Next
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे
BOI
Sunday, March 31, 2019 | 06:45 AM
15 0 1
Share this article:

अलका टॉकीज (फोटो सौजन्य : punecity.com)नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
..........
बालपणीच्या आठवणी सुरम्य असतात. आपण सहसा त्या विसरत नाही. शाळा आणि तिथले मित्र, सुटीच्या दिवसांत मामाच्या गावाला जाणे, दिवाळी-गणपती या त्यातल्या प्रमुख गोष्टी. त्याचबरोबर नाटक-सिनेमा, कथा-कीर्तने, सर्कस आणि क्वचित क्रिकेटचे सामने बघणे, यांचेही अप्रूप असे. सिनेमा हा तर आबालवृद्धांच्या आवडीचा, आकर्षणाचा विषय. ज्या चित्रपटगृहांत ते दाखवले जातात, त्यांच्याबद्दलही प्रेम निर्माण झाल्याशिवाय कसे राहील! सन १९५० ते ७५ हा पंचवीस वर्षांचा कालखंड अजूनही स्पष्ट आठवत आहे. म्हणजे माझे वय वर्षे पाच ते तीस. आज थिएटर्स अतिशय सुसज्ज, अत्याधुनिक असली, तरी त्यातील प्रेक्षकांची संख्या घटली आहे.

जुन्या काळी पुण्यात २५-३० साधीसुधी एकपडदा‘गृहे’ होती; पण तिकीट काढण्यासाठी लांबच्या लांब रांगा असत. चित्रपटांचे रौप्य/सुवर्णमहोत्सव होत. तो एक गौरवाचा, अभिमानाचा विषय असे. सध्या ‘बिग बजेट’ चित्रपट एकाच वेळी हजार-पंधराशे ठिकाणी प्रदर्शित होतात. अवकाशातून ‘यूएफओ’ डिजिटल प्रक्षेपण होत असल्यामुळे ‘प्रिंट्स’ काढाव्या लागत नाहीत. मोठा खर्च वाचतो. ‘बॉक्स ऑफिस’वर १०० कोटी, २०० कोटी रुपयांचा धंदा होणारे मोजके चित्रपट असतात. परंतु ८०-९० टक्के चित्रपट दुसरा आठवडासुद्धा पाहू शकत नाहीत. या व्यवसायाचे गणित पूर्णपणे बदलले आहे. सामान्य प्रेक्षकांच्या ते आकलनाच्या पलीकडचे आहे. दर शुक्रवारी नवे चित्रपट प्रदर्शित होतात. समजा, एका दिवशी ३-४ हिंदी आणि २-३ मराठी चित्रपट दाखल झाले, तर त्यातले किती यशस्वी ठरू शकणार! अपवाद वगळता, रसिक प्रेक्षकसुद्धा आठवड्यात एखादा चित्रपट बघतात. म्हणजे या स्पर्धेत चांगले चित्रपटसुद्धा कोसळतात. दूरदर्शनवरून किंवा यू-ट्यूबवरून पुन्हा बघायला मिळतील तोपर्यंत वाट बघणे आले. ही झाली चित्रजगताची सर्वसाधारण पार्श्वभूमी. आता चित्रपटगृहांच्या रंजक आठवणींची उजळणी! 

आर्यन सिनेमा

‘आर्यन सिनेमा’ हे पुण्याच्या मंडईजवळचे सर्वांत जुने थिएटर. ती जागा चालकांना ‘लीज’वर मिळालेली होती. साधारण ४०० खुर्च्या असतील तिथे. अनेक चित्रपटांचे रौप्यमहोत्सव होण्याचे भाग्य ‘आर्यन’ला लाभले (केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, दादा कोंडक्यांचे चित्रपट). जास्त करून तमाशापट असत. परंतु बऱ्याच वेळा हिंदी चित्रपटही लागत. संस्थापक मालकांचे आडनाव पाठक होते. त्यांचे चिरंजीव आनंदराव माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यामुळे काही वेळा आम्हाला मोफत पास मिळत. तसे तिकीट काढूनही आम्ही जात असू. अशोककुमारचा ‘आशीर्वाद’ हा हिंदी चित्रपट तिथेच प्रदर्शित झाला होता. त्या वेळी एक नवा प्रयोग म्हणून थिएटरच्या मधोमध एक पडदा लावला होता. प्रेक्षकांना दोन भागात बसवले जाई. मध्यंतरानंतर एका भागातले लोक दुसऱ्या भागात जात. मधल्या पडद्याचे प्रतिबिंब समोरच्या बाजूला असलेल्या पडद्यावर उमटत असे. तेही सरळच असायचे. (मधल्या पडद्याच्या मागे उलटे चित्र, आणि पलीकडे पुन्हा सुलटे.) जास्त प्रेक्षकांना एकाच वेळी सिनेमा बघता यावा, हा त्यामागचा उद्देश होता; मात्र त्या योजनेला कुठेच फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

‘सिटी पोस्टा’च्या पलीकडच्या गल्लीत ‘विजयानंद’ थिएटर होते. ‘सांगत्ये ऐका’ हा अत्यंत लोकप्रिय मराठी चित्रपट (‘बुगडी माझी सांडली गं’) तिथे १३० आठवडे चालला. हा मराठीतला उच्चांक होता. मुंबईत ‘संत तुकाराम’ १०२ आठवडे चालला होता. मी सातवीत असताना ‘सांगत्ये ऐका’ पाच आणे तिकिटात प्रथम पाहिला. पुढे तिथेच २-३ वेळा बघितला. त्या वेळची एक गंमत! दादा साळवी या ज्येष्ठ कलाकाराने पाटलाची भूमिका केली होती. वसंतराव पहिलवान या नटाने रामोश्याचे काम केले होते. दोघेही एकमेकांचे शत्रू बनलेले. अखेरीस पाटील रामोशाला गोळी मारतात. त्याच वेळी रामोशी पाटलावर कुऱ्हाड फेकतो. दोघेही त्यात मरतात. दरम्यान, वसंतराव पहिलवान यांचे खरेखुरे निधन झाले, तेव्हा चार वर्षांनी लहान असलेल्या माझ्या भावाने विचारले होते, की ‘आता ‘सांगत्ये ऐका’ सिनेमा बंद पडणार का?’

‘विजयानंद’च्या जवळच ‘श्रीकृष्ण’, ग्लोब (श्रीनाथ) आणि ‘मिनर्व्हा’ ही थिएटर्स होती. ‘पॅरामाउंट’ (रतन) होते. तिथे जास्त करून हिंदी चित्रपटच लागत. राजकपूरचा ‘जिस देश में...’ मी ‘श्रीकृष्ण’मध्ये पाहिला. तो भाग गर्दीचा, वेश्या वस्तीचा असल्यामुळे सहकुटुंब कोणी सहसा तिकडे जात नसत. आम्हाला काहीच अडचण नव्हती. आम्ही सदाशिव पेठेत ‘भरत नाट्य’समोर राहायचो. जवळची थिएटर्स म्हणजे ‘भानुविलास’, ‘विजय’ आणि ‘अलका’. ‘प्रभात’सुद्धा (सध्याचे ‘किबे लक्ष्मी’) पायी जाण्याच्या अंतरातलेच होते. लांबच्या ठिकाणी जायला सायकल होतीच. इयत्ता ११वी हे त्या वेळचे शालान्त परीक्षेचे वर्ष. त्या वर्षी मी १५ चित्रपट तरी बघितले असतील. नाही तर वर्षाला दोन-तीन चित्रपट हे मध्यमवर्गीयांचे प्रमाण होते. तिकीटदर पाच आणे, साडेदहा आणे आणि बाल्कनी एक रुपया. चहा, खारे दाणे आणि बटाटेवडा एका आण्यात मिळे (एक रुपया म्हणजे १६ आणे). ‘विजय’ व 'भानुविलास’ ही थिएटर्स मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध होती. ‘अलका’मध्ये फक्त इंग्रजी चित्रपट लागत. ‘मॅटिनी’ हा प्रकार त्या वेळी अस्तित्वात होता. दुपारी १२ किंवा एक वाजता (शक्यतो) इंग्रजी चित्रपट दाखवत. अन्यत्र हिंदी मॅटिनी असत. आता मॅटिनी ही संकल्पनाच नष्ट झाली आहे. जुन्या काळी पाच-१० आठवडे झाल्यावर एखादा सिनेमा गेला, तर तो मॅटिनीला बघण्याची सोय-शक्यता होती. जुने चित्रपटसुद्धा मॅटिनीला लागत. आता नवा सिनेमासुद्धा एकदा गेला की गेलाच! इंग्रजी चित्रपटांचा सुवर्णकाळ आमच्या पिढीने बाल/तरुणपणी पाहिला. विनोदी, रहस्यपट, युद्ध, संगीतमय, कौटुंबिक, ऐतिहासिक, पौराणिक या विषयांतले अक्षरश: हजारो चित्रपट बघायला मिळाले. मराठी-हिंदी तर होतेच.

प्रभात

डेक्कन जिमखान्यावर ‘डेक्कन’, ‘हिंदविजय’ ही थिएटर्स होती. ‘हिंदविजय’चे पुढे ‘नटराज’ झाले. तिथे ‘मुघल-ए-आझम’, ‘गंगा जमना’ हे गाजलेले चित्रपट पाहिले. नंतर तिथे नवी इमारत झाली. त्यात एक चित्रपटगृह असणार होते; पण तसे झाले नाही. डेक्कन जिमखाना बस स्टॉपसमोरील ‘डेक्कन’चे आता ‘आर डेक्कन सिटी प्राइड’ बनले आहे. अप्पा बळवंत चौकाजवळचे ‘प्रभात’ तर मराठी चित्रपटांचे माहेरघर. तिथे कित्येकांना २५, ५० आठवड्यांचे भाग्य लाभले. (सन १९९१मध्ये प्रदर्शित) ‘माहेरची साडी’ ‘प्रभात’मध्ये सलग दोन वर्षे चालला. त्याचे एकूण उत्पन्न १२ कोटी रुपये झाले. म्हणजे आजच्या घडीला तेच २०० कोटी रुपये होतात. मराठीतला एक उच्चांकच! ‘प्रभात’मध्ये नंतर हिंदी चित्रपट सुरू झाले. ‘आराधना’, ‘राजकुमार’ इत्यादींचे रौप्यमहोत्सव झाले. ‘आर्यन’चे ‘लीज’ संपल्यानंतर पाठकांनी ते वाढवण्याचे खूप प्रयत्न केले; पण त्यात यश मिळाले नाही. त्या जागी महापालिकेने मोठे ‘पार्किंग’ उभे केले. ‘मिनर्व्हा’च्या जागेवरही तीन मजली पार्किंग झाले आहे.

कँपमधे ‘वेस्ट एंड’, ‘एम्पायर’ आणि ‘कॅपिटॉल’ (व्हिक्टरी) ही थिएटर्स होती. ‘एम्पायर’ तर बंद झाले; पण तिथे काही इंग्रजी चित्रपट पाहिले होते. ‘वेस्टएंड’ची जागा खूप मोठी होती. ब्रिटिश छाप इमारत होती. तिथे इंग्रजी चित्रपट बघताना ‘शाही’ अनुभूती यायची. ‘मॅकेनाज गोल्ड’ १९६९ साली तिथेच पाहिला. थिएटर समोरच ‘कॅफे नाझ’ हॉटेल होते. खास इराणी सामोसे, बन मस्का आणि चहा पिण्यासाठी तिथे हजेरी लावणे अत्यावश्यक असायचे! 

वेस्ट एंड

‘अलका’लाही इंग्रजीचेच वळण होते. अजूनही त्या आठवणी जागृत आहेत. ‘वेस्टएंड’च्या जागीही मोठा मॉल झाला आहे; पण त्याच नावाने ‘मल्टिप्लेक्स’ चालू आहे. छाया, अप्सरा, अरुण, निशांत, लिबर्टी, जयहिंद ही जुनी, थोडी गावाबाहेरची ‘गृहे’ होती. तिथे क्वचित एखादा चित्रपट पाहिला असेल. जवळच्या जागी बघायची सोय असल्याने लांब जाण्याचा प्रश्न नसे. एक गंमत, जरा बदल (फिरणे) म्हणून गेलो तरच! रास्ता पेठेत ‘अपोलो’ होते - अजूनही आहे. तिथेही अधूनमधून भेट असे. जवळच चांगली उडुपी हॉटेल्स होती. इडली, वडा, डोसा खावासा वाटला, की चला तिकडे! नाना पेठेत ‘अल्पना’ (तिथे ‘संगम’ पाहिला), स्वारगेटच्या पुढे लक्ष्मीनारायण (इतरत्र ‘शो’ नसेल तरच), पुणे रेल्वे स्टेशनजवळ ‘अलंकार’ (काही वेळा), येरवड्यात बऱ्याच उशिराने ‘गुंजन’ (जिथे ट्रकसुद्धा पार्किंगमध्ये ठेवता येतात) अशी काही ठिकाणेसुद्धा होती. काही वेळा मित्र बरोबर असायचे; पण बहुधा मी एकटाच चित्रपटाचा आनंद लुटायचो. आजही तीच ‘प्रथा’ चालू आहे.

बुधवार चौकाजवळ ‘वसंत’ टॉकीज आहे. अजूनही जसेच्या तसे आहे. १९६१ साली शम्मी कपूर, सायरा बानूचा ‘जंगली’ तिथेच पाहिला. ते पानशेत पुराचे वर्ष होते. ‘वसंत’ला महिन्या-दोन महिन्यांत एखादा सिनेमा तरी बघून होतो. तिकिटाचे दर अजूनही ६० ते ८० रुपये असे असतात. नुकताच ‘केसरी’ चित्रपट तिथे पाहिला. बाल्कनीत आम्ही एकूण तीन प्रेक्षक होतो. खास आमच्यासाठी ‘शो’ ठेवलेला आहे, असे बऱ्याच ठिकाणी घडते. जुन्या काळातल्या लांबच लांब रांगा आठवतात. 

शिवाजीनगरमध्ये ‘राहुल’ थिएटर आहे. पूर्वी तिथे फक्त इंग्रजी चित्रपट दाखवत. आता दोन पडदे झाले आहेत. हिंदी-मराठी दोन्ही चालतात. तिथेही खूप चांगले चित्रपट पाहिले. परदेशी चित्रपटांचे महोत्सवही बघायला मिळाले. पर्वतीच्या अलीकडे ‘नीलायम’ थिएटर आहे. अन्यत्र सोयीची वेळ नसेल, तर तिथे जाणे होते. राज कपूरच्या ‘बॉबी’ने तिथे कहर केला. तिकिटे ‘ब्लॅक’ने विकून डोअरकीपर्सनीसुद्धा लाखो रुपये मिळवले होते. अलीकडच्या काळात प्रचंड गर्दी खेचणारे दोनच चित्रपट झाले. एक म्हणजे मराठी ‘सैराट’ (याने १०० कोटी उत्पन्न बघितले) आणि दुसरा हिंदी ‘बाहुबली.’

चित्रपटांची विशेष आवड असल्यामुळे अधूनमधून मी मुंबईला जाऊनही तो ‘छंद’ पुरा करत असे. व्हीटी (छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन) आणि चर्चगेटच्या जवळ सहा-सात चांगली थिएटर्स होती. ती म्हणजे एरॉस, स्टर्लिंग, न्यू एक्सलसिअर, लिबर्टी, मेट्रो, रीगल इत्यादी. तिथे उत्तमोत्तम चित्रपट बघायला मिळाले. ‘पॅपिलॉन’चा अनुवाद केला असल्यामुळे तो १९८० साली खास मुंबईला जाऊन पाहिला. त्या वेळी दिवसभर पाऊस होता आणि ख्यातनाम गायक मोहम्मद रफीचे निधन त्याच दिवशी झाले होते. ‘गॉडफादर’सुद्धा मुंबईतच पाहिला. पुन्हा ते दोन्ही पुण्यातही पाहिले.

पुण्यात आता बरीच मल्टिफ्लेक्स झाली आहेत. एका जागी चार ते आठ पडदे असतात. बऱ्याच वेळा प्रेक्षकही तेवढेच असतात. ते पाहून खूप वाईट वाटते. चित्रपटांची गंगा आता घराघरात येऊन पोहोचलेली आहे. दूरदर्शन संचाच्या छोट्या पडद्याची सवय झाली आहे. मग बाहेर जाऊन शेकडो रुपये उगाच कोण खर्च करील! परंतु माझ्यासारखे त्याला अपवाद असलेलेही बरेच आहेत. हयात असेपर्यंत त्यात बदल होण्याची शक्यता नाही!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit Suresh Salunke About 198 Days ago
Thanks for your help and support with knowledge
0
0
Amit Suresh Salunke About 198 Days ago
Thanks for your help and support with knowledge
0
0

Select Language
Share Link
 
Search