Next
निसर्गरम्य, ऐतिहासिक हावेरी जिल्हा
BOI
Wednesday, July 11, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

तारकेश्वर मंदिर
कर्नाटकात पर्यटनासाठी जायचं म्हटलं, तर बेंगळुरू किंवा म्हैसूर या दोन ठिकाणांची नावं पटकन कोणाच्याही तोंडात येतात; पण त्यापलीकडेही कर्नाटकात बरंच काही पाहण्यासारखं आहे. म्हणूनच ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण फिरणार आहोत कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळी...
.........
कर्नाटकात धारवाडच्या पुढे गेल्यावर हावेरी जिल्हा लागतो. या जिल्ह्यात अनेक किल्ले, मंदिरे आणि अभयारण्ये आहेत. या जिल्ह्यात ५० ठिकाणे अशी आहेत, की ती इतिहासाशी, कलेशी, वास्तुशास्त्राशी आणि पौराणिक कथांशी निगडित आहेत. खंडोबाच्या मल्हार पुराणात येथील ठिकाणांचा उल्लेख आहे. या परिसरात कापूस, ज्वारी, नारळ, रेशीम, लाल मिरची आदी पिके घेतली जातात.

हनगलपासून (हंगल) सुरुवात करू या. एके काळी हनगल ही कदंब राजांची राजधानी होती. इ. स. ४८५ ते इ. स. ११००पर्यंत येथे कदंब राजे राज्य करीत होते. त्यांचे गोवा व कोकणावरही वर्चस्व होते. इ. स. १०३१मध्ये होयसळांचे राज्य आले, १०६१मध्ये शिलाहार राजांनी हनगलवर कब्जा केला, तर इ. स. १२००मध्ये चालुक्यांची तेथे सत्ता आली. त्यानंतर आदिलशहा आणि नंतर मराठे, अशी सत्तांतरे होत गेली. सरतेशेवटी इ. स. १८८०मध्ये धोंडोपंत गोखले सरदार यांच्याकडून इंग्रजांनी हनगल ताब्यात घेतले. हावेरी हायवेवर धारवाडहून येताना हंगल लागते.

कमलपुष्पाचे छततारकेश्वर मंदिर : हनगल येथील तारकेश्वर मंदिर हे वास्तू व शिल्पकलेतील आश्चर्यच म्हणावे लागेल. चालुक्य राजवटीत साधारण इ. स. १०५० ते इ. स. १२०० या कालावधीत हे मंदिर बांधले गेले. होयसळ आणि चालुक्य पद्धतीचे हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा लाजवाब नमुना आहे. याचा बाह्य भाग व शिखरे नगर व द्रविड शैलीत आहेत. या देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टकोनी, ३० फूट व्यासाच्या कमलपुष्पाचे एका मोठ्या पाषाणातील छत. हे शिल्प आठ खांबांवर खुबीने बसविले आहे. यातील नक्षीकाम अत्यंत बारीक आहे. त्याच्याकडे बघताना मान नक्कीच दुखते; तरीही त्याकडेच पाहत राहिले जाते. मंदिरातील स्तंभ नक्षीकाम केलेले असून, मंदिराजवळच नंदीसाठी १२ खांबांवरील छपरं असलेला कक्ष आहे. उत्तरेला गणेशाचे मंदिर आहे. तेथे धार्मिक, तसेच युद्धाचेही प्रसांग कोरलेले दिसतात. तसेच कानडी भाषेत त्याचे वर्णनही आहे.

जैन मंदिरहनगल किल्ला : या किल्ल्यावर इ. स. १०५०मधील जैन मंदिर आहे. त्यामध्ये फुले, फुलांच्या माळा, प्राणी व देवतांची शिल्पे आहेत. या मंदिराची दुरुस्ती आवश्यक आहे. हंगल परिसरात अनेक पुरातन गोष्टी दिसतात. पूर्वीच्या काळचे गाडीला जोडायचे दगडी चाकही येथे पाहायला मिळते. किल्ल्यात वीरभद्र मंदिरही आहे.

बिल्लेश्वर मंदिरबिल्लेश्वर मंदिर : अनेकेरे तलावाच्या काठावर हे मंदिर आहे. हा तलाव हत्ती तलाव म्हणूनही ओळखला जातो. हे होयसळ पद्धतीचे मंदिर असून, तेथे रती, मदनाच्या मूर्ती आहेत. तसेच मेंढ्याचे डोके असलेल्या दक्ष मूर्तीही आहेत. मंदिराच्या शिखरावर कोरीव काम आहे.


सिद्धेश्वर मंदिरहावेरी : हे जिल्ह्याचे ठिकाण असून, पुणे बेंगळुरू महामार्गावर आहे. येथील सिद्धेश्वर मंदिर इ. स. १२००मध्ये चालुक्य शैलीत बांधलेले आहे. मंदिरात अनेक सुंदर शिल्पे आहेत. येथे उमामहेश्वर, गणपती, विष्णू, तसेच कार्तिकेयाची शिल्पे आहेत. तसेच कानडी भाषेतील शिलालेख आहेत.

गलगनाथगलगनाथ : हावेरीपासून पूर्वेकडे तुंगभद्रेच्या काठावर, ३९ किलोमीटरवर हे गाव आहे. येथे वरदा आणि तुंगभद्रा या नद्यांचा संगम होतो. इ. स. १०८०मधील चालुक्य शैलीतील गलगेश्वर मंदिर हे येथील वैशिष्ट्य. येथील शिवलिंगाला स्पर्शलिंग म्हणतात. तसेच गजाननाची मूर्तीही तेथे आहे. या मंदिराचे शिखर वेगळ्याच प्रकारचे आहे. मंदिरातील शिल्पे खूप छान आहेत. येथे एक शिलालेखही असून, त्यामध्ये नृत्य व संगीताची माहिती दिली आहे.

राणीबेन्नूर अभयारण्यराणीबेन्नूर अभयारण्य : हे अभयारण्य काळवीटांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच रानडुकरे, माकडे, मुंगुस आदी प्राणीही येथे आढळतात. राणीबेन्नूरपासून हे अभयारण्य सात किलोमीटरवर आहे. ११९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे अभयारण्य विस्तारलेले असून, सहा हजारांहून अधिक हरणे येथे आहेत. हरणांचे कळप पाहण्यासाठी आबालवृद्धांची येथे गर्दी होत असते. पुणे-बेंगळुरू हमरस्त्यापासून जवळच हे अभयारण्य आहे. 

मुक्तेश्वर मंदिरमुक्तेश्वर मंदिर : राणीबेन्नूरजवळ चौदय्यादानापूर नावाचे एक छोटे गाव आहे. तेथे मुक्तेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील कलाकुसर अत्यंत देखणी आहे. मंदिराच्या भिंती, छत व खांब नक्षीकामाने ओतप्रोत भरलेले आहेत. त्याला ज्वेलरी आर्ट असे म्हणता येईल. ११व्या शतकात चालुक्य राजवटीत हे देऊळ बांधले गेले. कलचुरी पद्धतीने हे देऊळ पर्यटकांना फारसे माहिती नाही. जवळच नरसापूर येथील नरसिंह मंदिरही बघण्यासारखे आहे. तेथे कानडी शिलालेखही आहेत.

बंकापूरबंकापूर : हायवेला लागून असलेले हे ऐतिहासिक ठिकाण असून, ते चालुक्यांच्या अखत्यारीत होते. प्रसिद्ध कन्नड कवी कनकदास यांचा जन्म बंकापूरमधील. ते अतिशय निःस्वार्थी होते. त्यांना सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक घडा सापडला होता. त्यांनी त्याच्या मालकाचा शोध घेतला; पण त्यांना तो सापडला नाही. ते धन स्वतःसाठी वापरण्याचा सल्ला अनेकांनी त्यांना दिला; पण त्यांना ते पटले नाही. त्यांनी ते गोरगरिबांसाठी खर्च केले. कनकदास यांनी नळ-दमयंतीवर सुंदर आख्यान लिहिले असून, मोहनतरंगिणी हे त्यांचे काव्य कानडी भाषेतील प्रमुख काव्य समजले जाते.

बंकापुरात एक किल्ला असून, अनेक मंदिरेही होती; पण ती बहामनी आक्रमणात नष्ट झाली. इ. स. ११००मधील चालुक्य शैलीतील नगरेश्वर मंदिर त्यातल्या त्यात बचावले. त्यातील ६८ खांबांचे सभागृह खूपच बघण्यासारखे आहे. हे मंदिर पूर्वी जैन साधूंच्या अभ्यासाचे ठिकाण होते. येथे कांडी भाषेतील एक शिलालेखही आहे.

मोरांचे अभयारण्यमोरांचे अभयारण्य : बंकापूर किल्ल्यातील १३६ एकरावर असलेले मोर उद्यान बघण्यासारखे आहे. अन्य पक्षी व मोरांचा नाच बघितल्याशिवाय तुम्ही नक्की परत येणार नाही. हे ठिकाण पुणे-बेंगळुरूपासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावर आहे.
ब्याडगी मिरचीब्याडगी : हे गाव येथील वैशिष्ट्यपूर्ण लाल मिरचीसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. या गावाच्या नावावरून तेथील विशिष्ट प्रकारच्या मिरचीला ब्याडगी मिरची असे नाव पडले. ब्याडगी मिरचीसाठी येथे २० ‘कोल्ड स्टोरेज’ उभारली आहेत.

देवरगुड्डा : पौराणिक कथेनुसार, मल्हार पुराणातील मणिमल्ल्या व मल्लिमासूर या

देवरगुड्डादोन राक्षसांना येथे मारण्यात आले होते. गुंटला ते राणीबेन्नूर रोडवर खिरे मल्लापुरा गाव आहे. तेथून पुढे देवरगुड्डा गाव म्हणजे देवाचा डोंगर असून, या डोंगरावर मालतेश मल्हारी म्हाळसाकांत हे देऊळ आहे. मणिमल्ल्या व मल्लिमासूर या दोन राक्षसांची स्मारके एक मैलावर आहेत. राक्षसांच्या नावावरून मंदिरांना मल्लेश मल्हारी मार्तंड व भैरव मालतेश अशी नावे पडली. हे देऊळ हेमाडपंती असून, एक हजार वर्षांपूर्वीचे आहे. या ठिकाणी पंचकमिटी असून, लोकांच्या देणगीवर देवस्थानाचा खर्च चालतो. चंपाषष्ठी,  दसरा व माघ पौर्णिमा या तिथींना येथे वार्षिकोत्सव होतात. रविवार, सोमवार व पौर्णिमेला छबिना निघतो. येथे लग्न,  मुंज इत्यादी धार्मिक कार्येही होतात. देवस्थानची वार्षिक उलाढाल १५ लाख रुपये असून, भक्तांना राहण्यासाठी धर्मशाळाही आहेत. येथील मुख्य नैवेद्य पुरणाच्या कडबूचा असतो.

कसे जायचे?
जवळचा विमानतळ हुबळी – ७० किलोमीटर. जवळचे रेल्वे स्टेशन हावेरी. हे ठिकाण पुणे-बेंगळुरू हमरस्त्याला जोडलेले. हावेरी येथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते. जाण्यासाठी चांगला कालावधी ऑक्टोबर ते जून हा असतो; मात्र फेब्रुवारीपर्यंत अधिक चांगला असतो. हुबळी येथे राहून दोन दिवसांत ही ठिकाणे बघता येतात.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

बंकापूर

(निसर्गरम्य, ऐतिहासिक हावेरी जिल्ह्याची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anand vaidy About
Galagnath. 5 rivers Cha sangam aahe.tung,bhadra,varada,Dharma,n kumadwati. Purushbhar height che shivling aahe.dattapaduka place.information Chan dili aahe.
1
0
Milind Lad About
छान लेख!!!
2
0
सतीश चौगुले About
खूप सुंदर माहिती.
2
0

Select Language
Share Link
 
Search