Next
वनौषधी लागवडीला प्रोत्साहन आणि गुणवत्ता नियंत्रणाची आवश्यकता
तज्ज्ञांचे मत
BOI
Monday, August 19, 2019 | 12:44 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
‘बदललेली जीवनशैली, वाढते आजार, महागडे अॅलोपॅथिक उपचार आणि त्यांचे दुष्परिणाम पाहता पुन्हा एकदा नैसर्गिक जीवनपद्धतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागरण सुरू आहे; मात्र याचा गैरफायदा काही निव्वळ व्यावसायिक वृत्तीचे लोक घेत असल्याने, सरकारने वनौषधींसाठीही गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करावी,’ अशी मागणी डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी केली. कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट व मैत्री फाउंडेशनतर्फे जागतिक जडीबुटी दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात औषधी वनस्पतींची रोपे आणि रानभाज्यांचे वाटप करण्यात आले. 

‘आज वनौषधींवर मोठ्या प्रमाणात बोलले जाते; मात्र त्याचा अजूनही पुरेसा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. एकट्या कोकणात जवळपास २,७०० प्रकारच्या वनौषधी आढळतात. औषध निर्मितीत त्यांची मोठ्या प्रमाणात गरज असते; मात्र या वनस्पतींची शास्त्रशुद्ध लागवडच होत नसल्याने मागणी असूनही पुरवठा होत नाही. कागदोपत्री अनेक योजना आहेत. सरकारने त्यांचा प्रचार, प्रसार केला आणि वनौषधींच्या शेतीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले तर औषधनिर्मितीची गरज भागेल. शिवाय नोकरीच्या शोधात गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतरही थांबवता येईल,’ असे प्रतिपादन मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा व ज्येष्ठ लेखिका सृष्टी अंकोलेकर-गुजराथी यांनी केले.

‘असे करताना हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या वनौषधी त्यांच्या शुद्ध स्वरूपात जपणे आवश्यक आहे. नफेखोरीसाठी आज कोणत्याही उत्पादनाला हर्बलचे लेबल लावले जाते. वनौषधींची लागवड करताना सर्रास रसायनांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत जडी-बुटींचे मूळ औषधी स्वरूप टिकविणे अशक्य आहे. अन्नात रासायनिक विष कालवले जात आहे. आता निसर्गदत्त औषधेही विषारी करू पाहणाऱ्या या वृत्तीवर सरकारने वेळीच चाप लावायला हवा. वनौषधींच्या लागवडीत केवळ आणि केवळ नैसर्गिक घटकांचाच वापर व्हायला हवा,’ अशी आग्रही मागणी आर्य पंचगव्य चिकित्सालयाचे डॉ. श्रीविराज वर्मा यांनी केली. 

‘हजारो वर्षांची परंपरा आस्थेने जपणाऱ्यांची सध्या गरज आहे. वनौषधींकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता निसर्गदत्त देणगी म्हणून पाहायला हवे. वनौषधींच्या लागवडीसाठी रसायनांचा वापर टाळून जीवामृत आणि नैसर्गिक खतांचा वापर व्हायला हवा,’ असे आवाहन फाउंडेशनच्या कार्यवाह, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अनिता गायतोंडे व ट्रस्टच्या सहकार्यवाह प्रा. सायली फणसे यांनी केले. 

भारत स्वाभिमान ट्रस्टचे ठाणे जिल्हा पदाधिकारी डॉ. तुकाराम सावदेकर व नैसर्गिक शेतीतज्ज्ञ विश्वास पाटील यांनी अल्पमोली बहुगुणी अशा जीवामृताचे प्रात्यक्षिक या वेळी करून दाखवले व औषधी वनस्पतींची माहितीही सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पटेल यांनी, तर आभारप्रदर्शन ब्रँड कन्सल्टन्ट सुनील देवरुखकर यांनी केले. विश्वनिकेतन विद्या संकुलचे खजिनदार डॉ. अशोक जैन, माधवी लोकरे, व फिटनेस ट्रेनर गौरव देव यांच्या हस्ते विचरी, खुरासणी, भारंगी, ब्रह्मदंडी, फोडशी, शेवळं यांसारख्या रानभाज्यांचे वाटप या वेळी करण्यात आले. 

गोसेवा प्रसारक निर्मला पाध्ये, कुंदा वाटवे, स्वाती माणगावकर, सुषमा शिंदे, अमित पटेल, दीपक कुलकर्णी व डॉ. दीपक देशपांडे यांच्या हस्ते उपस्थितांना तुळस, कढीपत्ता, पळस, नागदोण, दुधणी, माका, ब्राह्मी, पुदिना, आंबेहळद, कोरपड, ओवा, आघाडा आदी वनौषधींचे वाटप करण्यात आले. 

या वेळी डॉ. विजयकुमार पोंक्षे, राजेंद्र पाटील, प्रवीण गावडे, वैष्णवी नवले, मनोज वैद्य, सुधीर बरडे, सुनील शेवडे, मृणाल इनामदार, सुनील आंबर्डेकर, विकास अभ्यंकर, शैलेश जोशी, ज्ञानेश्वर परब, डॉ. मनोहर अकोले, डॉ. तुकाराम सावदेकर, प्रसाद अग्निहोत्री, मंजिरी मांजरेकर, महेंद्र पाटील, दीपक देशपांडे, डॉ. दीपक कुलकर्णी, डॉ. नवनाथ दुधाळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘जडी-बुटी म्हटले की प्रत्येक वेळी बाजारात जाऊन अगम्य नावांची चूर्णे विकत घेण्याची गरज नाही. निसर्गवाचन शिकलो तर आपल्याच आजूबाजूला असलेल्या अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती कळतील. आपणच त्यांची काळजी घ्यायला हवी. आपल्या बाल्कनीत किंवा खिडकीच्या ग्रिलमध्येसुद्धा तुळस, दूर्वा. झेंडू, गुळवेल, पानवेल, जाई यांसारख्या वनस्पतींची सहज लागवड करता येईल. या वनस्पतींचे गुणधर्म आपण डोळसपणे जाणून घ्यायला हवेत. परंपरेने आपल्याकडे आलेला हा अनमोल ठेवा पुढील पिढीकडे हस्तांतरित करायला हवा,’ अशी अपेक्षा मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी गुजराथी यांनी व्यक्त केली. 

‘सरकारने वनौषधींच्या लागवडीसाठी प्रोत्साहनपर कर्जयोजना सुरू करायला हवी, जेणेकरून आयुर्वेदाचे प्रचारक आणि प्रेमीही या व्यवसायात येऊ शकतील, यासाठी सरकारला निवेदन देण्यात येणार आहे व त्याचा पाठपुरावाही करण्यात येणार आहे,’ असे पतंजली महिला समितीच्या प्रवक्त्या सुरेखा अभ्यंकर यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search