Next
लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने
BOI
Tuesday, October 23 | 02:16 PM
15 1 0
Share this story

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर भारतातील पहिले शेतकरी नेते, भातभाव लढ्याचे प्रणेते, इगतपुरीचे लोकनायक आमदार, शेतकरी आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारा सच्चा आणि लढवय्या नेता, ही कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांची खरी ओळख आपल्या ‘लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने’ या पुस्तकातून लेखिका सुमनताई गोवर्धने यांनी करून दिली आहे. विजय पवार यांनी करून दिलेला या पुस्तकाचा हा परिचय....
...........................
आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि डॉ. भालचंद्र कांगोच्या शुभहस्ते सुमनताई गोवर्धने लिखित, ‘लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने’ या पुस्तकाचे नाशिक येथे अलीकडेच प्रकाशन झाले. या पुस्तकाच्या निमित्ताने कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने आणि भातभाव लढा- शेतकऱ्यांचे पहिले यशस्वी आंदोलन हा आजच्या पिढीला माहित नसलेला विषय पुन्हा चर्चेत आला. 

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर भारतातील पहिले शेतकरी नेते, भातभाव लढ्याचे प्रणेते, इगतपुरीचे लोकनायक आमदार, अखेरच्या श्वासापर्यंत शेतकरी आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारा सच्चा आणि लढवय्या नेता, ही कॉम्रेड पुंजाबाबा यांची खरी ओळख. साधारणतः ७०च्या दशकापर्यंत मुल्य, निष्ठा, आदर्श, देशप्रेम आणि लोककल्याण हीच तत्त्व, सत्व आणि हाच राजकारणाचा मूळ गाभा होता. राजकारण हे समाजकारणाचे एक माध्यम आहे असे मानून, हे सेवाव्रत ज्या लोकनेत्यांनी स्वीकारले, त्या स्वातंत्र्यानंतरच्या भारावलेल्या कालखंडाचे प्रतिनिधी होते कॉम्रेड पुंजाबाबा. 

आजच्या राजकारणातून अशी ध्येयवेडी माणसे कधीच बाहेर फेकली गेली आहेत. ती पिढीही आता अस्ताला गेली आहे. म्हणूनच आपले हिरो शोधण्यासाठी आज पुन्हा भूतकाळात शिरावे लागते. ‘लढवय्या....’चा लेखनप्रवास हा त्याच ऊर्जेतून,  आंतरिक ऊर्मीतून सुरू झाला. बाबांच्या सूनबाई, सुमनताई गोवर्धने यांनी वयाची ऐंशी वर्षं पार केल्यानंतर याच अंतःप्रेरणेतून, दुर्दम्य इच्छेने आणि बाबांविषयीच्या आस्थेने हे शिवधनुष्य पेलले. इतकी वर्षे सांभाळून ठेवलेली कागदपत्रे, साधने या पुस्तकासाठी कामी आली आणि बाबांचे चरित्र समाजासमोर मांडले गेले.

एका छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पुंजाबाबांनी शालेय जीवनातच आपल्या शाळेतील शिक्षकांकडून महात्मा फुले, कर्वे, लोकमान्य टिळक आणि सत्यशोधक समाजाचा संस्कार घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपल्याच राज्यकर्त्यांविरुद्ध भातभाव लढ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढले. इगतपूरीचे आमदार झाल्यावरही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुंजाबाबा सदैव सक्रिय राहिले.

इगतपुरीसारख्या आदिवासीबहूल तालुक्यात खेड्यापाड्यांतून पसरलेल्या आदिवासी, अस्पृश्य, दलित आणि शेतकरी समाजाला दिशा आणि नेतृत्व देण्याचे मोठे काम त्या काळात पुंजाबाबांनी केले. शिक्षणप्रसार, अंधश्रद्धा व अस्पृश्यता निवारणासाठीसुद्धा बाबांनी भरीव कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही पुंजाबाबांचा क्रियाशील सहभाग होता.

या पुस्तकासाठी लेखिकेने सखोल संशोधन करून, विधानसभेतील त्यांची भाषणे व इतर दस्तावेज आणि उपलब्ध ऐतिहासिक साधनांचा योग्य प्रकारे वापर करत पुंजाबाबांच्या या अभ्यासपूर्ण चरित्रग्रंथाला तटस्थ राहूनही समर्थपणे न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पुंजाबाबांसारखे तपस्वी, लोकोत्तर नेते या समाजाचे एकेकाळचे खरे नायक होते. ही पडद्याआड गेलेली प्रेरणास्थाने शोधून प्रकाशात आणण्याचे मोठे काम या पुस्तकामुळे होणार यात शंकाच नाही. 

सुमन गोवर्धनेंनी वयाच्या ८२व्या वर्षी केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मोठ्या प्रयत्नांनी लिहीलेला हा चरित्रग्रंथ स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतातील शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरावा हीच अपेक्षा.

‘लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने’ हे पुस्तक जरूर वाचा आणि या लोकनायकाला जाणून घ्या.

पुस्तक : लढवय्या - कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने
लेखक : सुमन हुकमतराव गोवर्धने
प्रकाशन : शब्दसुमन प्रकाशन, नाशिक 
पृष्ठे : २२८
मूल्य : २२५ रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link