Next
हिमालयातील ‘ला अल्ट्रा’मध्ये सह्याद्रीचा झेंडा
३३३ किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करणारे आशिष कासोदेकर पहिले महाराष्ट्रीय
प्राची गावस्कर
Monday, September 10, 2018 | 06:05 PM
15 0 0
Share this article:

सर्वांत उंच तीन खिंडींतील ३३३ किलोमीटरचे अंतर तीन दिवसांत पूर्ण करावयाची असलेली जगातील सर्वांत अवघड समजली जाणारी ‘ला अल्ट्रा’ ही धावण्याची स्पर्धा पुण्याच्या आशिष कासोदेकर यांनी पूर्ण केली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले महाराष्ट्रीय ठरले आहेत. सह्याद्रीचा झेंडा पुन्हा हिमालयाच्या माथ्यावर झळकला आहे. मनात आणले, तर सर्व प्रतिकूलतेवर मात करता येते हे आशिष कासोदेकर यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांच्या या प्रेरणादायी यशाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित असलेला हा लेख...
.....
आशिष कासोदेकर‘ला अल्ट्रा’ ही जगातील सर्वांत खडतर स्पर्धांपैकी एक स्पर्धा मानली जाते. यात तब्बल ३३३ किलोमीटरचे अंतर हिमालयातील डोंगर-दऱ्यांतून पार करावयाचे असते. त्यात जगातील सर्वांत उंच अशा तीन खिंडींचा समावेश आहे. या खिंडी समुद्रसपाटीपासून १७ हजार ४०० फुटापेक्षा अधिक उंचीवर असून, तिथे हवेतील ऑक्सिजनची पातळी साठ टक्क्यांपेक्षा कमी असते. म्हणूनच ही स्पर्धा म्हणजे मानवी सहनशक्तीचे एक प्रतीक आहे. १११, २२२ आणि ३३३ किलोमीटर अशा तीन टप्प्यांत ही स्पर्धा होते. आतापर्यंत ३३३ किलोमीटरची संपूर्ण स्पर्धा फक्त दहा स्पर्धकांनी पूर्ण केली होती आणि ते सर्व विदेशी होते. यंदाची स्पर्धा मात्र ऐतिहासिक ठरली. २३ ते २६ ऑगस्ट २०१८दरम्यान आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा पुण्याच्या आशिष कासोदेकर यांनी ७१ तास ५९ मिनिटे ३१ सेकंदांमध्ये पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते तिसरे भारतीय आणि पहिले महाराष्ट्रीय आहेत. 

ही स्पर्धा दिल्लीतील क्रीडा क्षेत्रातील डॉ. रजत चौहान आयोजित करतात. जगात अनेक ठिकाणी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात; पण भारतात अशी स्पर्धा घेतली जात नव्हती. हिमालयात असा आव्हानात्मक मार्ग असल्याने अशी स्पर्धा घेता येणे शक्य आहे, हे लक्षात आल्याने त्यांनी सात-आठ वर्षांपूर्वी ही स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यात परदेशी स्पर्धकच मोठ्या संख्येने भाग घेत होते. तिथे आधीपासून अशा स्पर्धांसाठी पोषक वातावरण असल्याने त्यांना या स्पर्धांची सवय असते. त्यामुळे आतापर्यंत परदेशी स्पर्धकांचेच या स्पर्धेवर वर्चस्व होते. ते आशिष कासोदेकर यांनी मोडीत काढले आहे. 

गेल्या दोन-तीन वर्षांत भारतीयांचाही सहभाग वाढला आहे; मात्र १११ किंवा २२२ किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेण्याचे प्रमाण अधिक आहे. ३३३ किलोमीटरच्या स्पर्धेत या वर्षी पाच भारतीय स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी एक कासोदेकर होते. त्यांच्यासह दिल्लीचे मुनीष आणि मनदीप अशा तिघांनी ही स्पर्धा पूर्ण केली.  
२३ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता नुब्रा खोऱ्यातील सुमुर गावातून ही स्पर्धा सुरू झाली. ३३३ किलोमीटरच्या पाच स्पर्धकांबरोबर २२२ आणि १११ किलोमीटर धावणाऱ्या एकूण ५१ धावकांनी धावायला सुरुवात केली. १११ किलोमीटरचे अंतर सर्व धावकांनी वीस तासांत पूर्ण केले, तर २२२ किलोमीटरचे अंतर ४८ तासांत पूर्ण केले. १११ किलोमीटरचे अंतर पार करताना धावकांनी जगातील सर्वांत उंच अशी ‘खारदुंग ला’ खिंड पार केली, तर २२२ किलोमीटरच्या धावकांनी सर्वांत कठीण अशी ‘वारी ला’ खिंड पार केली. त्यानंतर फक्त पाच धावकांनी सर्वांत क्रूर असा ३३३ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यास सुरुवात केली.

दोन दिवसांत २२२ किलोमीटर पार केल्यावर अजून १११ किलोमीटर अंतर आणि तेही ‘तांगलांग ला’सारख्या सुमारे अठरा हजार फूट उंचीच्या भयानक खिंडीतून धावणे, ही अत्यंत कठीण गोष्ट होती. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही क्षमतांचा कस पाहणारे हे अंतर होते; पण आशिष कासोदेकर यांचा निर्धार एकदम पक्का होता. त्यामुळे त्यांनी स्पर्धेची वेळ संपण्याला अवघी ३१ सेकंदे बाकी असताना स्पर्धेचे अंतिम स्थान गाठले. ‘तांगलांग ला’ खिंडीनंतर वीस किलोमीटर अंतरावरील देब्रिनग गावात हे अंतिम स्थान होते. एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेल्यामुळे ‘ला अल्ट्रा’मध्ये महाराष्ट्राची आणि पुण्याची मान गर्वाने ताठ झाली.

खेळांची आवड असलेल्या कासोदेकर यांना नेहमीच अशक्यप्राय गोष्टी करण्याचे वेड आहे. ते पर्यटन व्यवसायात कार्यरत असून, लेह लडाख, हिमालयातील आव्हानात्मक पर्यटनस्थळांच्या सहली करण्यावर त्यांचा भर आहे. क्रीडा क्षेत्रातही ते सक्रिय असून, मॅरेथॉनमध्ये ते नियमित सहभागी होतात. पुण्यात लहान मुलांसाठी मॅरेथॉन आयोजित करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. २०१६-१७मध्ये ते ‘ला अल्ट्रा’च्या १११ किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. ती स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्यावर, त्याच वेळी त्यांनी २२२ऐवजी थेट ३३३ किलोमीटरच्या स्पर्धेत भाग घेण्याचे पक्के केले होते. त्यानुसार त्यांनी गेले वर्षभर या स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले होते. याकरिता धावण्याचा सरावही त्यांनी नित्यनेमाने केलाच; पण रात्री, ऑक्सिजन कमी असलेल्या उंचावरील ठिकाणी धावण्याचा सराव करणे महत्त्वाचे होते. त्याकरिता त्यांनी पुणे ते पाचगणी असा सराव केला. रात्री पुण्यातून धावत निघायचे आणि सकाळी पाचगणीला पोहोचायचे. हिमालयातही त्यांनी काही ठिकाणी धावण्याचा सराव केला. स्पर्धेदरम्यान कधी, कुठे थांबायचे, कधी जेवण, पाणी, विश्रांती घ्यायची याचे आधीच नियोजन केले जाते. कासोदेकर यांनी नऊ वेळा थांबण्याचे आणि विश्रांती घेण्याचे नियोजन केले होते; पण प्रत्यक्षात त्यांनी तीन दिवसांत केवळ दीड तास झोप घेतली. 

या स्पर्धेसाठी आयोजक सर्व सुविधा पुरवत असले, तरी स्पर्धकांना भाग घेण्यासाठी प्रवेशशुल्क स्वतः भरावे लागते. ते खूप असते; पण तरीही यात भाग घेण्याने काय साध्य झाले, असे विचारले असता, कासोदेकर म्हणाले, ‘आपण स्वतःची फार कमी शक्ती वापरतो. आपण जास्त शक्ती वापरली, तर मनात आणले तर आपण काहीही करू शकतो, हेच यातून दाखवून द्यायचे होते.’ 

या स्पर्धेचे वैशिष्ट्य काय आणि स्पर्धा पूर्ण केल्यानंतर काय वाटले असे विचारले असता कासोदेकर म्हणाले, ‘हिमालय ही अशी जागा आहे, जिथे तुम्ही स्वतःला भेटता. या वाटा, दऱ्या-डोंगर तुम्हाला साद घालतात. धावत असताना तुमचा तुमच्याशी संवाद घडतो. तुमची मानसिक ताकद आणखी वाढते. अशी खडतर स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मिळणारे समाधान शब्दांत सांगता येणार नाही.’ 

‘जगात अनेक ठिकाणी होणाऱ्या अशा स्पर्धा भारतातही होतात, या उद्देशाने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भाग घेणारे परदेशी नागरिकच अधिक होते. त्यामुळे भारतीयही यात सहभागी होऊन जिंकू शकतात, हेही मला जगाला दाखवून द्यायचे होते,’ असेही कासोदेकर म्हणाले. 

कासोदेकर यांच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!

(आशिष कासोदेकर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘ला-अल्ट्रा’प्रमाणेच ट्रायथलॉन हीदेखील शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा. ती तब्बल २१ वेळा जिंकून ‘आयर्नमॅन’ बनलेले डॉ. कौस्तुभ राडकरही पुण्याचेच. त्यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search