Next
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, April 11, 2019 | 12:53 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.

‘भारत एक महाशक्ती के पथ पर’ या विषयावर १० एप्रिल २०१९ रोजी मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, प्रदेश प्रवक्ता अतुल शाह, ‘भाजप’ दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गमरे आणि मुंबई ‘भाजप’ उपाध्यक्ष किरीट भन्साळी यांच्यासह मुंबईतील व्यापार उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘नरेंद्र मोदी – जुन्या व्यवस्थांना हादरा देणारा सर्जक’ या पुस्तकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले.गोयल म्हणाले, ‘आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात २०१३ साली रुपया घसरू लागल्यावर सुमारे ३५ अब्ज डॉलर्स मोठ्या व्याजदराने कर्जाऊ घेऊन परकीय चलन साठा वाढविण्यात आला. मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने असे कोणतेही उपाय केले नाही. या सरकारने देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली व त्याबद्दल जगभर विश्वास निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक करण्यात आली. मोदी सरकार सत्तेवर आले त्यावेळी ३०० अब्ज डॉलर्स इतका परकीय चलन साठा होता तो आता विक्रमी ४१२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. भारताची अर्थव्यवस्था पाच वर्षांत जगात अकराव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आली आहे. सलग पाच वर्षे महागाईचा दर घसरत आहे व पाच वर्षांचा विचार करता आतापर्यंतची ही सर्वांत कमी महागाई आहे.’

‘मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट करताना गाव, गरीब, शेतकरी, आदिवासी अशा सर्वांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी केले व सर्वांपर्यंत विकास पोहोचला आहे. गरीब कल्याणाचे काम आणि मजबूत अर्थव्यवस्था याच्या जोरावर भारत आगामी काळात आणखी पुढचा टप्पा गाठेल व विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचे धाडस केवळ मोदींनीच केले. ‘एक देश एक कर’ ही प्रणाली लागू केल्यानंतर अंमलबजावणीतील अडचणी दूर केल्या. आगामी काळात कर संकलनाचा पाया विस्तारेल, तसे ‘जीएसटी’ व आयकर हे दोन्ही कर आणखी कमी करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.’सहस्रबुद्धे म्हणाले, ‘२०१४पूर्वी देशात निराशेचे वातावरण होते. या देशात काही चांगले होणार नाही असे वाटायचे; पण मोदींच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांच्या सफल कार्यकाळामुळे लोकशाही यशस्वी होऊ शकते, राजकारणी चांगले असू शकतात व ते जनतेची सेवा करू शकतात हा विश्वास निर्माण झाला आहे. मोदींनी लोकशाही संस्थांची विश्वासार्हता पुन्हा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search