Next
‘अभ्यंकर-कुलकर्णी’मध्ये ‘छंदोत्सव २०१८’चे आयोजन
BOI
Tuesday, December 11, 2018 | 04:03 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या अभ्यासेतर उपक्रमांचा मानबिंदू असलेला, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा ‘छंदोत्सव’ हा सांस्कृतिक युवा महोत्सव १८ ते २० डिसेंबर २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व इतर कौशल्यांच्या विकासामध्ये ‘छंदोत्सवा’चे मोठे योगदान आहे. या युवा महोत्सवात आपली कला सादर करून रत्नागिरीतील अनेक कलाकार कला क्षेत्रातील विविध स्तरांवर यशस्वी होऊन नावारूपाला आले आहेत. या युवा महोत्सवाच्या अनुषंगाने गीतगायन, समूहनृत्य आणि वैयक्तिक नृत्य प्रकारांतील प्राथमिक निवड फेर्‍या नुकत्याच झाल्या आहेत. यातून निवड झालेले विद्यार्थी कलाकार आपल्या कलांचे अंतिम सादरीकरण ‘छंदोत्सवा’दरम्यान करतील. तीन दिवस चालणार्‍या या युवा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही विद्यार्थीच करणार आहेत. यासाठी त्यांना मार्गदर्शनपर सूत्रसंचालन कार्यशाळा आयोजित केली आहे.

१८ डिसेंबरला सकाळी आठ वाजता शोभायात्रेने युवा महोत्सवाची सुरुवात होईल. महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर होणाऱ्या या शोभायात्रेत लेझीमपथक, ढोलपथक, झांजपथक, बँडपथक, विविध प्रकारची वेशभूषा केलेले विद्यार्थी व वर्गप्रतिनिधींचे पथक आदींचा सहभाग असेल. पहिल्या दिवशी फूड फेस्ट व कलाप्रदर्शनांचे उद्घाटन होईल. पर्यावरण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘आपले कोकण’ आणि ‘छाया-प्रकाशाचा खेळ’ या विषयावर आधारित रंगावली, चित्रकला व छायाचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टर मेकिंग स्पर्धेसाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ हा विषय असेल. विज्ञानाधारित रांगोळीमध्ये विविध शैक्षणिक आकृत्यांचे सादरीकरण विद्यार्थी करतील. खातू नाट्यमंदिर येथे रंगमंचीय आविष्कार होणार असून, यामध्ये गीतगायन स्पर्धा व वैयक्तिक नृत्य स्पर्धांचा समावेश आहे.

१९ डिसेंबरला श्यामराव करंडक एकांकिका स्पर्धा रंगणार असून, या स्पर्धेसाठी या वर्षी ‘शोध’ असा शब्द देण्यात आला आहे. स्पर्धेतील सर्व एकांकिकांचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना व ध्वनीसंयोजन या सर्व तांत्रिक बाजू विद्यार्थीच सांभाळतात हे या स्पर्धेचे वैशिष्ट आहे. याखेरीज फॅन्सी ड्रेस सादरीकरण, कवितावाचन, मिमिक्री, वाद्यवादन आदी कार्यक्रमांचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यात आला आहे.

२० डिसेंबरला श्यामराव करंडक स्पर्धेच्या उर्वरित एकांकिका व समूहनृत्य स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ होईल. ‘छंदोत्सवा’च्या व्यासपीठावरून आपली रंगमंचीय कारकीर्द घडविणार्‍या विद्यार्थ्यांना या वेळी ‘घंटानाद’ सन्मान प्रदान केला जाईल. याशिवाय ‘सेल्फी इन कॉलेज कँपस’, ‘सोशली युवर्स’ अशा विद्यार्थीप्रिय कार्यक्रमांचेही आयोजन या युवा महोत्सवात करण्यात आले आहे.

‘छंदोत्सव २०१८’च्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. सुशील वाघधरे, पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ, छंदोत्सव प्रमुख प्रा. श्रीकांत दुदगीकर यांसह विविध विभागांचे प्रमुख, सर्व प्राध्यापक सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link