Next
विश्वगामिनी सरिता!
BOI
Thursday, March 08, 2018 | 10:30 AM
15 0 0
Share this article:


कधी ‘कॅसाब्लांका’मुळे गाजलेल्या मोरोक्को आणि सहारासकट नामिबिया-साउथ आफ्रिकेला भेट, तर कधी बाल्कनसकट संपूर्ण युरोप, कधी हक्काची संपूर्ण अमेरिका आणि कधी गोबीवाला मंगोलिया, तर कधी गलापगस बेटांवर, कधी न्यूझीलंडमुक्कामी आणि कधी तर थेट रक्त गोठवणाऱ्या बर्फाळ थंडीच्या अंटार्क्टिकावर... अशी पृथ्वीच्या पाठीवरची सर्व खंडांतली मिळून १४०हून अधिक ठिकाणं पालथी घालणाऱ्या ‘ग्लोब ट्रॉटर’ म्हणजे सरिता नेने. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी घेतलेली नेने यांची विशेष मुलाखत...
...............
- तुमची थोडी पार्श्वभूमी सांगा.
- मी पूर्वाश्रमीची साठे. मुंबईत खारला घर होतं आमचं. मी बांद्र्याच्या ड्युरुएलो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकले. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये ‘एन्श्यंट हिस्टरी अँड कल्चर’ घेऊन एमए केलं. त्यात चक्क युनिव्हर्सिटीत पहिली आले. ‘बीए’च्या शेवटच्या वर्षाला असताना (त्या मानाने लहान वयातच) लग्न झालं होतं. त्यानंतर मुलं लहान होती. त्यामुळे भारत सरकारच्या पर्यटन विभागात, पण पार्ट टाइम नोकरी केली. भारतात येणाऱ्या युरोपीय, विशेषतः जर्मन आणि फ्रेंच पर्यटकांना भारतीय संस्कृतीची, विविध कलांची ओळख करून देण्याचं काम माझ्याकडे होतं.

- अमेरिकेत कसं जाणं झालं? आणि तुम्ही जगप्रवासाकडे कशा वळलात?
- माझ्या यजमानांनी अमेरिकेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं आणि त्यांना पुढे तिथेच नोकरीची संधी चालून आल्यामुळे आम्ही सर्वांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. आता आम्ही कॅलिफोर्नियामधल्या ओकलंडला स्थायिक झालो आहोत. प्रवासाची आणि फिरण्याची आवड असल्यामुळे मी पर्यटनाचा एक विशेष कोर्स पूर्ण केला आणि टुरिझमच्या एका कार्यालयामध्ये नोकरी करायला लागले. लग्नानंतर जवळपास १५ वर्षांनी माझी पहिली मोठी आणि महत्त्वाची नोकरी सुरू झाली ती ‘एम्पोरियम कॅपवेल ट्रॅव्हल’ या कंपनीमध्ये. 

- तिथूनच मग देशोदेशीचे प्रवास सुरू झाले?
- हो. मी मेहनतीनं आणि चिकाटीनं आमच्या कंपनीच्या सेलमध्ये मोठी वाढ करून दाखवली आणि त्यामुळे वर्ष संपण्याच्या आतच मला मॅनेजरची पोस्ट मिळाली. मला आठवतंय, की आमच्या कंपनीच्या सर्व मॅनेजर्सची वार्षिक मीटिंग एखाद्या मोठ्या क्रूझवर असायची आणि खूप मजा असायची. ट्रॅव्हल प्रेझेंटेशन्स, कॉन्फरन्स, एज्युकेशनल लेक्चर्स असं त्याचं स्वरूप असायचं. माझा एव्हाना तिथे चांगलाच जम बसला होता. अशा मीटिंग्जमध्ये किंवा संध्याकाळच्या धमाल सेलिब्रेशनच्या वेळी माझी भारतीय साडी हा कौतुकाचा विषय असे. त्यानंतर मी ‘अॅम्बॅसॅडर टूर्स’बरोबर काही काळ काम केलं. ‘क्रूझ सफारी’ ही त्यांची स्पेशालिटी आहे, त्यामुळे तिथलाही अनुभव छान होता. 

- ‘अमेरिकन एक्स्प्रेस’च्या अनुभवाबद्दल थोडं सांगा... 
- एम्पोरियम कॅपवेल ट्रॅव्हलनंतर मी अमेरिकन एक्स्प्रेस या ख्यातनाम कंपनीत नोकरी केली. इथे मला खूपच समृद्ध करणारा अनुभव मिळाला. त्यातूनच जगभर पसरलेल्या विविध देशांतल्या विविध संस्कृतींची आणि लोकजीवनाची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. पाहता पाहता मी जगप्रवासी बनले. मुळातच प्रवासाची आवड होती. पाचही खंडांत माझं भरपूर फिरणं झालं. निरनिराळे देश, तिथलं लोकजीवन, खाद्यसंस्कृती, कला, पुरातन वारसा, पेंटिंग्ज असा सर्वांगीण धांडोळा घेता आला. फोटोग्राफीची आवड सर्वच देशांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण फोटो घेताना कामी आली. 

- तुम्ही पाहिलेली काही महत्त्वाची ठिकाणं कोणती?
- आता अमेरिकेतच ३४ वर्षांपेक्षा जास्त काळ स्थायिक असल्यामुळे जवळपास सर्व अमेरिका, स्वित्झर्लंड, हॉलंड, जर्मनी, बेलग्रेड, बुडापेस्ट, मासिडोनिया, अल्बेनिया, मोन्टेनेग्रो, बॉस्निया, रुमेनिया, क्रोएशिया, सर्बिया, हर्झ्गोविना, बल्गेरिया, दुब्रोनिक, कॉर्सिका, मोरोक्को, इक्वेडोर, ग्रीस, गलापगस, शेटलँड, ऑर्क्नी, एडिम्ब्रा, टर्की, कोस्टारिका, आइसलँड, साउथ आफ्रिका, नामिबिया, मंगोलिया, म्यानमार, न्यूझीलंड, इंडोनेशिया, इस्रायल, होनोलुलू, मोन्टेकार्लो, कान्स आणि अंटार्क्टिका अशी १४०हून अधिक ठिकाणं पाहून झाली आहेत. 

- त्यातली विशेष आवडीची स्थळं कोणती?
- भारत जन्मभूमी आणि अमेरिका कर्मभूमी त्यामुळे ही ठिकाणं सर्वांत जवळची; पण अंटार्क्टिकाचा बर्फ, तिथले ते लक्षावधी पेंग्विन्स आणि ग्रीसजवळचं एजिअन समुद्रातलं सॅन्टोरिनी बेट खूपच रुतलंय मनात! लहानपणापासून नेपोलियनचं जन्मस्थळ असलेलं कॉर्सिका बघायचं डोक्यात होतं. तिथे जातानाही एक वेगळी भावना होती मनात. कारण लहानपणापासून नेपोलियनविषयी खूप उत्सुकता होती. पुण्यात माझ्या आजोबांच्या घरी ‘मॅन ऑफ डेस्टिनी’ म्हणून एक मोठं पेंटिंग होतं. ते मनावर ठसलं होतं. नेपोलियनने आपली पत्नी जोसेफाइनला आणि प्रेयसी मारीला लिहिलेली पत्रं वाचली होती. विशेषतः त्याने मारीला लिहिलेली प्रेमपत्रं, किती सुंदर आणि तरल. तेव्हापासून त्याच्याविषयी खूप वाचलं आणि म्हणूनच कॉर्सिकाची भेट माझ्यासाठी स्पेशल होती.  

- भटकंतीव्यतिरिक्त तुमचे इतर छंद कोणते?
- प्रवासात पुरातन मंदिरं, लेणी, गुंफा वगैरे बघायची आवड आहे. त्या व्यतिरिक्त मला जलरंगात पेंटिंग्ज करायला खूप आवडतं. माझी आई ‘जी. डी. आर्ट’ आणि वडील आर्किटेक्ट. त्यामुळे चित्रकला बहुधा रक्तात थोडीबहुत उतरली आहे. देशोदेशीचे खाद्यपदार्थ खायला आवडतं. बागकाम तर खूपच आवडीचं आणि एम्ब्रॉयडरीही करते. 

(महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search