Next
‘वनवासी समाज कोणत्याच बाबतीत कमी नाही’
वनवासी कल्याण आश्रमातर्फे कोकणातील तिडे गावात आरोग्य शिबिर
BOI
Thursday, December 27, 2018 | 03:39 PM
15 0 0
Share this storyमंडणगड :
‘वनवासी समाज बुद्धिकौशल्य, शारीरिक क्षमता, अशा कोणत्याही बाबतीत इतर भारतीयांपेक्षा कमी नाही. फक्त त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. वनवासी कल्याण आश्रम ही संस्था वनवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करत आहे,’ असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्र प्रांताच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती ठमाताई पवार यांनी केले.

वनवासी कल्याण आश्रमाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयातर्फे २५ डिसेंबर २०१८ रोजी मंडणगड तालुक्यातील तिडे गावाच्या कातकरी वस्तीवर महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

सुमारे १५० कातकरी महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. मंडणगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी मुख्य डॉक्टर शिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात तपासणी केली. कादिवली गावच्या डॉ. प्रवीणा दांडेकर आणि दाभोळ येथील डॉ. मृणाल गोंधळेकर यांचेही या शिबिरात योगदान होते. 

वनवासी कल्याण आश्रमाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा श्रीमती मीनाताई लेले, कोषाध्यक्ष दिगंबर घैसास, सचिव अभिराम दीक्षित, सहसचिव मीराताई मोरे, रायगड जिल्हा संघटनमंत्री गंगाराम गावित, कोकण प्रांताच्या महिला प्रमुख ज्योती पाटील आणि विभागीय सचिव विद्याधर मुळे या वेळी उपस्थित होते. या शिबिरासाठी दापोली येथील कार्यकर्ते गणेश वासावे, सदानंद महाजन, सौ. महाजन, शोभाताई दांडेकर, योगेश पालकर, तसेच रत्नागिरीतील श्री. बोरकर, लाटवण येथील कार्यकर्ते मोहन जाधव आणि तिडे येथील पोलीस पाटील दत्तात्रय हिलम यांनी विशेष सहकार्य केले. 

शिबिराला तिडे गावाचे सरपंच सुरेश बैकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दयानंद येसरे आणि तिडे गावातील आदिवासी वाडीचे अध्यक्ष नागेश हिलम यांनी भेट दिली. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना ठमाताई पवार म्हणाल्या, ‘गावात राहणारे ग्रामवासी, शहरात राहणारे शहरवासी, तर रानावनात राहणारे आपण वनवासी; पण आपण सारे भारतवासी आहोत. वनवासी समाज इतर भारतीयांपेक्षा कमी नाही. वनवासी कल्याण आश्रम ही संस्था आपल्या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करत आहे. आपण दोन पावले पुढे येऊन या गोष्टीचा फायदा करून घेतला पाहिजे. महिलांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. आपल्या मुला-मुलींना चांगले शिक्षण दिले पाहिजे. हीच मुले मोठी झाल्यावर आपल्या समाजाचे नाव मोठे करतील.’ 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीराताई मोरे यांनी केले. आरोग्य तपासणीनंतर सर्व महिला आणि तिडे ग्रामस्थ यांच्या एकत्र भोजनाने शिबिराचा समारोप झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link