निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या शिमोगा परिसराला कर्नाटकचे काश्मीर म्हणता येईल. ‘करू या देशाटन’ सदरात आज तिथेच सैर करू या.
.............
शिमोगा म्हणजे शिवाचे मुख (शिवमोगा) असा अर्थ आहे. शिव म्हणजे निसर्गाचे स्वरूप आणि या भागात ते विविध स्वरूपात बघण्यास मिळते. घनदाट जंगले, त्यात वावरणारे हत्ती, हत्तींची शाळा, सिंहाप्रमाणे आयाळ असलेली माकडे, वाघ, शेकरू (उडत्या खारी), अस्वले, हरणे असे नानाविध प्राणी, तसेच मुक्त विहार करणारे पक्षी, फेसाळणारे पाणी घेऊन पडणारे धबधबे, आकाशाला भिडणारी गिरिशिखरे, चहा-कॉफीचे मळे, होयसळकालीन सुंदर मंदिरे, भव्य चर्च, थंड हवेची गिरिस्थाने (हिल स्टेशन्स), पदभ्रमंती करणाऱ्यासाठी सुंदर निसर्गवाटा, अनेक शिलालेख इत्यादी इत्यादी पर्यटनासाठी आवश्यक ते सर्व काही इथे आहे. ‘कर्नाटक की रोटी की टोकरी’, ‘कर्नाटक की चावल का कटोरा’ म्हणूनही हा भाग ओळखला जातो. आता येथील काही वैशिष्ट्यांची माहिती घेऊ या.
जोग फॉल्स : शिमोगा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ९५ किलोमीटर अंतरावर शरावती नदीवर हा प्रसिद्ध धबधबा आहे. शरावती नदीचा उगम तीर्थहळ्ळी तालुक्यात अंबुतीर्थ नावाच्या एका ठिकाणाहून झाला आहे. प्राचीन आख्यायिकेनुसार, सीतेची तहान भागविण्याकरिता पाणी मिळविण्यासाठी श्रीरामांनी या ठिकाणी आपल्या धनुष्यातून या ठिकाणी बाण (शर) मारला आणि तेथून पाणी उसळले. त्यावरून शरावती हे नाव रूढ झाले. ही पश्चिमवाहिनी नदी १२८ किलोमीटर प्रवाहित होऊन होन्नावर येथे अरबी समुद्राला मिळते. जिल्ह्याच्या वायव्य सरहद्दीवर ही नदी पश्चिमेला वळते. याच ठिकाणी जोग गावाजवळ प्रसिद्ध जोग फॉल (गिरसप्पा धबधबा) आहे. येथे नदीपात्र सुमारे २२७ मीटर रुंद असून, चार स्रोतांनी धबधब्याचे पाणी खाली कोसळते. राजा, रोअरर, लेडी किंवा राणी व रॉकेट या नावांनी हे प्रपात प्रसिद्ध आहेत.

राजा हा मुख्य धबधबा ८३० फूट उंचीवरून एखाद्या स्तंभासारखा कोसळतो व पाणी तेथे असलेल्या १३२ फूट खोलीच्या नैसर्गिक कुंडात जाते. दुसरा ‘रोअरर’ हा धबधबा बाजूने येऊन राजा धबधब्यात मिसळून जातो. या ठिकाणी होणारा आवाज मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे. शरावती नदीखोरे प्रकल्पातील धरणे, पाण्याचे बोगदे, वीजनिर्मिती केंद्रे ही पर्यटकांची आकर्षणस्थळे आहेत. होन्ने मराडू हे लिंगनमक्की धरणाने बनविलेल्या जलाशयावरील एक बेट आहे. हे ठिकाण जलक्रीडेसाठी प्रसिद्ध आहे. स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्कूटर वगैरे खेळांची सुविधा तेथे आहे. तसेच तेथे पक्षी निरीक्षणही करता येते. सिंहाप्रमाणे आयाळ असलेली माकडे येथे बघण्यास मिळतात.
अचकन्या धबधबा : तीर्थहळ्ळीपासून १० किलोमीटर अंतरावर होसानगरजवळील अरलसुरुलीकडे जाताना हा धधबधबा लक्ष वेधून घेतो.
दब्बे फॉल्स : सागरपासून २० किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
हिदलामने फॉल्स : हा धबधबा नित्तूरजवळ असून, तो पाहण्यासाठी दाट जंगलातून ट्रेकिंग करत जावे लागते.
वनाके एबे : हे हिरवीगार झाडी आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले ठिकाण. आगुंबेपासून ते चार किलोमीटरवर आहे.
शिमोगा : हे जिल्हा मुख्यालय असून, येथे पोलादावर आधारित उद्योग आहेत. येथे आयटी पार्क उभारण्यात येत आहे. तसेच विमानतळही प्रस्तावित आहे. सेंट थॉमस चर्च शिमोगा शहराच्या मध्यभागी असून, हे भारतातील दुसरे सर्वांत मोठे चर्च आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ १८ हजार चौरस फूट आहे. त्याच्या प्रार्थना कक्षात एका वेळी पाच हजार लोक राहू शकतात.
त्यवरेकोप्पा : शिमोगापासून १० किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण बेंगळुरूमधील बाणेरगट्टासारखे जंगल सफारी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे वाघ, सिंह, बिबटे, मोर वगैरे प्राणी-पक्षी पाहण्यास मिळतात.
आगुंबे : हे ठिकाण ‘कर्नाटकची चेरापुंजी’ म्हणून ओळखले जाते. नेत्रदीपक सूर्यास्त हे येथील वैशिष्ट्य. समुद्रसपाटीपासून २७२५ फूट उंचीवर असलेले हे ठिकाण दाट, समृद्ध हिरव्या जंगलाने वेढलेले आहे. पावसावर आणि जंगलावर संशोधन करणरे केंद्र नुकतेच येथे स्थापन करण्यात आले आहे. येथे औषधी वनस्पतींची लागवड आणि त्यावरील संशोधनही होते. जवळच सोमेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. त्या जंगलातही आयाळ असलेली माकडे आहेत. आसपास असलेले अनेक छोटे-मोठे धबधबे या भागाचे सौंदर्य वाढवतात. हे ठिकाण उडुपी रस्त्यावर तीर्थहळ्ळीपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
बीआरपी धरण : भद्रा नदीवरील बीआरपी जलाशय शिमोगा शहरापासून २८ किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण १९४ फूट उंचीचे आहे. हे धरण डोंगराळ भागात असल्याने अनेक टेकड्यांची बेटे तयार झाली आहेत. आपण या बेटांभोवती नौकानयनाचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. भद्रा वन्यजीव अभयारण्य शिमोगा व चिकमंगळूर जिल्ह्यात विस्तारले आहे.
बाळेगावी : तिसऱ्या व चौथ्या शतकातील सातवाहन व कदंब राजवटीपासून या गावाचा उल्लेख आढळतो. ११व्या ते १२व्या शतकातील पश्चिमी चालुक्य राजवटीत बाळेगावी हे एक महत्त्वाचे शहर होते. येथील अत्यंत देखणे असे केदारेश्वर मंदिर इ. स. १२००मध्ये बांधले गेले असावे.
बंदालिके : हे ठिकाण बांधवपूर म्हणूनही ओळखले जायचे. हे एक जैन तीर्थक्षेत्र असून, ऐतिहासिक ठिकाण आहे. इ. स. ३००पासून याचे उल्लेख सापडतात. पूर्वी हे ठिकाण कदंब राजांच्या आधिपत्याखाली होते. त्यानंतर राष्ट्रकूट, चालुक्य, होयसळ, विजयनगर अशा राजवटींनी येथे राज्य केले. दहाव्या शतकापासून या शहराला महत्त्व प्राप्त झाले. येथील सर्वांत जुना शिलालेख इ. स. ९२९मधील आहे. येथे सुमारे ३१ शिलालेख आहेत. ११८५मधील शिलालेखावरून या गावाची पुनर्ररचना केल्याचे दिसते. १२०३मधील शिलालेखावरून येथे होयसळ राजवट आल्याचे दिसून येते. येथील मंदिरेही बघण्यासारखी आहेत.
भद्रावती : हे औद्योगिक शहर असून, तुंग नदीच्या काठावरील इ. स. १३०० मध्ये होयसळ राजांनी बांधलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथे आयर्न स्टील फॅक्टरी, पेपर मिल, साखर कारखानाही आहे.
चंद्रगुट्टी : हे ठिकाण पूर्वी चंद्रगुप्तपुरा या नावाने ओळखले जायचे. हे सह्याद्रीच्या रांगेतील खडकाळ उंच डोंगरावर वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. परशुरामाची माता देवी रेणुकाम्बा हिच्या मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे. जवळच किल्ला असून, तो कदंब राजवटीपासून आहे. शिलालेखावरील माहितीनुसार, १३७७मध्ये विजयनगरचा सरदार बचन्ना याच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता. हा किल्ला ट्रेकर्ससाठी खूप छान आहे; मात्र तो भग्नावस्थेत आहे.
साकरेबायलू (एलिफंट कॅम्प) : गजनूरजवळ भारत सरकारद्वारे चालविले जाणारे एक हत्ती प्रशिक्षण केंद्र आहे. येथे पाण्यात खेळत असणारे हत्ती पाहणे हा मुलांसाठी आश्चर्यकारक अनुभव असतो. जंगलात लाकूड वाहतुकीसाठी हत्तीचा उपयोग केला जातो. त्यासाठी हत्ती प्रशिक्षित केले जातात. येथे फक्त सकाळी आठ ते साडेअकरा या वेळेतच प्रवेश मिळतो.
गुडवी : हे पक्षी अभयारण्य ७३.६८ हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. येथे एक नैसर्गिक तळेही आहे. १९९३च्या सर्वेक्षणानुसार असे आढळले आहे, की या ठिकाणी १९१ पक्षी आढळतात. व्हाइट पेबिस, स्टोन बिले, एग्रेट, कॉर्मोरंट, सर्क, हेरॉन अशा अनेक प्रकारचे पक्षी येथे पाहता येतात. पक्षी पाहण्यासाठी निरीक्षण मनोरेही आहेत. हे ठिकाण सोराबापासून १६ किलोमीटरवर आहे.
हेग्गडू : हे एक प्रसिद्ध सांस्कृतिक कलाकेंद्र आहे. येथे नाट्य, चित्रपट आणि प्रकाशन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणारी एक सांस्कृतिक संस्था आहे. ‘निनाशम’ म्हणजे नीळकंठेश्वर नाट्य सेवा संघ या नावाने ती प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध नाटककार के. व्ही. सुब्बाना यांनी ही संस्था स्थापन केली. येथे रंगकर्मी प्रशिक्षण शाळा चालविली जाते.
हुमचा : हे जैन तीर्थक्षेत्र असून, इ. स. ७००मध्ये जिनादट्टाचार्य यांनी येथे मठ व मंदिराची स्थापना केली. हे ठिकाण शिमोगापासून ५८ किलोमीटरवर आहे.
इक्केरी : येथे केळद नायकांची राजधानी होती. गावाला तटबंदी होती.

अग्रोहेश्वर मंदिर हे येथील वैशिष्ट्य. हे मंदिर चालुक्य व होयसळ शैलीतील असून, अनेक शिल्पकृती येथे आहेत. याचे बांधकाम ग्रॅनाइटमध्ये केले आहे. हे स्थळ शिमोगापासून ७६ किलोमीटर अंतरावर आहे.
कुबेतुर : येथे प्राचीन मंदिरे असून, तेथील वास्तू भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेत. यातील बहुतांश मंदिरे पडक्या अवस्थेत आहेत. शिमोगा जिल्ह्यातील सोरोबापासून तीस किलोमीटर अंतरावरील हे लोकप्रिय ऐतिहासिक स्थान आहे.
कुडाली : तुंगा आणि भद्रा नद्यांच्या संगमावर हे तीर्थक्षेत्र आहे. जगद्गुरू नरसिंह भारती स्वामीगिरी यांनी येथे मठ व मंदिर उभारले. जवळच रामेश्वर व नरसिंह यांची होयसळ पद्धतीची मंदिरे आहेत.
कन्नूर किल्ला : कन्नूर किल्ला पदभ्रमंती अर्थात ट्रेकिंगसाठी अतिशय उत्तम.

सागर तालुक्यातील गोवर्धनगिरीतील घनदाट जंगलांच्या मध्यभागी हा किल्ला आहे. दब्बे फॉलपासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी नऊ किलोमीटर चालावे लागते.
कसे जाल शिमोगा येथे : शिमोगा रेल्वेने बिरूर जंक्शनपासून मिरज बेंगळुरू रेल्वेमार्गाला जोडलेले आहे. म्हैसूर-हुबळी-चिकमंगळूर-कारवार येथून मोटारीने येता येते. सध्याचा जवळचा विमानतळ मंगळूर. शिमोगा येथेही विमानतळ प्रस्तावित आहे. जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मे. पावसाळ्यातही जलप्रपात बघण्यासाठी गर्दी होतच असते. राहण्याची उत्तम सोय शिमोगा येथे आहे.
- माधव विद्वांसई-मेल : vidwansmadhav91@gmail.com
(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.) ( शिमोगाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)