Next
...आणि त्याला लाभले नवजीवन
‘युनिव्हर्सल हॉस्पिटल’मध्ये यशस्वी मज्जारज्जू प्रत्यारोपण
BOI
Friday, October 26, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this story

यशस्वी मज्जारज्जू प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर सुधारणा झालेल्या मन्सूर मोहम्मद हुसैनसह डॉ. अनंत बागुल

पुणे : तुमच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान ही सर्वांत मोठी संधीदेखील असते, ही म्हण सार्थ ठरवत युनिव्हर्सल रुग्णालयातील डॉक्टरांनी मज्जारज्जू प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून येमेनमधील एका २२ वर्षीय तरुणाला नवीन जीवन दिले आहे. प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अनंत बागुल यांच्या नेतृत्वाखालील पुण्यातील चार डॉक्टरांच्या पथकाने ही अत्यंत क्वचित केली जाणारी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. 

मन्सूर मोहम्मद हुसैन या येमेनच्या २२ वर्षीय नागरिकावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. हा तरुण येमेनच्या लष्करात कर्तव्य बजावत असताना नागरी युद्धादरम्यान त्याच्या मानेला गोळी लागून दुखापत झाली होती. याचा परिणाम म्हणून त्याचे संपूर्ण शरीर विकलांग झाले होते. शरीराच्या वरील भागात याचा परिणाम अधिक जाणवत होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी मन्सूरला डॉ. बागुल यांच्याकडे पाठवण्यात आले.

या शस्त्रक्रियेत त्याच्या अस्थिमगजातील (बोनमॅरो) पेशींचे पाठीच्या कण्याच्या (मज्जारज्जू) हानी झालेल्या भागात प्रत्यारोपण करण्यात आले. मन्सूरवर झालेल्या दोन शस्त्रक्रियांपैकी पहिल्या शस्त्रक्रियेत त्याच्या मेसेंकिमल आदीपेशी अस्थिमगजातून काढल्या आणि त्यात वाढलेल्या घटकांचे पाठीच्या कण्याच्या प्रभावित भागात आधाराच्या सहाय्याने प्रत्यारोपण केले. गोळी लागल्यामुळे झालेल्या दुखापतीत त्याच्या मज्जारज्जूचा भाग कापला गेला होता. डॉक्टरांच्या मते, आदीपेशींमुळे दुखापतीच्या वरील आणि खालील मज्जारज्जू पुन्हा जोडून घेण्यासाठी आवश्यक तंतू तयार होतात आणि नर्व्ह ग्राफ्ट वापरून कण्यात निर्माण झालेले अंतर भरून काढता येते. डॉ. अनंत बागूल यांच्या नेतृत्वाखालील पथकाला डॉ. आनंद काटकर, डॉ. श्रीनिवास शिंत्रे, डॉ. सचिन कौशिक, डॉ. दीपक पोमन आणि डॉ. मनोज बनसोडे यांची मदत लाभली.

युनिव्हर्सल हॉस्पिटलमधील कन्सल्टंट अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. बागुल म्हणाले, ‘मज्जारज्जूच्या पुनरुज्जीवनाने आयुष्य वाचवता येतात हे बघणेच अवाक करणारे आहे. काही वर्षांपूर्वी यावर विचारच झाला नव्हता, हे अशक्य कोटीतील होते. ही गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अविश्रांत मेहनत करणाऱ्या आणि आपले सर्वोत्तम देणाऱ्या माझ्या पथकाचे मी आभार मानतो. प्रचंड संयम आणि इच्छाशक्तीचे दर्शन घडवणारा रुग्ण मन्सूर मोहम्मद हुसैन याचेही मी आभार मानतो. भारतात अत्यंत वेगळी समजली जाणारी ही शस्त्रक्रिया आम्ही त्यामुळेच यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो.’

शस्त्रक्रियेनंतरच्या प्रगतीबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ‘रुग्ण उत्तम प्रगती दाखवतो आहे. शस्त्रक्रियेमुळे त्याच्या स्नायूंची शक्ती, संवेदना परत आली आहे आणि शरीराच्या वरील तसेच खालील भागांच्या हालचाली बऱ्याच अंशी सुधारल्या आहेत. ही प्रगती पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमुळेच झाली आहे याचा हा पुरावा आहे. कारण स्नायूंवर नियंत्रण ठेवणारे मेंदूकडून येणारे संदेश मज्जारज्जूच्या माध्यमातून स्नायूंपर्यंत पोहोचतात. पाठीच्या कण्यात निर्माण झालेले अंतर उपचारांनंतर भरून निघाल्याचे शस्त्रक्रियेनंतर केलेल्या एमआरआय स्कॅनमधून स्पष्ट झाले आहे.’

‘यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले असून, भविष्यकाळात आमचे युनिव्हर्सल हॉस्पिटलमधील पथक या जगभरातील कुठल्याही रुग्णावर हे उपचार करण्यास सज्ज आहे असा आत्मविश्वास मला वाटतो. मज्जारज्जू अर्थात पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया उत्तम ठरेल,’ असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link