Next
हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी मालिका - अंजली
BOI
Monday, May 22, 2017 | 12:16 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘झी युवा’वर २२ मेपासून सोमवार ते शुक्रवारी रात्री आठ वाजता एक नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेचे नाव आहे ‘अंजली.’ ही मालिका हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवर घडते. एका इंटर्न म्हणून रुजू झालेल्या आणि डॉक्टर बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अंजलीची ही गोष्ट आहे. या मालिकेत अंजलीच्या शीर्षक भूमिकेत सुरुची अडारकर असून, हर्षद अतकरी, राजन भिसे, रेशम श्रीवर्धनकर, अभिषेक गावकर, भक्ती देसाई, उमा सरदेशमुख, योगेश सोमण, मीना सोनावणे, उमेश ठाकूर, संकेत देव, अर्चना दाणी अशा जुन्या-नव्या कलाकारांची फौज आहे.

सुरुची अडारकर म्हणजेच अंजली  क्षीरसागर ही नाशिकजवळच्या एका लहान गावातून आलेली एक स्वाभिमानी तरुण मुलगी. अतिशय साधी, हुशार आणि  प्रेमळ असलेली अंजली सर्वांची अतिशय लाडकी  आहे.  तिला कोणालाही दुखवायला आवडत नाही. डॉक्टर बनण्यामागे तिची दोन मुख्य कारणे आहेत, ती म्हणजे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि ज्या ठिकाणी रुग्णालये बांधली जाऊ शकत नाहीत तिथल्या लोकांवर उपचार करण्यासाठी ‘मोबाइल रुग्णालय’ सुरू करणे. ही स्वप्ने उराशी बाळगून ती शहरात शिकायला येते. 

सुरुची अडारकरअतिशय नावाजलेले असे डॉ. जनार्दन खानापूरकर (राजन भिसे)  यांच्या हॉस्पिटलमध्ये ती इंटर्नशिप करायला सुरुवात करते. तिच्याबरोबर अनुराधा आणि ओंकार हे दोघेसुद्धा इंटर्न म्हणून रुजू होतात. याच हॉस्पिटलमध्ये  जनार्दन खानापूरकर यांचा हुशार आणि निष्णात सर्जन असलेला मुलगा डॉ. यशस्वी खानापूरकर म्हणजेच हर्षद अतकरी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन परतलेला असतो व हॉस्पिटलचा कार्यभार हाताळत असतो. अतिशय हुशार डॉक्टर असूनही त्याची वृत्ती ही रुग्णांप्रति सेवाभावी असण्यापेक्षा व्यवहारी जास्त असते. त्याला भारतातील अतिशय प्रगत आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असे हॉस्पिटल बनवायचे असते. अंजलीची तत्त्वे आणि यशस्वीची स्वप्ने यात नेमका कोणाचा विजय होईल, हे या मालिकेत उलगडत जाईल.

हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी ‘अंजली’ ही मराठीतील पहिलीच मालिका आहे. अंजली कशा प्रकारे या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप ते डॉक्टर बनण्याचा प्रवास करते आणि त्यात काय काय गोष्टी घडतात हे पाहणे एक वेगळाच अनुभव देईल.

हर्षद अतकरीया मालिकेची संकल्पना पूर्णपणे ‘झी युवा’ची आहे. या मालिकेचे लेखन पराग कुलकर्णी यांनी केले असून, ‘दगडी चाळ’ फेम दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हे या मालिकेचे दिगदर्शक आहेत. या मालिकेचे शीर्षकगीत ‘व्हेंटिलेटर’चे संगीत दिग्दर्शक ‘रोहन रोहन’ यांनी  केले आहे व रोहन प्रधान याने हे शीर्षकगीत गायले आहे. संजय जाधव यांची ‘ड्रीमिंग २४ सेव्हन एंटरटेन्मेंट’ ही कंपनी या मालिकेची निर्मिती करत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search