पुणे : ‘केवळ वीस लाख लोकवस्तीच्या नागालँडप्रमाणे ईशान्य भारतातील इतर सर्व राज्येही निसर्गसमृद्ध आहेत. भारतातील पर्यटकांना जगातील पर्यटन स्थळे माहीत असतात; पण आपल्या ईशान्य भारतातील असंख्य स्थळांची त्यांना माहितीही नसते. येथील नागरिकांना भारताविषयी प्रेम वाटावे याबरोबरच आपण या देशाचाच एक भाग आहोत ही भावना त्यांच्या मनात रुजवायची असेल, तर केवळ पर्यटक म्हणून नव्हे तर शिक्षण, उद्योग, व्यापार यासाठी या राज्यांकडे पहा,’ असे आवाहन नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी केले. फुलगाव येथील ‘ईश्वरपुरम’ वसतिगृहातील नागालँडच्या वीस विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले असताना ते बोलत होते.
राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी स्वत: निवड करून नागालँडमधील वीस विद्यार्थ्यांना ‘ईश्वरपुरम’ येथे शिक्षणासाठी पाठविले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ते एकरूप व्हावेत आणि शिक्षणानंतर त्यांनी पुन्हा आपल्या प्रदेशात जाऊन व्यवसाय-उद्योग करावा या संकल्पनेतून हे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. वाघोली, येरवडा परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे या विद्यार्थ्यांना स्वीकारले आहे. वर्षभर अनेक उपक्रमांच्या निमित्ताने हे विद्यार्थी स्थानिक पालकांच्या घरी जाऊन उत्सवांचा आनंद घेत असतात.
या कार्यक्रमासाठी उद्योग क्षेत्रातील अधिकारी, संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. या सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी ‘टॅब कॅपिटल’चे कार्यकारी संचालक अभय भुतडा यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे गणवेश आणि साहित्य, तर रोटरी क्लब, भारत विकास परिषद अशा अन्य संस्थांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय साहित्य भेट दिली.
या वेळी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी ‘ईश्वरपुरम्’ मधील कला, क्रीडा आणि अभ्यासातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी चार लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश संस्थेचे कार्यवाह मुकुंद गोडबोले यांच्याकडे सुपूर्त केला. प्रतिवर्षी या रक्कमेच्या व्याजामधून विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतील.
संस्थेच्या प्रस्तावित चार मजली इमारतीच्या उभारणीसाठी वास्तुविशारद कैलास सोनटक्के यांनी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरणही या वेळी करण्यात आले;तसेच संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ जोशी यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कारही करण्यात आला. संस्थेचे संचालक विनीत कुबेर, प्रशांत जोशी, आमदार दीपक पायगुडे, स्नेहल दामले आणि विद्यार्थ्यांचे पालक या वेळी उपस्थित होते.