Next
अद्ययावत सुविधांमुळे ९० टक्के ‘प्री-मॅच्युअर’ बालकांचा जीव वाचविण्यात यश
मुदतपूर्व प्रसूती दिनानिमित ‘मदरहूड’च्या डॉ. तुषार पारिख यांची माहिती
प्रेस रिलीज
Saturday, November 17, 2018 | 12:44 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांची अवयव यंत्रणा अपरिपक्व असते आणि त्यामुळे त्यांच्यात मृत्यूदर अधिक असतो. सुदैवाने, वैद्यकीय शास्त्रात वेगाने होणाऱ्या सुधारणांमुळे बाळाच्या शरीरक्रियांबद्दलचे आपले ज्ञान वाढले आहे. अद्ययावत व्हेंटिलेटर्स आणि उच्च दर्जाचे तंत्रज्ञान यामुळे अद्ययावत उपकरणे असलेल्या हॉस्पिटलमध्ये ९० टक्के बालकांचा जीव वाचविण्यात यश मिळते,’ अशी माहिती मदरहूड हॉस्पिटलमधील सल्लागार निओनॅटोलॉजिस्ट डॉ. तुषार पारिख यांनी दिली.  

जागतिक मुदतपूर्व प्रसूती दिन १७ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित डॉ. पारीख यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी प्रसूती झालेल्या बाळांना मुदतपूर्व प्रसूती किंवा अपरिपक्व (प्रिमॅच्युअर) बालके म्हणतात. जगभरात बालमृत्यूंसाठी आणि व्यंग व भावी आयुष्यातील प्रकृती अस्वास्थ्यासाठीही मुदतपूर्व प्रसूती हे प्रमुख कारण आहे. दर वर्षी जगभरात १५ दशलक्ष बालकांची प्रसूती मुदतपूर्व होते. अशा प्रसूतीने निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे एक दशलक्ष बालकांचा मृत्यू होतो. मुदतपूर्व प्रसूती किंवा गर्भाशयात खुंटलेली वाढ यामुळे जन्मजात वजन कमी असणे (जन्मलेल्या बाळांचे वजन २५०० किलोपेक्षा कमी असणे) हे नवजात बालकांच्या मृत्यूसाठी आणि व्यंग व नॉन-कम्युनिकेबल (संसर्गामुळे न होणारे) आजारांसाठी एक प्रमुख कारण आहे.’

‘गेल्या १० वर्षांत असे दिसून आले की, ३० ते ४० या वयोगटांत स्त्रियांची पहिली प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यापैकी अनेकजणी आयव्हीएफ तंत्रांचा पर्याय स्वीकारतात. त्यांच्यात मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता अधिक असते. अशी प्रसूती झालेल्या बाळांच्या आरोग्याची काळजी निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये घेतली जाणे आवश्यक आहे. मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बालकांमध्ये वेळ अत्यंत मौल्यवान असतो. त्यामुळे ज्या महिलांच्या गर्भधारणेमध्ये गुंतागुंत असते किंवा मुदतपूर्व प्रसूती वा कमी वजन असलेले बाळाची प्रसूती करण्याची शक्यता जिथे असेल त्या मातेची प्रसूती अद्ययावत उपकरणे उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये व्हावी, जेणेकरून नवजात बालकाच्या प्रकृतीमध्ये असलेली गुंतागुंत व्यवस्थित हाताळली जाईल. निओनॅटोलॉजी ही बालरोगशास्त्राची एक शाखा असून, यात तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांतर्फे पहिल्या महत्त्वाच्या महिन्यांमध्ये बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते,’ असे डॉ. पारीख यांनी सांगितले.

‘मातेचा आणि बाळाचा जीव वाचविण्यासाठी प्रसूतीदरम्यान आणि नवजात बालकाच्या पहिल्या महिन्यात मातेला व बाळाला उत्तम दर्जाची, नि:पक्ष आणि सुयोग्य काळजी घेतली जाणे हा मुद्दा हाताळला जाणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे आणि जेव्हा कुटुंबामध्ये मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळाचे आगमन होते तेव्हा भावनिक आधारही मिळणे आवश्यक असते. मुदतपूर्व प्रसूती झालेले बाळ घरी जाण्याआधी ‘एनआयसीयू’मध्ये वास्तव्याचा काळ थोडा अधिक असू शकतो. २८ व्या आठवड्यात प्रसूत झालेले बाळ ८-१० आठवड्यांनी घरी जाऊ शकते’, अशी माहिती डॉ. पारिख यांनी दिली.

कोणत्याही इतर देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक मुदतपूर्व प्रसूती होतात. मुदतपूर्व प्रसूती टाळण्यासाठी आणि अशा बालकांचा जीव वाचवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत. यात आरोग्य केंद्रांमध्ये अँटिनॅटल कोर्टिकॉस्टिरॉइड्स (एसीएस) वापरण्याबाबत २०१४ साली प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. नवजात बालकांचे फुफ्फुस पूर्ण विकसित होण्यासाठी २४ ते ३४ आठवड्यांदरम्यान प्रसूती होण्याची शक्यता असलेल्या मातांच्याबाबतीत एसीएसची अंमलबजावणी केली जावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link