Next
स्वातंत्र्यदिनी ५२२ जणांचा सलग २५ तास गायनाचा विक्रम
सूर्यदत्ताच्या उपक्रमाची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
BOI
Friday, August 16, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

गायन करताना विद्यार्थी, शिक्षक आदी

पुणे : स्वातंत्र्यदिनी तब्बल ५२२ व्यक्तींनी सलग २५ तासांपेक्षा अधिक वेळ देशभक्तीपर गाणी, कवितांचे सादरीकरण करून देशाला मानवंदना देण्याचा अनोखा विक्रम पुण्यात घडला. ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’च्या वतीने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये  सर्वाधिक ५२२ जणांचा सहभाग आणि सलग २५ तास गायन असे दोन विक्रम नोंदविण्यात आले. 

विश्वविक्रमी उपक्रमाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी जैन धर्मगुरू आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, योगेश गोगावले, सचिन इटकर, डॉ. संतोष चोरडिया, मनीष बिष्णोई, सुषमा चोरडिया आदी

एकाच वेळी ५२२ व्यक्तींनी उपक्रमात सहभाग घेत सलग २५ तासांपेक्षा अधिक वेळ देशभक्तीपर गायन करण्याचा ही पहिलीच वेळ होती. दोन दिवस निरीक्षण करण्यासाठी आलेल्या ‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे प्रतिनिधी मनीष विष्णोई यांनी त्याची अधिकृत घोषणा करून ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना प्रमाणपत्र प्रदान केले. उपक्रमात सहभागी प्रत्येकाला विशेष प्रमाणपत्र मिळणार आहे.

संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या आगळयावेगळ्या उपक्रमाची सांगता जैन धर्मगुरू आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्ट्रॅटेजिक फोरसाईटचे वरिष्ठ सल्लागार सचिन इटकर, संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या उपस्थितीत झाली. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा करताच विद्यार्थी आणि शिक्षकांनी जल्लोष केला. तत्पूर्वी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले.    


आचार्य डॉ. लोकेश मुनीजी म्हणाले, ‘जल, वायू यांच्या प्रदूषणापेक्षा वैचारिक प्रदूषण घातक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले विचार, मूल्य, तत्त्व शुद्ध ठेवले पाहिजे, तरच आपल्या देशाची प्रगती होणार आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या मनात देशभक्तीची, बंधुभावाची रुजवण होईल. सूर्यदत्ता परिवाराने स्वातंत्र्यदिनी देशाला दिलेली ही अनोखी मानवंदना आहे.’

मनीष विष्णोई म्हणाले, ‘अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. देशभक्तीपर गाणी, कवितांचे सादरीकरण यातून दोन विक्रम प्रस्थापित झाले आहेत. याआधी गायनाचा विक्रम ३२७ लोकांचा होता. ‘सूर्यदत्ता’ने मोठ्या फरकाने हा विक्रम मोडला आहे. सलग २५ तास ५७ मिनिटे देशभक्तीपर गाणी, कवितांचे सादरीकरण करण्याचाही अनोखा विक्रम त्यांनी केला आहे.’

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशाला अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याची संकल्पना मांडली. विद्यार्थ्यांसह सर्वानीच ती उचलून धरत हा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविला. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. त्याचबरोबर दोन विश्वविक्रम प्रस्थापित झाल्याचा विशेष आनंद आहे. यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे योगदान मोलाचे असून, मी त्यांचे अभिनंदन करतो.’ 

सचिन इटकर म्हणाले, ‘आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. त्यासाठी आपल्यालाही हातभार लावायचा आहे. जवानांनी, क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्याप्रमाणे आपल्याला आता देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यायचे आहे आणि आपल्या देशाला महासत्ता बनवायचे  आहे.’

योगेश गोगावले म्हणाले, ‘संतांची भूमी असलेला आपला देश आहे. त्यांच्या विचारांमुळे आपल्यातील एकता टिकवून ठेवण्याचे काम होत आहे. केवळ स्वातंत्र्यदिनी देशभक्तीची भावना नसावी, तर वर्षभर आपण राष्ट्रप्रेम, बंधुभाव जोपासला पाहिजे.’

सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले, तर सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search