Next
जनसेवा ग्रंथालयातर्फे रत्नागिरीत ‘साहित्यिक गुढी’
BOI
Thursday, April 04, 2019 | 12:36 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : मराठी साहित्यामध्ये चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, नवे साहित्यिक घडावे या उद्देशाने रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे सलग दुसर्‍या वर्षी अवघ्या साहित्य विश्वात औत्सुक्याचा विषय ठरलेली ‘साहित्यिक गुढी’ उभारण्यात येणार आहे.

शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यामध्ये प्राण फुंकून त्यांच्या साह्याने शकांचा पराभव केला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. शालिवाहनाने मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली. शालिवाहनाच्या चमत्काराचा असा तर्कसुसंगत अर्थ काढता येतो. हाच अर्थ अभिप्रेत धरून ही साहित्यिक गुढी उभारली जाणार आहे.

शालिवाहनाच्या पराक्रमाच्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला ‘शालिवाहन शक’ अशी सुरू करण्यात आली. ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते ‘शक’ अशा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ या संज्ञेमध्ये झाला आहे. यानिमित्त अवघ्या महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. नव्याची सुरूवात आणि नव्याची निर्मिती असा या सणाचा सोपा अर्थ आहे. त्याअनुषंगाने मराठी साहित्य विश्वात नव्याची निर्मिती व्हावी अर्थात वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी नेहमीच कटीबद्ध असलेल्या जनसेवा ग्रंथालयातर्फे ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. साहित्य विश्वातील हा एकमेव आणि आगळा-वेगळा असा उपक्रम आहे.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच पाच एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० वाजता जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुस्तकांची माळ असलेली साहित्यिक गुढी उभारण्यात येईल. या प्रसंगी गुढीपूजा व ग्रंथपूजा होईल. त्यानंतर मराठी साहित्याचा पाया रचणार्‍या संत साहित्याच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

‘साहित्यिक गुढीनिमित्त ‘संत तुकाराम आणि त्यांचे अभंग साहित्य’ या विषयावर सु. द. भडभडे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला समस्त नवोदित लेखक, वाचक, साहित्यिक, सभासद, विद्यार्थी, रत्नागिरीकर यांनी उपस्थिती लावावी,’ असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 167 Days ago
This activity should be a regular event in other towns , as well.
0
0

Select Language
Share Link
 
Search