Next
‘श्रद्धा’पूर्वक मेहनतीतून ‘समर्थ’तेकडे...
अनिकेत कोनकर
Friday, March 08, 2019 | 11:15 AM
15 0 0
Share this article:

श्रद्धा सबुरी बचत गटाच्या केंद्रावर असलेली गर्दी

रत्नागिरी :
महिला स्वयंसाह्यता बचत गटांची चळवळ आता राज्यभरात चांगलीच फोफावली आहे; मात्र उत्तम आणि सातत्यपूर्ण कामगिरी दीर्घ काळ करणाऱ्या बचत गटांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. अशा दुर्मीळ बचत गटांमध्ये रत्नागिरी शहराजवळच्या नाचणे गावातील श्रद्धा सबुरी गटाचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. या गटातील महिलांनी ११ वर्षांपूर्वी सुरू केलेला खाद्यपदार्थांचा व्यवसाय त्यांनी कामावर श्रद्धा ठेवून केलेल्या मेहनतीमुळे भरभराटीला आला आहे. या व्यवसायाच्या नफ्यातून गटातील प्रत्येक महिलेला दरमहा कमीत कमी पाच हजार रुपये वेतन मिळते. गटाच्या प्रगतीची कल्पना यावरून येऊ शकते. या गटाची प्रेरणा घेऊन गावातच दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या श्री साई समर्थ बचत गटानेही कमी कालावधीत चांगला जम बसवला आहे. 

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने एक वेगळा आदर्श घालून देणाऱ्या या बचत गटातील महिलांची मेहनत हे तर त्यांच्या यशस्वितेचे प्रमुख कारण आहेच; पण नाचणे गावाचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन हे घटकदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याच पुढाकारातून हे बचत गट सुरू झाले आहेत.संतोष सावंत यांच्या पुढाकारातून गेली अनेक वर्षे गावात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. ते शिवसेनेतही गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्या माध्यमातूनही त्यांचे कार्य सुरू असते. केवळ गावातील लोकांना गरजेसाठी कर्ज देणारी पतसंस्थाही त्यांनी सुरू केली असून, गेली अनेक वर्षे तिला ‘अ’ दर्जा मिळतो आहे. गावात साई मंदिर बांधून, त्याच्या आवारात मंडप उभारण्यात आला आहे. हा मंडप गरजूंना विवाहासाठी कमी खर्चात उपलब्ध करून दिला जातो. 

असे विविध उपक्रम अनेक वर्षांपासून राबविले जात असल्याने गावातील लोकांशी सावंत यांचे चांगले संबंध आहेत. गावकऱ्यांच्या गरजा, त्यांच्या घरची परिस्थिती, त्यांच्याकडे असलेली कौशल्ये यांचीही माहिती त्यांना आहे. त्यातूनच एके दिवशी या बचत गटांची सुरुवात झाली. त्याची कहाणी त्यांच्याकडून जाणून घेतली.

केंद्राची सुरुवात

‘बचत गटांची चळवळ बांगलादेशात महंमद युनूस यांनी सुरू केली. त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले, त्या वेळी त्याच्या बातम्या आल्या. त्या पाहिल्यावर आमच्या गावातही महिला बचत गटाची सुरुवात करावी, असं वाटलं. महिलांसाठी त्याआधीही गावात विविध उपक्रम राबविले होते; मात्र बचत गटाचीही सुरुवात करण्याचा विचार केला. त्याच दरम्यान, साई मंदिराच्या उत्सवावेळी काही महिलांनी वडा-पाव वगैरे पदार्थांचे स्टॉल लावण्याची कल्पना पुढे आली. तो चांगला चालला. गावातील शिवसेना शाखेच्या कार्यक्रमातही त्यांनी स्टॉल लावला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातूनच मग या हंगामी व्यवसायाला बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून कायमस्वरूपी उद्योगात रूपांतरित करण्याचा विचार पुढे आला. त्या सर्वांशी बोलल्यावर त्यांनाही ती कल्पना पटली आणि आवडलीही. त्यातूनच मग २० मार्च २००८ रोजी श्रद्धा सबुरी बचत गटाची मुहूर्तमेढ रोवली गेली.....’ संतोष सावंत सांगत होते. 

निरीक्षणगृहाला भेट

संतोष सावंत यांच्याच आवारात श्रद्धा सबुरी बचत गटाची वडा-पावची गाडी सुरू झाली. ही गाडीही सावंत यांनीच मोफत उपलब्ध करून दिली होती. तसेच बचत गटासाठी मिळणाऱ्या खेळत्या भांडवलाव्यतिरिक्त व्यवसायाच्या प्रारंभी काही आवश्यक आर्थिक मदतही त्यांनी केली. प्रत्येक महिलेला पदार्थ बनविता येत असले, तरी व्यवसायाच्या दृष्टीने पाककलेसह आवश्यक त्या गोष्टींचे प्रशिक्षणही या महिलांना देण्यात आले. गटातील महिला एकजुटीने, इमाने-इतबारे काम करत राहिल्यामुळे त्यांच्या व्यवसायाची भरभराट होत गेली. खाद्यपदार्थांची चव उत्कृष्ट असल्यामुळे चवीची कीर्ती गावापुरतीच मर्यादित न राहता रत्नागिरी शहरापर्यंत पसरली. तिकडूनही खास हे पदार्थ खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यानंतर गाडीवरचा व्यवसाय सावंत यांच्याच जागेत एका खोलीत स्थलांतरित करण्यात आला. गटाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू लागेपर्यंत सावंत यांनी जागेचे भाडेही घेतले नाही. या महिलांचा उद्योग चांगला उभा राहावा, हा उद्देश त्यामागे होता. महिलांच्या जिद्दीला आणि कष्टांना असा खंबीर पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांच्या उद्योगाची भरभराट झाली.या गटातर्फे चालवल्या जाणाऱ्या केंद्रात वडा-पाव, पॅटिस, भजी, चहा असे मोजकेच पदार्थ मिळतात; पण त्यांची चव अप्रतिम असल्यामुळे ग्राहकांची मागणी मोठी असते. आणखी काही पदार्थ त्यांनी वाढविलेही होते; मात्र सगळ्यांची मागणी पूर्ण करणे अवघड होत असल्याने मोजकेच पदार्थ कायम ठेवण्यात आले. दररोज सकाळी आणि संध्याकाळीही या केंद्रावर भरपूर गर्दी असते.

चटकदार वडे...

योगिता योगेश जाधव (अध्यक्ष), मानसी सूर्यकांत लोखंडे (सचिव), विद्या संतोष सावंत (खजिनदार), अर्चना सचिन पालकर, मीनल मंगेश सावंत, अनिता अनिल देसाई, सीमाली संतोष लाखण, लता चंद्रकांत लोखंडे, अर्चना अशोक लाखण, जान्हवी राजेंद्र देसाई, अंकिता हेमंत देसाई, स्मिता अनिल रांबाडे, मनाली मनोज भागवत, राधा श्रीकांत बने या १४ जणी श्रद्धा-सबुरी बचत गटात आहेत. त्यापैकी विद्या सावंत या खजिनदार म्हणून हिशेबाचे आणि आर्थिक व्यवहारांचे पूर्ण काम पाहतात. बाकीच्या १३ जणी पूर्ण वेळ व्यवसायात कार्यरत असतात. या महिला ३५ ते ६३ या वयोगटातील आहेत.सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी साडेतीन ते रात्री साडेनऊ या वेळेत हे केंद्र सुरू असते. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे त्यांचे नियोजन असते. नऊ ते साडेदहा, साडेदहा ते बारा, साडेतीन ते साडेसहा आणि साडेसहा ते साडेनऊ अशा कामाच्या चार वेळा ठरवण्यात आल्या आहेत. तसेच, सहा आणि सात जणींच्या दोन उपगटांत १३ जणींची विभागणी करण्यात आली आहे. या दोन उपगटांतील महिला कामाच्या वरील वेळांमध्ये आलटून-पालटून येतात. त्यामुळे प्रत्येक महिलेला साधारणतः सकाळी दीड तास आणि संध्याकाळी तीन तास, असे दिवसाला साडेचार तास काम करावे लागते. साफसफाई, कांदे-बटाटे चिरणे, भाजी करणे, तळणे, ग्राहकांना सर्व्ह करणे, भांडी घासणे अशा सर्व जबाबदाऱ्याही प्रत्येकीला वाटून दिल्या जातात. योग्य नियोजन असल्यामुळे कोणीही कोणतेही काम करू शकते आणि कामे वारंवार बदलत असल्यामुळे कोणाला कामाचा कंटाळाही येत नाही. रोजच्या रोज सर्व हिशेबाची नोंद ठेवली जात असल्याने त्यात काही घोळ होण्याचा प्रश्नच नसतो. कांदे, बटाटे, बेसन, तेल वगैरे पदार्थांची मागणी मोठी असल्याने ते जागेवरच आणून पोहोचवले जातात. त्यांचे पैसे चेकने दिले जातात. गणपतीचे पाच दिवस, दिवाळी आणि शिमग्याचा एखादा दिवस यांसह अगदीच अडचण असेल अशा काही दिवसांचा अपवाद वगळता वर्षभर हे केंद्र दररोज सुरू असते. कोणाला कधी काही अडचण असेल, तर एकमेकींमध्ये जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात. जास्त वेळ काम करावे लागले, तर ‘ओव्हरटाइम’ही मिळतो.दर महिन्याच्या पाच तारखेला गटाची बैठक असते. त्यात सर्व खर्च आणि उत्पन्न यांचा हिशेब वाचून दाखविला जातो. मिळालेला नफा आणि प्रत्येकीची उपस्थिती यांचा हिशेब करून प्रत्येकीचे वेतन ठरविले जाते आणि ते थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा केले जाते. हा व्यवसाय आता अशा टप्प्यावर आला आहे, की जागेच्या भाड्यासह सर्व खर्च वजा जाता प्रत्येकीला महिन्याला कमीत कमी पाच हजार रुपये वेतन मिळते. काही वेळा हा आकडा अगदी सात-आठ हजारांपर्यंतही जातो. अर्थात, हे सारे अचानक घडलेले नाही. गेली ११ वर्षे या सर्व जणी घेत असलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. या व्यतिरिक्त गटाच्या नफ्यातून मिळालेल्या सुमारे लाखभर रुपयांची मुदत ठेव ठेवली जाते. त्यातून दिवाळीच्या वेळेला सर्वांना बोनस दिला जातो. तसेच, पिग्मीच्या माध्यमातूनही पैशांची बचत केली जाते. त्यातून मिळणारे पैसे जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरू होतानाच्या काळात महिलांना दिले जातात. थोडक्यात सांगायचे झाले, तर या व्यवसायातून त्यांना नोकरीप्रमाणेच उत्पन्नाचा खात्रीशीर स्रोत निर्माण झाला आहे. कोणतीही चार माणसे एकत्र आली, की ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या नियमाने वेगवेगळी मते आली आणि मतभेदही आले; मात्र मनभेद होऊ न देणे महत्त्वाचे असते. हे तत्त्व या गटात कसोशीने पाळले जाते. 

संतोष सावंत
‘‘काही मतभेद झालेच, तर ते मासिक बैठकीच्या वेळी सर्वांसमक्ष चर्चेच्या माध्यमातून सोडवावेत. त्यांचा कामावर परिणाम होऊ देऊ नये,’ असे या गटाचा मार्गदर्शक या नात्याने मी या महिलांना सांगितले आहे आणि त्याची अंमलबजावणीही होते. त्यामुळे कधी काही मतभेद झालेच, तर ते योग्य पद्धतीने सोडवले जातात. त्यामुळे गैरसमज होत नाहीत आणि कोणाच्या मनात काही किल्मिषही राहत नाही. या सर्व महिला इतकी वर्षे एकजुटीने काम करत आहेत, यावरून ते सिद्ध होते,’ असे संतोष सावंत यांनी सांगितले. 

‘गटातील एका महिलेच्या पतीचे अचानक निधन झाले. तिचा मुलगा थोडा अपंग आहे. त्यामुळे अडचणीची परिस्थिती उद्भवली; मात्र गटाच्या या व्यवसायामुळे तिचे उत्पन्न हा तिच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत बनला,’ अशी माहिती सावंत यांनी दिली. बचत गटाने नेमके काय साध्य केले आहे, हे यावरून अधिक स्पष्ट होते.

श्रद्धा सबुरी बचत गटातील महिला

‘बचत गटात आल्यामुळे आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे,’ असे या गटाच्या अध्यक्षा योगिता जाधव सांगतात. गटातील सर्व जणींशी बोलल्यावर तीच भावना व्यक्त झाली. ‘केवळ चूल आणि मूल यात अडकून न पडता घराबाहेर पडल्यावर आम्हीही वेगळे काही करून दाखवू शकतो आणि ते चांगल्या पद्धतीने चालवू शकतो, याचा आत्मविश्वास आम्हाला आला. पैशांसाठी आम्हाला कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत. आमच्या व्यवसायामुळे कुटुंबाला हातभार लागतो, याचा अभिमान आहे,’ असे जाधव म्हणाल्या. 

‘या महिलांमध्ये खूप चांगले बाँडिंग निर्माण झाले आहे, ते त्रयस्थालाही सहज लक्षात येते,’ असे निरीक्षण जवळच्याच शांतिनगरमध्ये राहणाऱ्या क्षितिजा भागवत या तरुणीने नोंदवले.

या गटाचा वर्धापनदिन साजरा करताना सामाजिक भानही जपले जाते. कोणत्या तरी सामाजिक संस्थेत हा दिवस साजरा केला जातो. एके वर्षी हा दिवस मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या आशादीप संस्थेत, तर एकदा निरीक्षणगृहात साजरा करण्यात आला होता.

नवा बचत गट
याच गटापासून प्रेरणा घेऊन गावातच श्री साई समर्थ नावाचा बचत गट दीड वर्षापूर्वी स्थापन करण्यात आला. त्यांनाही संतोष सावंत यांचे पाठबळ आहेच. प्राजक्ता प्रदीप आडमकर (अध्यक्षा), स्नेहा सुहास ठीक (खजिनदार), शर्वरी प्रकाश ढेपसे (सचिव), प्रतिभा राजेंद्र खापरे, सरिता दत्ताराम सुपल, शांता कनिराम पुजारी, यशोदा मुकुंद सुवरे, साक्षी संदीप जोशी अशा आठ जणी बचत गटात आहेत. त्यापैकी सात जणींनी मिळून गावातच साळवी स्टॉपजवळ खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भाकऱ्या मिळतात. तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणे अशा सर्व प्रकारच्या उत्कृष्ट भाकऱ्या ऑर्डरनुसार तयार करून मिळत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोकांची चांगली सोय झाली आहे. त्याशिवाय पॅटिस, वडा-पाव असे पदार्थ तर आहेतच; पण इथल्या भाकऱ्यांना अल्पावधीत मोठी मागणी येऊ लागली आहे. अनेक जण फोनवरून ऑर्डर नोंदवून ठेवतात. त्यांना हव्या त्या वेळेत भाकऱ्या तयार ठेवल्या जातात, असे अध्यक्षा प्राजक्ता आडमकर यांनी सांगितले. मटणासारखे काही मांसाहारी पदार्थही या महिला करून देतात. सगळेच पदार्थ रुचकर असल्याने भरपूर मागणी आहे. प्राजक्ता आडमकर म्हणाल्या, ‘आम्ही सर्व जणी एका ध्येयाने काम करतो. ग्राहकांचे समाधान करणे हेच आमचे उद्दिष्ट असते. त्यामुळे कधी लवकर यायला लागले, कधी जायला उशीर झाला, तर त्यात आम्हाला काहीही वावगे वाटत नाही. या गटामुळे आम्हाला आमच्या कष्टाचे हक्काचे चार पैसे मिळू लागले आहेत, याचा आनंद आहे.’या गटातही साधारण ३५ ते ६० या वयोगटातील महिला आहेत. यांचे केंद्रही सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळांत सुरू असते. श्रद्धा सबुरी गटाप्रमाणेच या गटाचेही काम नियोजनपूर्वक चालते. या गटातील महिलांनाही खर्च वजा जाता प्रत्येकी सुमारे तीन हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू लागले आहे.‘गटातील एका महिलेचे वडील आजारी असतात. ते तिच्या घरी आहेत. त्यांच्या खर्चासाठी आपण पैसे उभे करू शकतो, याचे त्यांना समाधान आहे,’ असे आडमकर म्हणाल्या. 

आम्हा सर्वांना पतीने आणि घरच्या सर्वांनीच दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला हे चांगले काम करणे शक्य होते, अशी भावना सर्व महिलांनी व्यक्त केली. तसेच कोणतीही अडचण आली, तरी संतोष सावंत यांचे मार्गदर्शन आणि साह्य असल्यामुळे त्यातून सहज मार्ग काढता येतो, असेही त्यांनी सांगितले. 

गटातील महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी किंवा त्यांना सतत प्रोत्साहन देण्यासाठी एखादा भक्कम आधार असेल, तर किती चांगले काम होऊ शकते, हे यावरून दिसून येते. एखादा बचत गट कसा चालवावा, असे कोणी विचारले, तर ‘या दोन गटांसारखा’ असे उत्तर त्यांना नक्की देता येईल. या दोन्ही गटांतील महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि भरभराटीसाठी शुभेच्छा!

(बचत गटांच्या चळवळीविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. महिला दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील विशेष लेख/बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Gourav supal About 189 Days ago
All the best 👌
0
0
आश्विनीशेलार About 192 Days ago
छानआम्हाला पण अभिमान वाटतो
0
0
Prabhakar londheprabhakar8@gmail.com About 192 Days ago
Idea & patronage of Shri Santosh Sawant is great for successful implementation of BACHAT GAT. My Good Wishes to both the BACHAT Gats.
0
0
Irawati Patwardhan About 192 Days ago
Very innovative.. All d best.. Go ahead.. SKY is d limit.. Best wishes and regards
0
1
Maithili patil About 192 Days ago
Santosh kaka tumachya sahakaryane ya mahila swavalambi banalya 👍👌
0
0
संतोष सावंत About 193 Days ago
पहिल्यांदाच ही माहिती मोबाइल द्वारे लोकांपर्यंत पोचणार आहे कोंडकर धन्यवाद
0
0

Select Language
Share Link
 
Search