Next
माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला ‘जलदक्षिणा’
घोडेगावमधील शाळेला जलशुद्धीकरण यंत्राची भेट
डॉ. अमोल वाघमारे
Tuesday, August 07, 2018 | 05:04 PM
15 0 0
Share this article:घोडेगाव :
शाळांमधून मुलांना शिक्षण तर दिले जातेच; पण आयुष्यभर पुरेल अशा संस्काराची शिदोरीही मुलांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळत असते. याची जाणीव अनेक मुले-मुली आयुष्यभर ठेवत असतात. म्हणूनच शाळेतून बाहेर पडून अनेक वर्षे झाल्यावरही मुलांना आपल्या शाळेविषयी आपुलकी असते. शाळेसाठी आपण काही तरी करावे, अशी इच्छाही त्यांच्या मनात असते. त्याचेच एक उदाहरण नुकतेच घोडेगावमध्ये पाहायला मिळाले.

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमधील जनता विद्यामंदिर विद्यालयात सन १९९२-९३मध्ये दहावी झालेल्या मुला-मुलींनी, सुमारे २५ वर्षांनी एकत्र येऊन या विद्यालयाला जलशुद्धीकरण यंत्र भेट दिले. त्यामुळे शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. हे यंत्र एक लाख रुपयांचे आहे. विद्यालयातील माजी विद्यार्थी युवराज काळे यांनी ५० पेलेही शाळेला भेट दिले.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त माजी नायब तहसीलदार विजय केंगले यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी त्या वर्षातील आपल्या वर्गातील सर्व सहकारी मित्र-मैत्रिणींना एकत्र करून जलशुद्धीकरण यंत्र शाळेला भेट देण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्वांनीच साथ दिली आणि ती प्रत्यक्षात आणली. कार्यक्रमावेळी विजय केंगले यांनी याविषयी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘या विद्यालयाने माझ्यासारख्या अनेक मुला-मुलींना घडवले व जगण्याची दिशा दाखवली. त्यामुळे या विद्यालयाप्रति आमच्या सर्वच माजी विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीची भावना आहे आणि यापुढेही राहील. या भावनेतूनच आम्ही हे छोटेसे पाऊल टाकले आहे. यानिमित्ताने आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आलो. गाठीभेटी झाल्या. यामुळे आम्हा सर्वांनाच झालेला आनंद अवर्णनीय असाच आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, घोडेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोमनाथ काळे, डॉ. विलास काळे, अॅड. संजय आर्वीकर, प्राचार्य ए. एस. मुळे, विद्यालयातील शिक्षक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भास्कर व मच्छिंद्र नाईक यांनी केले. डॉ. विलास काळे व तुकाराम काळे यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
bhakti About 324 Days ago
Related
0
0

Select Language
Share Link
 
Search