Next
सागरी सज्जतेत विश्वासार्हता
BOI
Monday, December 04 | 04:49 PM
15 0 0
Share this story

देशाच्या सागरी सज्जतेत विश्वासार्हता निर्माण झाली असल्याची आणि आपले नौदल नेहमीच सामर्थ्यवान असेल, अशी ग्वाही नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी दिली आहे. देशाच्या रक्षणातील नौदलाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेच्या सन्मानार्थ दर वर्षी चार डिसेंबर हा भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लांबा बोलत होते.

नौदल दिनानिमित्त नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात भारताच्या सागरी सुरक्षेचा आढावा घेतला. ‘देशरक्षणाचे कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे बजावता यावे यासाठी आम्ही नवीन योजना आखल्या आहेत. त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नौदलाची जहाजे आणि विमाने एडनच्या आखातापासून पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागापर्यंत कार्यरत आहेत. यामुळे सागरी सज्जतेत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. या सज्जतेचा ठराविक कालावधीने आढावा घेण्यात येतो. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचा संयुक्त सराव, तसेच अन्य देशांबरोबरचा संयुक्त सराव यामुळे नौदलाची कार्यक्षमता वाढण्यास आणि आपल्या सागरी सीमांलगतच्या देशांबरोबर आपले संबंध मैत्रिपूर्ण राहण्यास मदत होते. आपले नौदल नेहमीच सामर्थ्यवान व युद्धसज्ज असेल आणि देशाच्या सागरी क्षेत्राचे संरक्षण करण्याच्या आपल्या कर्तव्यात आम्ही कधीच कसूर करणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला देतो,’ असे लांबा यांनी सांगितले.

देशाची सागरी सीमा सात हजार ५१७ किलोमीटर इतकी लांब आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने समुद्री क्षेत्रातील सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. या कामात भारतीय नौदलाची कामगिरी महत्त्वाची ठरते. नौदलाने देशसेवा करताना केलेली अतुलनीय कामगिरी व देशाच्या रक्षणातील नौदलाची महत्त्वपूर्ण भूमिका यांच्या सन्मानार्थ दर वर्षी चार डिसेंबर हा भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो.

१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात कराची बंदरावरील हल्ल्यात अतुलनीय शौर्य गाजवून भारतीय नौदलाने मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ नौदल दिन साजरा करण्यात येतो. ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेत नौदलाने केवळ नव्वद मिनिटांत सहा क्षेपणास्त्रांच्या साह्याने पाकिस्तानच्या चार युद्धनौका उद्ध्वस्त केल्या. त्यात शस्त्रास्त्रे व दारूगोळा असलेल्या मालवाहू नौकेचाही समावेश होता. कराची बंदरावरील तेल साठवण्याची साधनेही भारतीय सैनिकांनी नष्ट केली. चार डिसेंबरच्या रात्री केलेल्या या कारवाईत पाचशेहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून, आपला एकही सैनिक न गमावता भारताचे विजयी वीर मुंबईला परतले. आयएनएस निपट, आयएनएस निर्घट व आयएनएस वीर या भारतीय युद्धनौकांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतात पहिले स्वतंत्र आरमार उभे करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. त्यानंतर १९३४मध्ये ब्रिटिशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर त्याचे ‘भारतीय नौदल’ असे नामकरण करण्यात आले.

सागरी सीमांचे संरक्षण करण्याबरोबरच भारताचे इतर देशांसोबत असलेले द्विपक्षीय संबंध दृढ करणे, आपत्कालीन मदत, संयुक्त सराव आदींमध्येही नौदलाचे योगदान मोठे आहे. २००४च्या त्सुनामी काळात नौदलाने श्रीलंका, इंडोनेशिया व मालदीव या देशांमध्ये मदतकार्य केले होते. नुकत्याच झालेल्या ओखी वादळातही नौदलाने दहा जहाजे व आठ विमाने यांच्या साह्याने शोधमोहीम राबवून १४५ जणांची सुखरूप सुटका केली.

आधुनिक विमानवाहू नौका, पाणबुड्या, क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रे, युद्धनौका, कार्वेट्स, आण्विक पाणबुडी, फ्रिगेट्स यांचा समावेश असलेले व कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यास सुसज्ज असलेले आपले नौदल जगात पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदी महासागरातील चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय नौदलदेखील आपले सामर्थ्य वाढवण्यावर भर देत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link