Next
‘मुख्यमंत्री सचिवालयातील आदरातिथ्यावरील खर्च पूर्वीसारखाच’
प्रेस रिलीज
Saturday, March 31, 2018 | 12:29 PM
15 0 0
Share this story

आशीष शेलारमुंबई : ‘मुख्यमंत्री सचिवालयात आदरातिथ्यावर केलेल्या दरवर्षीच्या खर्चाची आकडेवारी पाहिली, तर ही सरासरी आधीच्या सरकराच्या कार्यकाळात होती तशीच आहे. असे असताना काँग्रेसचे बेताल नेते संजय निरूपम हे बरळतात आणि त्याचीच री महाराष्ट्रातील ‘जाणते’ नेतृत्त्व म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते सन्माननीय शरद पवारही ओढतात, याचे नवल वाटते,’ असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

‘एकतर हा खर्च केवळ मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाचा नाही, तर सह्याद्री, वर्षा, नागपुरातील रामगिरी आणि हैदराबाद हाऊस यांचा एकत्रितपणे आहे. तो  केवळ चहापानाचा नाही, तर विविध विभागांच्या घेतल्या जाणाऱ्या बैठकींचा चहा, नाश्ता, सत्कार-स्वागतासाठी लागणारी सामुग्री, पुष्पगुच्छ, वेळोवेळी विदेशी शिष्टमंडळांसाठी आयोजित केले जाणारे आदरातिथ्य इत्यादींचा एकत्रित आहे. दुसरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात बहुतेक वेळी परदेशातील शिष्टमंडळाच्या बैठकी या पंचतारांकित हॉटेल्समध्ये व्हायच्या, त्या आता सह्याद्रीला होत आहेत,’ असे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
 
शेलार यांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ वर्षनिहाय खर्चाची आकडेवारी प्रस्तुत केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. 
२०११-१२    १,१६,६८,४६८
२०१२-१३    १,१५,९१,६८३
२०१३-१४    १,६०,४२,७२७
२०१४-१५    १,१४,२५,८११ (काँग्रेस-राष्ट्रवादीच्याकाळापुरता)
२०१५-१६    ५७,९९,१५६
२०१६-१७    १,२०,९२,९७२
२०१७-१८    ३,३४,६४,९०५

‘सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, यातील २०१७-१८ या वर्षांत जे देयक अदा करण्यात आले, तो खर्च दाखविण्यात आला आहे. याचा अर्थ ती संपूर्ण रक्कम त्या वर्षातील नाही, तर गेल्या वर्षीची रक्कमसुद्धा त्यात अंतर्भूत आहे. त्याची नेमकी आकडेवारीसुद्धा आपण लवकरच जाहीर करू. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून बैठकींची वाढलेली संख्या आणि विविध वस्तुंच्या दरांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊनसुद्धा, हा खर्च सरासरी सामान्य आहे. त्यामुळे विरोधकांनी या विषयावर फालतू राजकारण करणे बंद करावे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झालेला खर्चसुद्धा मी मांडला आहे. आता मला माहिती नाही, असे शरद पवार म्हणू शकत नाहीत. त्यांना खरोखर माहिती नसेल, तर त्यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती. पण, सोयीचे प्रश्न विचारून माहिती अधिकारातून माहिती घ्यायची आणि सरकारविरूद्ध काहीच सापडत नाही म्हणून, असे खालच्या पातळीचे राजकारण करायचे, हा प्रकार अतिशय घृणास्पद आणि विरोधकांची पातळी किती घसरली हेच दर्शविणारा आहे,’ असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link