Next
‘वंद्य वंदे मातरम’मधून उलगडल्या दिग्गजांच्या आठवणी
प्रेस रिलीज
Monday, February 04, 2019 | 01:16 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘वंदे मातरम या चित्रपटात पु. ल. देशपांडे (पुलं) आणि सुनीताबाईंनी प्रथमच नायक आणि नायिकेची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी कथा, पटकथा संवाद आणि गीतलेखन ग. दि. माडगुळकरांनी (गदिमा) केले होते. या चित्रपटाला संगीत सुधीर फडके (बाबूजी) यांनी दिले होते. या चित्रपटाचे निर्माते होते स्वामी विज्ञानानंद. त्यांनीच ‘पुलं’, ‘गदिमा’ आणि ‘बाबूजी’ या प्रतिभावंतांना ‘वंदे मातरम’मध्ये एकत्र आणले. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी सेटवर लागणाऱ्या गोष्टी हे प्रतिभावंत आपापल्या घरातून घेऊन येत. चित्रपटाचे दिग्दर्शक राम गबाले यांनी या चित्रपटाची रिळे गांधीहत्येनंतरच्या उसळलेल्या दंगलीत वाचवली,’ अशा अनेक आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी ‘पुलं’, ‘गदिमा’, ‘बाबूजी’ आणि मनःशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

लोणावळ्यातील मनःशक्ती प्रयोगकेंद्र, महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस प्रमुख पाहुणे होते. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, ‘गदिमां’चे नातू सुमित्र माडगूळकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम मनःशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, विश्वस्त गजानन केळकर, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना फडणीस म्हणाले, ‘स्वामी विज्ञानानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे पु. रा. भिडे हे अलौकिक प्रतिभावंत होते. त्यांच्या मनःशक्ती मासिकासाठी मी चित्रे काढली. ‘पुलं’, ‘गदिमा’, ‘बाबूजी’ आणि स्वामी विज्ञानानंद या चारही प्रतिभावंतांचा मला जवळून सहवास लाभला. सुधीर फडके यांच्या साहित्य परिषदेत झालेल्या विवाह सोहळ्याला मी उपस्थित होतो.’

‘मसाप’चे प्रा. जोशी म्हणाले, ‘‘पुलं’, ‘गदिमा’, ‘बाबूजी’, स्वामी विज्ञानानंद यांची सर्जनाची क्षेत्रे वेगवेगळी असली, तरी त्यांच्यात सुसंवाद होता. ‘वंदे मातरम’ चित्रपटाचा काळ हा सर्वांच्याच उभारणीचा काळ होता. या काळातले या दिग्गजांमधले स्नेहबंध निकोप होते. जे करायचे ते उत्तम या ध्यासातूनच या मंडळींकडून उत्तम कलाकृती निर्माण झाल्या.’

या प्रसंगी राजीव बर्वे, अंजली मालकर, शाहीर हेमंत मावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘वंदे मातरम’ चित्रपटातील गीते सादर केली, तर प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी ‘वंद्य वंदे मातरम’ हे गीत सादर केले. डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link