Next
तेजस्वी काव्यप्रतिभेचे धनी
BOI
Monday, February 26, 2018 | 12:30 PM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम. साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. आज, २६ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन. उद्या, २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन आहे. या औचित्याने, सावरकरांच्या काव्यप्रतिभेचे वर्णन करणारा लेख प्रसिद्ध करत आहोत. यात प्रामुख्याने, सावरकर अंदमानात जन्मठेपेला जाण्यापूर्वीच्या कवितांचा आढावा घेण्यात आला आहे. 
.........
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक विचारी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठा असलेले, पुरोगामी, कर्मयोगी पुरुष. महाभारतात कृष्णाने सांगितलेली गीता सावरकर जगले. या थोर राष्ट्रपुरुषाने आपले अवघे आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले आणि तेही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. आधुनिक जगतात गीता खरोखरीच कोणी जगले असेल, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरच होत, हे त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते. 

त्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीही केली. त्यामध्ये कवितांचाही समावेश होता. त्यांच्या कवितांचा अभ्यास करायचा झाला, तर तो तीन कालखंडांत करता येईल. अंदमानपूर्व कालखंडातील कविता, अंदमानमधील कविता आणि अंदमानमधून बाहेर आल्यावर स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी केलेल्या कविता. त्यापैकी सावरकर अंदमानला जन्मठेपेसाठी जाण्याआधीच्या काळातील कवितांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत. 

इ. स. १९०३ ते १९१२ या कालावधीतील त्यांची कविता पाहिली, तर तिला कोणत्याही काव्यप्रकारात न बसवता ती स्वतंत्रपणे अवतरायला लागली असल्याचे दिसते. संपादित केलेल्या भाषाप्रभुत्वाने आपली भावना रसाळ व रसरशीत तऱ्हेने कशी मांडली जाईल, एवढेच ते पाहत होते. दुर्दम्य उत्साह, विलक्षण आत्मविश्वास, अचाट धैर्य व अतुल निर्भयता या काळातल्या कवनांतून व्यक्त झाली आहे. त्या भावनांची खळबळ त्यांनी योजलेल्या शब्दांनी मनावर इतकी उमटते, की त्यापुढे कवितेच्या बाह्यस्वरूपाकडे वाचकांचे लक्षच जात नाही. रसिक कवितेच्या अंतरंगातच गुंग होतो. या काळातील त्यांची कविता साधी, सरळ, सोपी, ओजस्वी, उदात्त आहे. 

सावरकरांच्या कवितेचे साधारणपणे चार कालखंड पडतात. १८९३ ते १९०२, १९०३ ते १९१२, १९१३ ते १९२४ आणि १९२४ ते मृत्यूपर्यंतचा काळ. १८९३ ते १९०२ या काळात त्यांनी फटके, लावण्या, पदे, पोवाडे, संस्कृत वृत्ते, आर्या लिहिल्या. १८९३ ते १९०२ या काळात त्यांच्या कवितेचा एकच गाभा होता, तो म्हणजे हिंदुस्थानचे विमोचन. १९०३ ते १९१२ची कविता पाहिली तर ‘श्री स्वतंत्रता देवी’ हीच सावरकरांची एकमेव देवता. त्यांना अन्य दैवत नाही. सावरकर हे ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र’ गाणारे पहिले मराठी कवी. संत नामदेव, संत रामदास यांनी विठोबा, शंकर यांच्या आरत्या गायल्या. सावरकरांनी ‘स्वतंत्रता देवी’चाच जयानाद पुकारला. 

स्वतंत्रते भगवती। त्वामहं यशोयुतां वंदे।।

सावरकरांना भगवती देवीच्या ठिकाणी स्वतंत्रता देवी दिसते. ती सर्व मंगलाचे मंगल आहे. सत्य, शिव आणि सौंदर्याची प्रतिमा आहे. ती शुभंकर आहे. ती अमूर्त असली, तरी ती राष्ट्राचे मूर्त चैतन्य असून, त्या राष्ट्राच्या देहामनात खेळणारे लावण्यही तीच आहे. ती नीतिसंपदांची सम्राज्ञी आहे. गालावरच्या कुसुमांमध्ये किंवा कुसुमांच्या गाली विलसणारी लाली म्हणजे मूर्तिमंत भगवती देवी स्वतंत्रता. तीच आदित्याचे तेज, तीच अर्णवाचे गांभीर्य. सावरकरांना या दृश्य जगातील सारे सौंदर्य, सारे सामर्थ्य म्हणजे स्वतंत्रता देवीची सगुण रूपेच वाटतात.  

‘श्री स्वतंत्रता देवी’ व ‘भगवान श्रीकृष्ण’ या विभूतिमत्त्वांत सावरकरांना अभेदच जाणवतो. ‘दुर्जनांचे निर्दालन व सज्जनांचे परित्राण यासाठी देवांनी अवतार धारण केला.’ श्री स्वतंत्रता देवी हीसुद्धा ‘अधम रक्तरंजिता’ आणि ‘सुजन पूजिता’ आहे. हा अभेद सावरकरांना इतक्या तीव्रतेने जाणवला, की ते सहज पुढे तिचे स्तवन करतात - 

मोक्ष मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती 
स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती ।।

या वर्णनात ‘मोक्ष आणि मुक्ती’ या स्वतंत्रतेच्या मूळ शुद्ध व अविकृत रूपाशीच जाऊन भिडतात. वेदकाळाच्या ऋषींनी देव-देवतांची स्तोत्रे गायली ती गीर्वाणवाणीत. ‘भगवती स्वतंत्रता’ हीसुद्धा अशीच परमश्रेष्ठ देवता आहे, त्यामुळे तिचा हा अर्वाचीन भक्त त्याच गीर्वाणवाणीतून तिचे स्तवन करतो आहे. 

सावरकरांचे हे ‘स्वतंत्रता गीत’ म्हणजे भावकविता आहे. स्वतंत्रता देवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी हे सूक्त गायले आहे. वेदकाळात ऋषी-मुनी, इंद्र, वरुण,अग्नी यांना सूक्ते गाऊन प्रसन्न करीत आवाहन करीत आणि त्यांच्याकडून ऐश्वर्य, आरोग्य, आयुष्य, समृद्धी यांचा कृपाप्रसाद मागत. परंतु सावरकर आपल्या या स्वातंत्र्यसूक्तातून असे काहीही मागत नाहीत. सावरकरांच्या या सूक्तातून ‘स्वतंत्रता देवी’वरील अनन्यसाधारण भक्ती, निष्ठा, देशप्रेमस्फूर्ती यांचाच प्रत्यय येतो. 

या स्वातंत्र्यसूक्ताच्या पूर्वार्धात ‘स्वतंत्रते’चे तत्त्वरूप दर्शन होते आणि उत्तरार्धात भारतमातेच्या सौंदर्याचे नयनरम्य असे चित्रदर्शन घडते. भारतमातेची मूर्ती सावरकरांच्या मनःचक्षुंपुढे सारखी तेजाळत आहे. शंकरालाही ज्याचा लोभ सुटावा, असा हिमालयाचा हिमसौंध, अप्सरांना आरसा म्हणून असणारा सुधाधवल जान्हवीस्रोत आहे. 

तिसऱ्या कालखंडातील (१९१३ ते १९२४) कवितेचे स्वरूप हुतात्म्याचे गांभीर्य, जबाबदारी, लोकोत्तरता प्रकट करणारे आहे. या कवितांतून क्वचित कल्पनाविलास दिसला, तरी बव्हंशी ती अनुभवी, गंभीर, योगी, तत्वचिंतकाची वाटते. १९२४च्या नंतरची कविता आधीच्या कालखंडातील कवितेहून वेगळ्या अंगाने जाणारी आहे. वरील चारही कालखंडांतील सावरकरांचा काव्यसंभार १० हजार ओळींहून अधिक आहे. सावरकरांची कविता सागराप्रमाणे विविध रूपे धारण करताना दिसते. काही वेळा ती तरल स्वप्नांमध्ये रमते, काही वेळा परखड वीरभावनांत सामर्थ्यशाली वाटते, तर काही वेळा शिवाप्रमाणे तांडवनृत्य करतानाही अनुभवास येते. स्थानबद्धता, तुरुंगातून सश्रम कारावास या अवस्था विनायकरावांनी स्वतः अनुभवल्या होत्या. त्यामुळे देशभक्ताच्या मनात उसळणारे उद्वेग, भावना, स्वातंत्र्याची प्रतीक्षा, आशा, आकांक्षा या भावनांचा जिवंतपणा त्यांच्या काव्यात जागोजाग आढळतो.

बाल सावरकर, युवक सावरकर, तरुण सावरकर, वयोवृद्ध सावरकर या सर्व अवस्थांमध्ये सावरकर एक झुंजार वीरपुरुष म्हणून आपल्यासमोर येतात. त्यांनी आपले आयुष्य स्वतंत्रता देवीच्या चरणी अर्पण केले होते. श्री स्वतंत्रता देवीचे स्तवन करताना ते उद्गारतात -

तुजसाठी मरण ते जनन 
तुजवीण जनन ते मरण 
तुज सकल चराचर शरण (स्वतंत्रतेचे स्तोत्र : सन १९०३)

कुठे ऐहिक जीवन सुखविलासात व्यतीत करणारा सामान्य माणूस आणि कुठे ‘श्री स्वतंत्रता देवी’च्या चरणकमलांच्या मधुगंधसेवनातच समरसून जाणारे कवी सावरकर! वयाच्या अवघ्या विशीत अमरमरणाची सुंदर अनुभूती!

प्राचीन संत आणि हा राष्ट्रीय क्रांतिकारक या दोघांच्या साहित्यातील भक्तीत फरक आहे. प्राचीन संतांच्या कविता देवभक्तांच्या होत्या आणि सावरकरांची कविता देशभक्ताची होती. प्राचीन संतांनी ‘तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक’ अशी देहनिष्ठा व्यक्त करीत देह ईश्वरप्राप्तीसाठी झिजविला, तर सावरकरांनी ‘मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता-मारिता मरेतो झुंजेन’ अशी देशनिष्ठा व्यक्त करीत आपले संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी अर्पण केले. वेणीमध्ये रोज ताजे कोहिनूर पुष्प असे हे भारतमातेचे मनोहारी सगुण स्वरूप पाहताना सावरकरांचे तरल कविमन आनंदित होते; पण तत्क्षणी स्वतंत्रता देवीने आपल्या भारतमातेला ढकलून दिले म्हणून त्याहूनही अधिक तळमळते, परवशतेच्या नभात लखलखणारी, चमचमणारी, स्वतंत्रतेची चांदणी ही सावरकरांच्या कवितेची ध्रुवतारका आहे.

देवाची आपण आरती गातो, तशी ते एका राष्ट्रपुरुषाची, श्री शिवरायाची आरती गातात. इ. स. १९०२मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी (सुंदर, तरल, नाजूक, तरुण दिवास्वप्नांत रमून जाण्याच्या वयात) कॉलेजचे विद्यार्थी असताना ‘आर्यन संघ’ नावाच्या संघामध्ये दर आठवड्याला म्हणण्यासाठी त्यांनी ‘श्री शिवाजी महाराजांची आरती’ रचली. जसे शुभादि दानवांचे श्री जगदंबेने निर्दालन केले, रावण अन् राक्षसांचा जसा श्री रघुवराने संहार केला आणि या पवित्र भारतमातेचे परित्राण केले, तसे तिचे आता म्लेंछांपासून संरक्षण करण्यासाठी श्रीशिवप्रभूने अवतरावे, अशी आरती जेव्हा सावरकर करतात, तेव्हा ते शिवाजी महाराजांना श्रेष्ठ देवाचा दर्जा देतात. शिवाजी महाराजांना ‘भगवान’ संबोधून ‘भगवद्गीता सार्थ करायला तुम्ही पुन्हा अवतार घ्या’ अशी त्यांना विनंती करतात. दुष्कृत्यांचा नाश करणारे स्वातंत्र्य संपादन, अवतारकृत्य संपवून निजधामी जाणारे शिवराय म्हणजे सावरकरांच्या दृष्टीने साक्षात ईश्वरी अवतारच। म्हणूनच ते शिवरायांना आवाहन करतात-

ऐकुनिया आर्यांचा धावा महीवरला 
करुणामय स्वर्गी श्रीशिवनृप गहिवरला 
देशास्तव शिवनेरी घेई देहांला
देशात्सव रायगडी ठेवी देहाला 
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला 

सावरकरांनी काव्यलेखनाच्या आपल्या पहिल्या कालखंडात कवितेमध्ये सामाजिक विषयही हाताळले. हिंदू स्त्रियांत अल्प वयातच वैधव्याचा घाला येत असे. त्यांच्या वैधव्य काळातील शोषणाचे, मानहानीचे, दु:खाचे, अगतिकतेचे वर्णन करून त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी उपाय योजण्यास झटावे, अशी जुन्या व नव्या मतांच्या लोकांना कवीने प्रोत्साहनपर विनंती केली आहे. ‘बालविधवा-दु:स्थितीकथन’ या कवितेत बालविधवा अगतिक होऊन पहिला प्रश्न करते – (इ. स. १९०२)

जो मम संकट वारिल ऐशाला शरण मी कुणा जाऊ?
जाऊनिया या फुटक्या नश्ट कपाळासी केवि मग दावू?

सौभाग्यनिधी जळाला आणि वैधव्याचा दुर्धर भयंकर पर्वत अल्पवयी बालेवर कोसळला आहे. ना बंधू, ना बांधव, ना मातापिता, ना आप्त सोयरे आधार द्यायला सरसावत. अशा असहाय अबलेला अंधारात मार्गच सापडत नाही. गरीब बिचारी बाला, आधीच अबला आहे आणि त्यावरती ती आता अनाथ विधवा झाली. त्यामुळे तिरस्कृत, घृणायुक्त नजरेची ती बळी ठरली आहे. त्यात भर म्हणून की काय, दीर-नणंदा शब्दशरसंधानाने घायाळ करायला लागले आहेत. अशी घायाळ, विरहव्याकुळ विधवा आपला प्रेमाधार कोणी नाही हे दु:ख व्यक्त करताना म्हणते -

प्रेमाने बोलविण्या क्षण माझ्या आज बाई ओका या
नाही कोणी उरले मायेचे दु:ख काही ओकाया

पत्नीच्या निधनानंतर ‘भार्या दु:खम् पुनर्भार्या’ असा विचार करणारे पुरुष कुठे आणि 

स्वपतिविना स्वप्नीही परपुरुषी नाही तेच जोडियले 
जिने पतीनिधनास्तव सोडियले भोग हार तोडियले 

पतीनिधनानंतर परपुरुषाकडे वर नजरेनेही न पाहणारी, काम- मोह, सकल भोग यांना दूर सारणारी स्त्री कुठे? वैधव्याच्या या नरकयातनांतून तिची मुक्तता करण्यासाठी आमची शास्त्रे वा रूढी उपायशून्य होतात. 

अशा बालविधवांचा उद्धार करण्यासाठी सावरकर पुनर्विवाह, शिक्षण, स्वयंनिर्भरता असे उपाय सुचवितात आणि वृद्ध, तरुण, नवीन-जुने यांना आवाहन करतात -

तारायला माता भगिनी लेकी स्नुषा स्वभावजया 
होईल कोण सिद्ध न, अहा! असे मानवी स्वभाव जया?
वृद्ध तरुण नवीन जुने नेमस्त जहाल लोक तरि सारे 
व्हा रे सुसज्ज विधवा-दु:स्थितिहरासि आजि परिसा रे 

स्वतंत्रतेच्या रणात मरून चिरंजीव झालेल्या पराक्रमी राष्ट्रपुरुषाचे पोवाडे गाण्यातही सावरकरांची काव्यप्रतिभा मनसोक्त रममाण होते. सावरकरांची कविता शिवरायांच्या आरतीबरोबरच त्यांच्या वीरसेवकांचा - वीर तानाजी आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा गाते. बाजी देशपांडे यांचा पोवाडा सुरू होतो तो असा - ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे. या मांगल्याची मूर्ती ‘स्वतंत्रता देवी’ तिच्या जयजयकाराने या पोवाड्यातल्या अन्य देवदेवता कोण, तर चितोडगडचे बुरुज, प्रथित विक्रम राणा प्रतापसिंह, सिंहगडावर शत्रूशी दोन हात करणारा तानाजी मालुसरे, धनाजी-संताजी, दिल्लीच्या तक्ताची छकले करणारा सदाशिवराव भाऊ! देशभूमीच्या कसायाला मी इमान दाखवणार नाही, जो भाकरी देणारा आहे त्याच्याच चाकरीत मी राहीन. भूमाता मला भाकरी, छत्र, देत असताना मी चाकरी त्या घातकांची करणार नाही, असे निक्षून सांगणारा बाजीप्रभू पुढे म्हणतो -

मद्देशचि माझा राजा 
तो प्राण देव तो माझा 
मी शरण शिवा सांगा जा (इ. स. १९०६) 

सावरकर या पोवाड्याची सांगता करताना बाजीच्या वीरमरणाच्या अंतसमयाचे वर्णन करताना बाजीला उचलण्यास आलेल्या यमदूताला बजावतात -

खबरदार यमदूता! पहुडे श्री बाजीप्रभू हा 
स्पर्शू नको तद्विद्युत्तेजःपुंज दिव्य देहा।।

सूर्य, इंद्रादि देवता, गंधर्व, देवदूत खाली उतरतात; पण श्री बाजीला आपल्या रथात घालून स्वर्गात घेऊन जाते ती स्वतंत्रता देवी भगवतीच! सावरकररचित बाजीचा हा पोवाडा आपल्या मन:चक्षूंसमोर हौतात्म्याची गाथाच उलगडतो. या गाथेतील समरकुंड, जोहार, स्थंडिल, बलिदान, रणकुंड, शिळा ही बलस्थाने आहेत. 

विनायकराव बॅरिस्टर होण्यासाठी १९०६ साली विलायतेस गेले. लांबच्या समुद्रप्रवासात कित्येक दिवस समुद्र व आकाश याशिवाय कशाचेच दर्शन नव्हते. घरच्या माणसांपासून दूर गेल्यामुळे मन उदास, कासावीस झालेले. तेव्हा एक दिवस निरभ्र रात्री ते बोटीच्या डेकवर फिरत होते. त्या वेळी त्यांनी ‘तारकांस पाहून’ (इ. स. १९०६) ही कविता लिहिली. ही कविता म्हणजे अथांग सागर, अनंत तर्क यांच्याशी साधलेला संवाद आहे. नभीच्या तारकांना सावरकर विचारतात - 

हे ताऱ्यांनो जाणतसां का कुठुंनी तुम्ही आला? 
कुठे चालला कवण हेतू ह्या असे प्रवासाला?
आम्ही समुद्रगामि होतोय ते विशिष्ट हेतू ठेवून मग तुम्ही...
कवण हेतू तो ज्यास्तव तुम्ही गगनगामि व्हावे 
सूर्यापासुनी इतुके दूरचि भूने विचरावे 

असे विचारून आपल्या मनातील संदेह व्यक्त करतात.

ब्रायटन येथे असताना, भारतमातेवर प्राणाहून अधिक प्रेम करणाऱ्या सावरकरांना ‘अभिनव भारत’ या संस्थेवर इंग्रज सरकारची वक्रदृष्टी झाल्यामुळे आपणास भारतात परतता येणार नाही याची जेव्हा जाणीव झाली, तेव्हा त्यांचा प्राण तळमळला. ते विरह व्याकुळतेने ‘सागरास’ उद्गगारतात - 

नभिनक्षत्रे बहुत एक परी प्यारा 
मज भरतभूमीचा तारा 
प्रासाद इथे भव्य परी मज भारी 
आईची झोपडी प्यारी 
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा।

हृदय हेलावून सोडणारे हे सागरसूक्त म्हणजे असीम देशभक्तीचे अनन्यसाधारण गीत आहे, असा अभिप्राय महाराष्ट्रातील दिग्गज कवींनी दिला आहे. प्रथम श्रेणीचे नाटककार, पत्रकार आचार्य अत्रे यांनी एका साहित्य संमेलनात भाषण करताना या कवितेबद्दल उद्गार काढले होते, ‘या करुण गीतातील एकेक उदात्त कल्पना भव्य जीवनाचा आणि दिव्य काव्याचा साक्षात्कार घडविणारी आहे.’

ब्रायटनमधील तो सद्गदित करणारा प्रसंग वर्णन करताना सावरकरांबरोबर सागरकिनारी त्या काव्यजन्माच्या अद्भुत क्षणी असणारे निरंजन पाल यांनी या कवितेनंतर २५-३० वर्षांनी म्हटले होते, ‘आधुनिक भारतातील बहुतेक सर्व महान भक्तांना नि श्रेष्ठ नेत्यांना भेटण्याचे नि त्यांचा परिचय करून घेण्याचे भाग्य मला लाभले आहे. परंतु विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्या मातृभूमीवर जितके निस्सीम प्रेम होते, तितके स्वदेशप्रेम असलेला दुसरा कोणीही देशभक्त मी अद्यापि पाहिलेला नाही.’ (Pal, Niranjan, The Maharatta, 27 May 1938) 

सावरकरांचा पहिला मुलगा चार वर्षांचा होऊन लहानपणीच वारला. ती वार्ता युरोपमध्ये कळली, तेव्हा त्याच्या स्मृत्यर्थ ‘प्रभाकरास’ ही कविता त्यांनी (इ. स. १९०९) लिहिली. या कवितेत आपले पुत्रवियोगाचे अतीव दु:ख व्यक्त करताना ते म्हणतात - 

परी जै वारे क्रुद्ध वर्षती मेघ शिला धारा 
सुरक्षित न हे गमे गृह सख्या तुझिया आधारा 

क्रांतीच्या झंझावातात हे माझे हृदय, हा देह सापडलेला म्हणून तुला राहण्यास सुरक्षित नाही. म्हणून तुझी स्मृती चिरकाल सुरक्षित राहावी यासाठी गोविंदसिंगांच्या पराक्रमाचा गौरव ज्या शीखेतिहासात आहे, त्या इतिहासाचा मराठीत रचलेला जो ग्रंथ मी लिहिला, तो तुझ्या नावे आपण करतो. म्हणजे तो ग्रंथ जोपर्यंत राहील तोपर्यंत तुझी स्मृती राहील. 

परंतु सावरकररचित शीखेतिहास इंग्रजांनी जप्त केला. क्रांतीच्या आगीत हा ग्रंथ प्रभाकराच्या स्मृतीसाठी सुरक्षित वाटला, ते स्थानही या क्रांतीच्या आगीत दग्ध झाले. या आश्चर्याचा कवितेत उल्लेख आहे. (अंदमानमध्ये इ. स. १९१२)

जिथे न शिकली शिघू भासले अग्नि मेघ वारे
तिथे ही शकले शिवू क्रांतीचे अग्नि मेघ वारे

आपल्या मुलाचा चेहराही आपल्याला आठवत नाही, याचे कारण सांगताना सावरकर लिहितात - 

नवप्रसव तव जननि मजला दावित असताही 
गुरुजन - मर्यादेते म्यां बहु पाहियले नाही. 

१९०९ साली बाबाराव सावरकरांना जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पुढे धाकटा बंधू डॉ. बाळाराव सावरकर यांनाही अटक झाली. ही धक्कादायक बातमी सावरकरांना समजली, तेव्हा लंडनहून त्यांनी आपल्या वहिनीच्या अतिवार दु:खात त्यांचे सांत्वन करण्यासाठी एक काव्यमय पत्र लिहिले. हे सांत्वन त्या कवितेतील भावना वहिनीला कळावी यासाठी सावरकरांनी ‘ओवी’ या छंदाची निवड केली. ते काव्यमय पत्रसांत्वन (इ. स. १९०९) महाराष्ट्रातल्या तमाम महिला वर्गाने डोक्यावर घेतले. सावरकरांनी त्या पत्रात आपल्या वहिनीला लिहिले होते -

अनेक फुले फुलती। फुलोनिया सुकोनी जाती।
कोणी त्यांची महती गणती। ठेवली असे।।
परी जे गजेंद्रशुंडेने उपटीले। श्री हरीसाठी मेळे।।
कमल - फूल ते अमर ठेले । मोक्षदायी पावन।।
त्या पुण्यगजेंद्रासमयी । मुमुक्षु स्थिती भारतीची ।।
करुणारवे ती याची । इंदीवरशामा श्रीरामा।।

सावरकरांच्या दृष्टीसमोर ‘गजेंद्रमोक्षा’चा प्रसंग उभा राहतो. नक्राच्या अक्राळविक्राळ दाढांतून सुटण्याची धडपड करणारा गजेंद्र अखेर श्रीहरीचा धावा करतो. आपल्या शुंडेने कमल उपटून तो ते श्रीहरिचरणी वाहतो. हे कमळफूल मेले ते श्रीहरीसाठी. परंतु हे एकच कमळफूल धन्य होऊन अमर झाले. त्या एका कमळाचे जीवन कृतार्थ झाले. कारण इतर फुले फुलतात, सुकून जातात, त्यांची गणती, महती कोणीही ठेवीत नाही. परसत्तारूपी नक्राच्या कराळ दाढांत अडकलेली भारतमाता गजेंद्राप्रमाणेच परमेश्वराचा करुण धावा करीत आहे. या कवितेत सावरकर आपल्या मातेला (भारत) म्हणतात - 

स्वोधानी तिने यावे। आपुल्या फुलास भुलावे।
खुडोनीया अर्पण करावे। श्रीरामचरणां।।

अशीच सर्वच फुले खुडावी आणि ती श्रीरामचरणी अर्पण करावी. कारण 

अमर होय ती वंशळता। निर्वंश जिचा देशाकरिता।
दिगंती पसरे सुगंधिता। लोकहित परिमळाची।।

वरील ओवीमधील कारुण्य, जीवन सार्थक्याची ओजस्वी कल्पना हृदयाचा ठाव घेणारी आहे.. या ओवीमय काव्यातील भावना उसनी वा कृत्रिम नाही, तर ती प्रत्यक्ष अनुभूतीतून निर्माण झालेली असल्यामुळे जिवंत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्राचे लेखन करणारे धनंजय कीर म्हणतात - ‘तोच खरा थोर पुरुष, की ज्याचे अंतःकरण धेयाकाशात एवढी उत्तुंग भरारी घेऊ शकते, ज्याचे मनोधैर्य कोणत्याही परिस्थितीत अविचल राहू शकते आणि ज्याचा जीवात्मा संतप्त ज्वाळांनी परिपूर्ण वेढलेला असला, तरीदेखील विश्वात्म्याशी किंवा परमात्म्याशी तादात्म्य पावू शकतो.’

आपल्या या नश्वर देहाची सार्थकता मातृभूमीसाठी तो देह समर्पित करण्यातच आहे, हे त्यांचे सर्वश्रेष्ठ तत्त्व होते. निराधार आणि विकल झालेल्या आपल्या दु:खी वहिनीला ते पुढे लिहितात -

सुकुमार आमच्या अनंत फुलां।
गुंफोनिया करा हो सुमन माला।
नवरात्रीच्या नवकाला।
मातृभूमी वत्सले।
एकदा नवरात्र संपली।
नवमाला पूर्ण झाली।
कुलदेवी प्रकटेल काली।
विजयालक्ष्मी पावन।।

या ओवीबद्ध पत्रावर सावरकरांची पत्नी आणि वहिनी येसूबाई या दोघींनीही तितकीच धीरोदात्त, बाणेदार प्रतिक्रिया व्यक्त केली. या दोघीही जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी उभ्या होत्या. तरीही त्यांनी सावरकरांना कळविले, ‘तुम्ही ब्रिटिश राजवटीविरुद्ध उभारलेला पवित्र लढा असाच चालू ठेवा!’ (संदर्भ - Kincaid, C.A. Forty Four Years A Pub।ic Servant. Page 118)

बाबारावांनंतर बरोबर एक वर्षाने १९१०मध्ये विनायकराव विलायतेत पकडले गेले, तेव्हा या जन्मात जिची भेट होणे जवळजवळ दुरापास्त झाले होते. त्या आपल्या वहिनीला अटकेचे वृत्त कथन करण्याचे कटू कर्तव्य करतानाच त्यातील उदात्त, दिव्य मर्म व्यक्त करण्यासाठी विनायकरावांनी लंडनमधील ब्रिक्स्टन जेलमधून आपल्या या जन्मातला बहुधा शेवटचा होऊ पाहणारा हा निरोप ‘माझे मृत्युपत्र’ लिहून धाडला होता.

सावरकरांच्या मनावर प्रचंड दडपण आले होते, हे या पत्रातून स्पष्ट जाणवते. लहान मुलगा प्रभाकर एक वर्षापूर्वी जग सोडून आला होता. बाबारावांना काळ्या पाण्याची, जन्मठेपेची शिक्षा, कनिष्ठ बंधू नारायणराव हे नाशिक कटाच्या प्रकरणात पकडले गेले होते. सावरकर बिक्स्टन तुरुंगात खितपत पडले होते. असा हा पराधीन परस्पर वियोग हा त्या कुटुंबाचा दु:खविषय झाला होता. आपल्या कुटुंबाची ही वाताहत कोणत्या दिव्य नि भव्य ध्येयाप्रीत्यर्थ झाली आहे, याचे त्या काव्यमय मृत्युपत्रात वर्णन करून सावरकरांनी येसूबाईंना स्मरण करून दिले आहे - 

झाल्या दता प्रियकरांसह आणभाका 
त्या सर्व देवी वहिनी स्मरती तुम्हां का?
‘बाजीप्रभू ठरूं’ वदे युवसंघ सर्व 
‘आम्ही चितोरयुवती’ युवती वर्ग 
(माझे मृत्युपत्र - इ. स. १९१० )

मनातल्या भावना आणि जीवनातील तत्त्वनिष्ठा यांमुळे माणूस जिवंत राहतो. आपल्या देशकार्याने जर हे तत्त्व भाव आणि त्याबरोबर मनाला धारण करणारे शरीर अमर राहणार असेल, तर अशा मरणाला थोर पुरुष सिद्ध होतात आणि कवितेच्या पुढील ओळी झरू लागतात -

त्वत्स्थंडिली धाकालीले प्रिय मित्रसंघा 
केले स्वये दहन यौवन-देह-भोगां 
त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवां 
त्वत्सेवनींच गमली रघुवीर-सेवा 
त्वत्स्थंडिली ढकलली गृहवित्तमत्ता 
दावानलांत वहनी नवपुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू 
केला हवी परमकारुण पुण्यसिंधु  
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला 
त्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला
हे काय, बंधू असतो जरि सात आम्ही 
त्वत्स्थंडिलींच असते दिधले बळी मी         
संतान या भरतभूमीस तीस कोटी 
जे मातृभक्तिरत सज्जन धन्य होती     
हे आपुले कुळही त्यामधि ईश्वरांश     
निर्वंश होउनि ठरेल अखंड वंश 
   
सावरकरांनी बुद्धीपूर्वक हे सतीचे दिव्य, दाहक वाण हाती घेतले होते. या मृत्युपत्राच्या अखेरीस वीरसदृश निर्धाराने आणि अतुलनीय धधैर्याने म्हटले आहे - 

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने 
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग माने 
जे दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचे 
बुध्याचिं वाण धरले करि हे सतीचे 

सावरकरांनी मार्सेलिसला बोटीवरून निसटण्याचा पर्यंत केला, त्या उडीतील अपयश हे अखेर अत्युज्ज्वलच ठरले. उदात्त अपयश हेदेखील परिपूर्ण यशाइतकेच भविष्यकाळात जगाला प्रेरक ठरू शकते. आपण बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न केला म्हटल्यावर त्याचा सूड म्हणून इंग्रज आपला अमानुष छळ करणार या विचाराने अशा छळास पुरून उरेल, अशा धैर्याचा पुरवठा करण्यासाठी आत्मबल, मनोधैर्य वाढविण्यासाठी, इंग्रजांना पुरून उरण्यासाठी कवचमंत्र म्हणून सावरकरांनी ‘आत्मबल’ (इ. स. १९१०) ही कविता लिहिली. त्यात प्रारंभीच ते म्हणतात - 

अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला।। 

ते इंग्रजांना ठणकावून सांगतात, मी मृत्यूला घाबरत नाही. मृत्यूच भ्याड आहे. तोच मला पाहून पळत सुटतो.

अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो 
भिऊनि मला भ्याड मृत्यू पळत सुटतो 
खुळऽ रिपुऽ। त्या स्वयें 
मृत्यूच्याचि भीतीने भिवतुं मजसि थे 

वरील काव्यपंक्ती वाचल्यावर श्रीमद्भगवतगीतेतील श्लोक आठवतो - ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक:।’ सावरकरांनी या कवितेचा शेवटही तितक्याच निर्भीडपणे केला आहे - 

आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते 
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते 
हलाऽ हलाऽ। त्रिनेत्र तो 
मी तुम्हांसि तैसाची गिळुनी जिरवितो ।

विनायकरावांच्या या धीरोदात्त वक्तव्यामुळे असे म्हणावेसे वाटते, की खरा श्रेष्ठ तोच आहे, जो अंगीकृत ध्येयापासून कधी ढळत नाही, अंतर्बाह्य मोहाला कधी बळी अडत नाही. आपत्तीमध्ये डळमळून जात नाही आणि परिस्थितीने कितीही उग्र रूप धारण केले तरी घाबरत नाही.

- पूजा संजय कात्रे
ई-मेल : poojaskatre@gmail.com

(लेखिका कुवारबाव (रत्नागिरी) येथील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत असून, मराठी विषयाचे अध्यापन करतात.) 

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.) 


सावरकरांबद्दलच्या वेबसाइट्स :
http://www.savarkarsmarak.com/ आणि http://www.savarkar.org/ या दोन वेबसाइट्सवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती असून, त्यांची पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ अशा सर्व साहित्याचे एकत्रीकरणही करण्यात आले आहे. सावकरांबद्दल यू-ट्यूबवर उपलब्ध असलेले व्हिडिओज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Paresh Kadam About
फारच सुंदर लेख आणि कविता. उत्तम सादरीकरणा बद्दल अभिनंदन आणि आम्हाला वाचना साठी उपलब्ध करण्या बद्दल आभार .
1
0
shantanu katre About
uttam !!
1
0
Mahesh Gokhale About
Review taken by author is excellent
1
1
Dr.Anil padhye. KHED Rtn. About
Thinking good
1
1
Veena kulkarni About
Excellent post & nice poems
3
0
Veena Kulkarni About
भाषा सौन्दर्याने नटलेले लेख वाचकाला त्या काळात घेऊन जातात लेख खूप छान लिहिला आहे माझ्या कडून शुभेच्छा !
3
0
Meghana Moghe About
खूपच सुंदर लेख. खूप सुंदर कविता.
3
1
Sunil jadhav About
Very nice post mam. Sundar kavita.
6
0

Select Language
Share Link
 
Search