Next
चिनी लोकांची इंग्रजी सुधारतेय
BOI
Monday, November 13, 2017 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

चिनी लोकांची इंग्रजी भाषा हा थट्टेचा विषय आहे; मात्र त्यांची इंग्रजी सुधारू लागल्याचे एका सर्वेक्षणात आढळले असून, त्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. तसेच ऑनलाइन इंग्रजी शिकणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढतेय. चिनी नागरिक इंग्रजीत पारंगत झाल्यास अमेरिकेसह भारतालाही आव्हान देऊ शकतात. याचा अर्थ आपण आपल्या भाषा सोडून इंग्रजीच्या वळचणीलाच उभे राहायचे असा नसून, भारतीयांना आपली इंग्रजी संवादकौशल्ये सुधारावी लागणार आहेत.
...............
आपल्या मोबाइल फोनचे मॅन्युअल तुम्ही कधी वाचून पाहिले असेल, तर तुम्हाला लाँग प्रेस (Long Press) हा वाक्प्रयोग वाचायला मिळाला असेल. इंग्रजीतील ‘होल्ड डाउन’ या शब्दाचे हे चिनी भाषेतील इंग्रजी रूप आहे. हा तर त्यातला त्यात अत्यंत सौम्य नमुना म्हणायला पाहिजे. चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीवर एक वाक्य अनेक वर्षे पर्यटकांचे लक्ष खेचून घेत होते. ‘विसरू नका, आग निर्दय असते’ (Do not forget, the fire is heartless) अशी ती पाटी होती. ती मुळात लोकांना काळजी घेण्याची सूचना देण्यासाठी होती; पण त्याचे असे रूप तिथे विराजमान होते. अशा प्रकारची इंग्रजी शब्दांची अनेक गमतीदार रूपे चिनी लोकांनी रूढ केली आहेत आणि म्हणूनच चिनी लोकांची इंग्रजी भाषा हा जगभरात थट्टेचा विषय आहे. आजही.

...मात्र याच चिनी लोकांची इंग्रजी सुधारते आहे. आणखी विशेष म्हणजे ते भारतीयांच्या जवळ येत आहेत. स्वीडनमधील ‘एज्युकेशन फर्स्ट’ या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे. ही संस्था जगभरातील लोकांच्या इंग्रजी बोलण्याचा निर्देशांक काढते आणि यंदाच्या निर्देशांकात चीनने मोठीच झेप घेतली आहे.

‘इंग्लिश प्रोफिशियन्सी इंडेक्स’ नावाच्या या निर्देशांकासाठी एकूण ८० देशांमध्ये पाहणी करण्यात आली. गैर-इंग्रजी भाषक देशांतील १० लाख लोकांची इंग्रजीची चाचणी घेऊन हा निर्देशांक तयार करण्यात येतो. त्यात चीनला ३६वे स्थान मिळाले आहे, तर भारताचे स्थान ८० देशांमध्ये २७वे आहे. या आधी ही पाहणी २०११ साली झाली होती. तेव्हाच्या तुलनेत चीनच्या स्थानात तीन क्रमांकांनी वाढ झाली आहे.

‘एज्युकेशन फर्स्ट’ने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे, की इंग्रजीभाषक देशांशी ऐतिहासिक संबंध असलेल्या देशांमध्ये इंग्रजीवर अधिक प्रभुत्व दिसत असले, तरी हे सर्वत्रच घडेल असे नाही. ब्रिटिशांचे राज्य असलेल्या आशियाई देशांपैकी सिंगापूरमध्ये या भाषेवर सर्वांत अधिक प्रभुत्व दिसून येते, तर पाकिस्तान आणि बांग्लादेश जवळजवळ तळाला आहेत. त्यातही बांग्लादेश (४६) हा पाकिस्तानच्या (५२) पुढे आहे.

आपल्या दृष्टीने हे महत्त्वाचे का आहे? तर युरोप आणि अमेरिकेच्या बहुतेक व्यवसायांना भारत अधिक जवळचा वाटायचे कारण हे येथील इंग्रजी भाषकांची तुलनेने चांगली संख्या हे होय. चिनी लोकांनी भरमसाठ प्रमाणात स्वस्त माल तयार करण्याची हातोटी मिळविली, तरी इंग्रजी येणे आणि इंग्रजीत बोलता येणे हा आतापर्यंत भारताचा एकाधिकार होता. अन् या मोर्चावर चीनला सातत्याने खाली पाहावे लागत होते.

एवढे, की २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी जेव्हा चीनने दावा सादर केला होता, तेव्हा बहुसंख्य लोकांना इंग्रजी शिकवू असे वचन चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला दिले होते. चिनी पद्धतीनुसार त्याची ठामेठोक अंमलबजावणीही झाली. ज्यांना इंग्रजी येत नव्हते, अशा टॅक्सीचालकांचे परवाने रद्द करण्यात आले. सार्वजनिक जागी लावण्यात आलेल्या पाट्यांवरील चुकीच्या इंग्रजी वाक्यांची तक्रार करण्यासाठी खास विभाग उघडण्यात आला. त्या वेळी पेइचिंग म्युनिसिपल टुरिझम ब्यूरोने एक आदेश काढला होता. त्यात विना दर्जा हॉटेलांना सक्त ताकीद देण्यात आली होती, की त्यांना पाहुण्यांना जागा द्यायची असेल तर इंग्रजी सुधारणे हाच त्याचा निकष असेल. या हॉटेलांना आपली नावे, कामाचे तास, खोल्यांचे भाडे आणि अन्य नोटिसांचा शुद्ध इंग्रजीत अनुवाद करावा लागेल, असे सांगण्यात आले होते.

‘चिंग्लिश’चा नमुनाअगदी अलीकडे चीनने ‘देशाची प्रतिमा खालावणाऱ्या’ रद्दड इंग्रजी भाषांतरांचे निर्मूलन करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या वर्षीच्या जून महिन्यात त्या संबंधीची घोषणाही करण्यात आली. या निकृष्ट भाषांतरांना चिंग्लिश या नावाने ओळखले जाते. त्याचे संपूर्ण निर्मूलन करण्याचा चंग चीनने बांधला आहे आणि त्यासाठी येत्या एक डिसेंबरपासून प्रयत्न सुरू होणार आहेत.

याउलट जगाच्या बाजारात ‘इंडियन इंग्लिश’ नावाची एक स्वतंत्र शाखा रूढ आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्रजी वृत्तपत्र भारतातील आहे. भारतातील सुमारे एक-चतुर्थांश म्हणजे ३० कोटी लोक इंग्रजी बोलू शकतात, असे मानले जाते. आज भारताची शान बनलेला माहिती-तंत्रज्ञान उद्योग याच इंग्रजीच्या बळावर फोफावला नाही का? अन् तरीही भारताला या धोक्याची दखल घ्यावीच लागणार आहे. कारण या परिस्थितीवर मात करण्यासाठी चालू असलेले चीनचे प्रयत्न. काही वर्षांपूर्वी जागतिक पातळीवर भारत म्हटले, की कॉल सेंटर डोळ्यासमोर येत असत. अमेरिका-युरोपीय देशांतील ग्राहकांना ही कॉल सेंटर सेवा पुरवत असत. आज फिलिपाइन्सने कॉल सेंटरचा संपूर्ण व्यवसाय आपल्याकडे वळविला आहे.

‘चिंग्लिश’चा नमुनाअसे म्हणतात, की चीनमधील सुमारे ३० कोटी लोक सध्या इंग्रजी भाषा शिकत आहेत. आज भारतात जेवढे लोक इंग्रजी बोलू शकतात तेवढीच ही संख्या आहे; पण त्यापेक्षाही नोंदवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा आकडा अमेरिकेच्या संपूर्ण लोकसंख्येएवढा आहे. याचाच अर्थ हे लोक उद्या इंग्रजीत पारंगत झाले, तर संपूर्ण अमेरिकेला ते आव्हान देऊ शकतात. चीनमधील इंग्रजी शिकविण्याचा उद्योग पाच अब्ज डॉलरचा आहे, असे चिनी माध्यमे म्हणतात.

ऑनलाइन इंग्रजी शिकणाऱ्या चीनमधील नागरिकांची संख्या २०१३मध्ये सहा कोटी ७२ लाख होती. ती या वर्षी १२ कोटी होईल, असा अंदाज आहे. उद्या हीच फौज आपल्याशी स्पर्धा करण्यासाठी येणार आहे. याचा अर्थ आपण आपल्या भाषा सोडून इंग्रजीच्या वळचणीलाच उभे राहायचे, असा नाही, तर भारतीय लोकांना आपली इंग्रजी संवादकौशल्ये सुधारावी लागणार आहेत. नाही तर दिवाळीला चिनी वस्तूवर बहिष्कार घालण्याची आवाहने करून थकलेल्या हातांना इंग्रजी शिकलेल्या चिनी लोकांवर बहिष्कार घालण्याचे संदेश पाठविण्याचे वाढीव काम करावे लागेल.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 208 Days ago
There is no demand for any Indian languag
0
0
sachin About
आमची मराठी माणसे हातभार लावत आहेत इंग्लिश वाढवण्यासाठी,, आपली मुले इंग्लिश शाळेत घालून,,मराठी फक्त बोलायचे नवीन उपक्रम चालू केला आहे,,,,
0
0

Select Language
Share Link
 
Search