Next
कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल
BOI
Sunday, August 05, 2018 | 03:45 PM
15 1 0
Share this article:

सध्या कंपन्यांचे जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होत आहेत. त्याशिवाय रिझर्व्ह बँकेने वाढवलेला रेपो दर, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत राजकीय घडामोडी या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या कोणते शेअर्स घेण्यायोग्य आहेत, त्याची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
....... 
तीन ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३७ हजार ५५६वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११ हजार ३६० अंकांवर बंद झाला. आता २०१८च्या  जून तिमाहीच्या आकड्यांचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेअर बाजार स्थिर आहे. या आठवड्यात हेग, कॅपिटल फर्स्ट, ओएनजीसी, केईसी इंटरनॅशनल, नेस्ले आदी कंपन्यांचे आकडे जाहीर झाले. 

‘ओएनजीसी’ची या तिमाहीची विक्री २७ हजार २१२.८३ कोटी रुपये झाली. करोत्तर नफा ६१६३.८८ कोटी रुपये झाला. जून २०१७ तिमाहीची विक्री १९ हजार ७३.५४ कोटी रुपये होती व नफा ३८८४.७३ कोटी रुपये होता. सध्या या शेअरचा भाव १६७ रुपये आहे. पेट्रोलच्या किमती आता येत्या सहा महिन्यांत वाढत राहणार असल्याने नफाही वाढतच जाईल. हा शेअर खरेदी केल्यास वर्षभरात ३५ टक्के नफा देऊन जाईल.

‘हेग’ची या तिमाहीची विक्री १५९५.३३ कोटी रुपये होती व नक्त नफा ७७०.३३ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन १९२ रुपये पडले (वार्षिकीकृत उपार्जन ७६० रुपये दिसते), तरीही हा शेअर ४५०० रुपयापर्यंत जाऊन लगेच ४२५० रुपयांपर्यंत खाली आला. तो जेव्हा पुढील दोन महिन्यांत ३६०० रुपयांपर्यंत येईल, तेव्हा अल्प मुदतीच्या नफ्यासाठी जरूर घ्यावा. 

‘ग्राफाइट इंडिया’चे आकडे येत्या आठवड्यात प्रसिद्ध होतील. सध्याच्या १०६८ रुपये भावात आणखी ७० ते ८० रुपयांची वाढ व्हावी. अल्प मुदतीसाठी याची कमी भावात खरेदी करावी व ११५० रुपयांना विकावा. 

‘केईसी इंटरनॅशनल’ची जून २०१८ तिमाहीची विक्री २१०४.७२ कोटी रुपये होती व करोत्तर नफा ८६.८४ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन ३.३६ रुपये होते. हा शेअर सध्याच्या ३२८ रुपयांच्या आसपासच्या भावाला जरूर घेण्याजोगा आहे. वर्षभरात हा शेअरही ३० ते ३५ टक्के नफा देऊन जाईल.

सकाळी उठल्यावर ज्यांना कॉफीची तल्लफ येते, त्यांना ‘नेस्ले इंडिया’च्या शेअरमध्येही तीच खुशी मिळेल. या कंपनीची जून तिमाहीची विक्री २६९८.४० कोटी रुपये होती व करोत्तर नफा ३९५ कोटी रुपये होता. सध्या या शेअरचा भाव १० हजार ३२५ रुपये आहे. बारा महिन्यांमधील किमान भाव ६५३२ रुपये होता. हा शेअर दर वर्षी नवीन उच्चांकी भाव दाखवेल. पुढील एक-दोन वर्षांत तो ‘स्प्लिट’ही होऊ शकेल व त्यास बक्षीस भाग मिळू शकेल.

शेअर बाजारात योग्य वेळी योग्य शेअर्सची योग्य भावाला खरेदी केली व वाट बघितली, तर कालांतराने त्यात नफा असतो; पण एखादा शेअर हवा तसा वाढत नसला, तर थोडा-फार तोटा सोसून बाहेर पडायचे मनोधैर्यही हवे. कमकुवत मनाच्या व्यक्तीसाठी हा प्रांत नाही. त्यामुळे थोडे-फार शेअर घेत जाऊन आपली मानसिकता कणखर करायला हवी.

गेल्या बुधवारी रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात पाव टक्का वाढ करून, तो ६.५ टक्के केला. बाजाराला हे अपेक्षितच होते.

डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dilip S Borkar About
Dear Sir Very useful information Thank you very much Dilip Borkar
0
0

Select Language
Share Link
 
Search