्यागत अवतरतात आणि हेच या कादंबरीचं यश आहे. त्यातल्या उदगिरी बोलीचा गोडवा, तिचा नाद आपल्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही.’

शेवटी कवी व प्रकाशक महेश लीला पंडित यांनी मुख्य पाहुणे व श्रोत्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला ‘चला वाचू या’ या दर महिन्याला सादर होणाऱ्या अभिवाचन सादरीकरणाचे, ‘व्हिजन’ या संस्थेचे सर्वेसर्वा, लेखक, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लेखिका आणि कलाकार श्रीमती राजश्री पोतदार यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.

(‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search