Next
भालचंद्र नेमाडे यांची अष्ट्यब्दीपूर्ती; ‘हिंदू’चा पुढचा भाग लवकरच
विवेक सबनीस
Sunday, May 27, 2018 | 07:30 AM
15 0 0
Share this article:

भालचंद्र नेमाडे यांचा आईसोबतचा फोटो (१९४१). (फोटो सौजन्य : श. रा. राणे आणि हरमिस प्रकाशन.)पुणे : वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्यापाठोपाठ मराठी भाषेला चौथा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे आज, २७ मे २०१८ रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत. सध्या ते त्यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीचा पुढचा भाग प्रकाशित करण्याच्या तयारीत आहेत. तसेच सध्या ते महाराष्ट्रात नाहीत, असेही त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्यावर कळले. त्यामुळे त्यांचा हा विशेष वाढदिवस कदाचित महाराष्ट्राबाहेर साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

‘काहीच दिवसांपूर्वी नेमाडे सरांशी माझे बोलणे झाले असून, त्यांनी सध्या ‘हिंदू’ कादंबरीचा दुसरा भाग पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,’ असे पुण्यातील ‘अक्षरधारा बुक गॅलरी’चे संस्थापक संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. ‘ते आपला वाढदिवसही कोणताच गाजावाजा न करता साधेपणाने साजरा करणार आहेत. कोणत्याही जाहीर कार्यक्रमात आपण सहभागी होणार नाही, असेही नेमाडे सरांनी सांगितले आहे,’ असे राठिवडेकर म्हणाले. 

‘पुण्यात २७ मे या त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची सर्व पुस्तके २५ टक्के सवलतीच्या दरांमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. या पुस्तकांमध्ये नेमाडे यांच्या ‘कोसला’पासून ‘हिंदू’पर्यंतच्या सर्व कादंबऱ्या, तसेच साहित्य अकादमी विजेते समीक्षाग्रंथ ‘टीकास्वयंवर,’ ‘तुकाराम,’ ‘साहित्याची भाषा,’ त्यांनी संपादित केलेली ‘तुकाराम गाथा’ व साने गुरुजींवरील पुस्तक यांचाही त्यात समावेश आला आहे,’ असे राठिवडेकर यांनी सांगितले. 

भालचंद्र नेमाडे यांची अनेक पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे ‘बुकगंगा डॉट कॉम’चे संस्थापक मंदार जोगळेकर यांनी सांगितले. नेमाडे सरांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांकडून पुस्तकांची मागणी नक्की वाढेल, असा विश्वांसही त्यांनी व्यक्त केला. (नेमाडे यांची पुस्तके मागविण्यासाठी https://goo.gl/fQDQLK येथे क्लिक करा.)

भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्य अकादमी विजेत्या ‘टीकास्वयंवर’ पुस्तकाचे प्रकाशक व साकेत प्रकाशनाचे संस्थापक बाबा भांड म्हणाले, ‘मी नेमाडे सरांचा विद्यार्थी आहे आणि त्यांच्या प्रेरणेतूनच प्रकाशन व्यवसायात उतरलो. आज वयाच्या या टप्प्यावर त्यांनी आपली प्रकृती चांगली ठेवली आहे, याचा आम्हा साऱ्यांनाच आनंद आणि आधार वाटतो. सरांच्या ‘टीकास्वयंवर’बरोबर त्यांच्या ‘कोसलाबद्दल’ या पहिल्या पुस्तकाचे संपादनही केले होते. त्यांनी लिहिलेल्या ‘तुकाराम’ या इंग्रजी पुस्तकाचा चंद्रकांत पाटील यांनी केलेला मराठी अनुवादही आम्ही छापला. याशिवाय ‘साहित्याची भाषा’ हे पुस्तकही आम्ही छापले. एव्हाना ‘टीकास्वयंवर’चा इंग्रजी किंवा हिंदीत अनुवाद व्हायला हवा होता, इतके ते महत्त्वाचे पुस्तक आहे. अजूनही मराठीतली अनेक चांगली पुस्तके अन्य भाषांमध्ये अनुवादित होत नाहीत, हे चित्र आता तरी बदलायला हवे.’ 

पुण्यातील कोथरूड भागातील ‘पुस्तक पेठ’ या दुकानाचे भागीदार आणि लेखक संजय भास्कर जोशी यांनीही या दिवशी (२७ मे २०१८) नेमाडे सरांची सर्वच पुस्तके ३० टक्के सवलतीच्या दरामध्ये विकण्याचा मनोदय व्यक्त केला. ‘आम्ही ‘हिंदू’ कादंबरीचा पुढचा भाग कधी येतो याची आतुरतेने वाट पाहत आहोत. तो लिहिण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळावा, याच त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देत आहे,’ असे ते म्हणाले. 

फडके, खांडेकर यांनी विसाव्या शतकाचा पूर्वार्ध आपल्या साहित्याने गाजवला, तसा नेमाडे यांचा कालखंड १९६३मध्ये त्यांच्या ‘कोसला’ या पहिल्याच कादंबरीपासून सुरू होतो. ‘उदाहरणार्थ’ या शब्दाचा कल्पक वापर ‘कोसला’ कादंबरीमध्ये करण्यात आला होता. तो शब्द तेव्हाच्या तरुण पिढीच्या रोजच्या बोलण्यात बसला होता! मराठीच्या अभिजित साहित्यात ‘कोसला’ कधी विराजमान झाली, ते कळलेच नाही. मराठी साहित्यातील तो एक मैलाचा दगड बनला. नेमाडे यांचे फर्ग्युसन कॉलेजमधील जीवन व त्यानंतरचे गावामधील जीवन यावर आधारित असलेल्या या कादंबरीचे अनेक अर्थ लावले गेले. तत्कालीन अभ्यासक व समीक्षकांनी त्यावर स्वतंत्र पुस्तकेही लिहिली. वासुदेव सावंत यांनी ‘भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा अभ्यास’ या नावाचे एक स्वतंत्र पुस्तकही लिहिले. डॉ. किशोर सानप यांनी ‘भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी - एक चिकित्सा’ हे स्वतंत्र पुस्तकच लिहिले. १९९२मध्ये नागपूर विद्यापीठाने सानप यांचा निबंध स्वीकृत करून त्यांना ‘आचार्य’ ही पदवी दिली. तो निबंध होता – ‘भालचंद्र नेमाडे यांचे वाङ्मय : एक अभ्यास.’ ते म्हणतात, ‘नेमाडे यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून एक निश्चित असा मूल्यविचार मांडला आहे.’  

‘कोसला’मधील पांडुरंग सांगवीकर, बिढार, जरीला, झूल यांमधील चांगदेव पाटील आणि सध्या गाजत असणाऱ्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीचा नायक खंडेराव. स्वत:च्या परिस्थितीबरोबर स्वत:चा व आसपासच्या जगाचा शोध घेण्याची वृत्ती असणारे हे तिन्ही नायक म्हणजे नेमाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची तीन रूपे आहेत, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. १९६३मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’नंतर चौदा वर्षांनी बिढार व झूल या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर पुढची ‘हिंदू’ प्रकाशित व्हायला मात्र आणखी तीन दशके जावी लागली! 

कादंबरी लेखनाबरोबरच समीक्षा हा नेमाडे यांचा आवडीचा प्रांत. समकालीन कलाकृतीची समीक्षा केवळ जुजबी स्वरूपात न करता, ती अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी मराठीतील गेल्या हजार वर्षांतील सर्व साहित्याशी तुलना करत समीक्षा लिहिली. गमतीने ते तत्कालीन समीक्षकांना शेंबडे समीक्षक असे संबोधत! प्रसंगी अगदी प्रस्थापित समीक्षक आणि लेखकांवर आपली धारदार लेखणी चालवायला ते कधी कचरले नाहीत. ‘टीकास्वयंवर’ हे त्यांनी लिहिलेल्या समीक्षेवरील पुस्तक मराठीतील मानदंड ठरले व साहित्य अकादमीचा पुरस्कार त्याला मिळाला. इतिहासात व पुरातत्त्वशास्त्रात जाऊन त्यांनी साहित्याची मांडणी केली. त्यामुळे वि. का. राजवाडे यांच्यानंतर नेमाडे असे गौरवाने म्हटले जाऊ लागले! आपल्या समीक्षेत त्यांनी देशीवादाची स्वतंत्र मांडणी केली व आपली भूमिका अधिक विस्ताराने लिहिली. त्यात त्यांची स्वत:ची सैद्धान्तिक भूमिकाही प्रभावी ठरल्यामुळे तिच्यावर गेली तीन-चार दशके चर्चा होताना दिसते. अभ्यास केल्याशिवाय बोलू नये, असा एक दंडकच त्यांनी घालून दिला. 

‘मराठीत संत तुकाराम हा पहिला क्रांतिकारी कवी,’ असे सांगून त्यांनी इंग्रजीतून तुकोबांचे महत्त्व विशद केले. ‘तुकोबाच्या गाथा’ या तुकारामांच्या निवडक अभंगांचे पुस्तक संपादित करताना १३ पानी विस्तृत भूमिका मांडताना त्यांनी लिहिले, ‘तुकाराम झाला नसता, तर मराठी भाषा खरोखरच दरिद्री राहिली असती. सर्व प्रकारच्या व्यक्तींना आपल्या नानाविध भावभावना यथायोग्य तऱ्हेने व्यक्त करता येतील, अशी सोय तुकारामाच्या अभंगांनी करून ठेवली आहे. तुकाराम महाकवी झाला तो त्याच्या खऱ्या मानवी आस्थेमुळे व सर्व मानवजातीच्या करुणेमुळे.’

‘साहित्याची भाषा’ या पुस्तकात नेमाडे यांनी साहित्याच्या भाषेचा प्राथमिक अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे त्यांचे काही लेख एकत्र केले आहेत. याबाबत नेमाडे म्हणतात, ‘ह्या विषयाचे अध्यापन गेली काही वर्षे मी इंग्रजीतून करीत आहे. तरी स्वभाषेत असे विचार मांडताना कितीतरी संकल्पना मुळापासून स्पष्ट होतात, याचा मला अनुभव आला. त्यामुळेच सर्व विषयांच्या प्राध्यापकांनी आपापल्या मातृभाषेतच लेखन केले पाहिजे.’ 

‘कोसलाकारांची सतरा वर्षे’ या नावाचे एक पुस्तक श. रा. राणे यांनी लिहिले असून, त्यात त्यांच्या खानदेशातील सांगवी बुद्रुक या गावातील बालपण ते फर्ग्युसन कॉलेजपर्यंतचा प्रवास मांडला आहे. मॅट्रिकपर्यंत नेमाडे यांचा सांगवी आणि भालोद या दोन गावांशी संबंध आला. या दोन गावांनी त्यांना खूप काही दिलं व त्यांनी खूप काही आत्मसात केलं. राणे म्हणतात, ‘हे पुस्तक लिहिताना मला नेमाडे यांचे मामा वसंत रामचंद्र चौधरी व नीलकंठ ऊर्फ बालमुकुंद तुकाराम चौधरी, नेमाडे यांच्या आई, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, वर्गबंधू सुधाकर गोविंदा चौधरी यांच्या मुलाखतींचा उपयोग झाला. नेमाडे यांचा जन्म २७ मे १९३८चा असला तरी कागदोपत्री त्यांची जन्मतारीख पाच मे १९३८ अशी लागली आहे. त्यांचं जन्मनाव राशीप्रमाणे लक्ष्मण असून, कागदोपत्री भागवत आणि भालचंद्र असे आहे. तो कुणीतरी मोठा माणूस होईल, असं आजोबा तुकारामबुवा नेहमी म्हणायचे. भालचंद्र हे नाव नेमाडे यांना त्यांच्या निळू ऊर्फ बालमुकुंद मामांनी बहाल केलेले आहे.’ 

१९५० व ६०मधील अनियतकालिकांच्या चळवळीत नेमाडे यांचे लेखन खऱ्या अर्थाने सुरू झाले व बहरलेही. ‘वाचा’ या अनियतकालिकाचा लोकसाहित्य विशेषांक काढण्यात आला होता. या अंकात नेमाडे यांनी भागवत वना सांगीकर या नावाने सांगवी जिल्ह्यातील लोकसाहित्य प्रकाशित केले होते. त्यात त्यांनी ‘नागो नन्हेरी बोवांची वही’ आणि ‘नागो कन्हेरी मळ्याची वही’ अशा दोन कविताही लिहिल्यात. 

लोकवाङ्मयगृहाने नेमाडे यांच्या निवडक मुलाखती आणि निवडक भाषणे या नावाची दोन स्वतंत्र पुस्तकेच प्रकाशित केली. मुलाखतीच्या पुस्तकात नारायण बांदेकर, विलास खोले, अनिकेत जावरे, चंद्रकांत पाटील, गिरीश कुबेर, केशव सद्रे, रमेश शिपूरकर, नागनाथ कोत्तापल्ले, उत्तम क्षीरसागर, प्रसन्नकुमार अकलूजकर, सुमेध वडावाला, राजेंद्र साठे, मेधा कुलकर्णी, सुनिल शिनवडे, उत्तम कोळगावकर आणि गजानन जाधव यांनी घेतलेल्या प्रातिनिधिक मुलाखती आहेत.  

साने गुरुजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘साने गुरुजी पुनर्मूल्यांकन’ नावाचे पुस्तक साहित्य अकादमीने १९९९मध्ये प्रकाशित केले होते. त्याचे संपादक या नात्याने नेमाडे यांचे विचार विशेषत्वाने भावतात. ते म्हणतात, ‘लेखक म्हणून साने गुरुजी एका प्राचीन संत परंपरेशी नाते जोडतात. आजपावेतो सर्व पिढ्यांचे आवडते लेखक म्हणून साने गुरुजी मान्यता पावलेले आहेतच. परंतु आजच्या कित्येक विद्रोही चळवळी, संघटना, संस्था आणि व्यक्ती ह्याही साने गुरुजींच्या उदारमतवादी विचारांशी आपलं नातं सांगतात. आणखी येत्या अनेक पिढ्यांवर वाङ्मयीन संस्कृतीचे पहिलेवहिले संस्कार त्यांचेच होत राहतील. ‘श्यामची आई’सारख्या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी समाजाच्या खालच्या वरच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्यांना एका भाषिक बंधुत्वाचं भान आणून देणारे साने गुरुजींसारखे लेखक आधुनिक काळात फारसे नाहीत.’ 

‘टीकास्वयंवर’ या साहित्य अकादमी विजेत्या पुस्तकामागची भूमिका मांडताना नेमाडे म्हणतात, ‘पिकांच्याच नव्हे, तर जमिनीच्याही भल्यासाठी आलटून पालटून निरनिराळी पिके निरनिराळ्या मोसमांमध्ये पेरण्याची आपली शेतीची श्रेष्ठ परंपरा असून जगणे, साहित्य लिहिणे आणि टीका करणे हाही तशापैकी एक प्रकार असावा. नेहमीचे जगण्याचे प्रश्न ज्याप्रमाणे आम्हास साहित्यात निकराचे वाटतात, त्याचप्रमाणे साहित्यासंबंधीचे प्रश्नही आम्हास टीकेत तातडीचे वाटतात.’ 

‘नेमाडे यांचे साहित्य - एक अन्वयार्थ’ हे पुस्तक लिहिणारे प्रा. केशव सद्रे यांनी म्हटले आहे, की १९६०नंतरच्या मराठी साहित्याच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या स्वयंभू तेजाने तळपणारे एक वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व म्हणजे भालचंद्र नेमाडे. कादंबरी, कविता आणि समीक्षा अशा तीन अंगांमध्ये त्यांचा प्रभावी संचार होता. उच्चवर्णीयांच्या व नागर उच्चभ्रू वर्गाच्या वर्चस्वामुळे मराठी साहित्याला व समीक्षेलाही त्या वर्गाच्या वळचणीला उभे केल्याची, दावणीला बांधण्याची कळा आली होती. त्यातून साहित्य व समीक्षेची सुटका करण्याचे मोलाचे काम नेमाड्यांनी केले.

मराठीचे अभ्यासक आणि प्रकाशक ह. ल. निपुणगे यांनी नेमाडे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर एक विशेषांक काढला होता. ‘देवदास आणि कोसला’ या प्रा. मृणालिनी पाटील यांच्या समीक्षा-संपादन पुस्तिकेत त्या म्हणतात, की मर्ढेकरांच्या ‘प्रायोगिक रात्रीचा दिवस’ या कादंबरीनंतरचा मराठी कादंबरी वाङ्मयातला ‘कोसला’ हा अभूतपूर्व प्रयोगच आहे. नेमाडे यांची यातील भाषा, रचना, तंत्र आदींबाबत ‘कोसला’ची घडण निराळी आहेच; पण जीवनाची व्यापक संभाव्यता आणि त्यातून घडलेले व्यस्ततावादी दर्शनही निराळे आहे. नायक पांडुरंग सांगवीकरच्या निवेदनातून समग्र मानवी जीवनातील भंकसपणा दाखवण्याचा प्रयत्न नेमाड्यांनी केला आहे. त्यामुळेच कोसला म्हणजे पांडुरंग सांगवीकरच्या परात्मवृत्तीची कहाणी असून, त्यामुळे या कादंबरीला एक प्रकारचा शोकात्म घाट प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्याची देवदास या साहित्यकृतीशी तुलना करावीशी वाटते. 

मोठे मानसन्मान मिळूनही ‘एकला चलो रे’ या तत्त्वाने वयाच्या ८०व्या वर्षातही सतत कार्यमग्न राहणाऱ्या डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे हार्दिक शुभेच्छा! 

(भालचंद्र नेमाडे यांच्याबद्दल अधिक वाचा ‘दिनमणी’मध्ये...)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search