Next
‘सर्वांनी मिळून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला पाहिजे’
रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा तिसरा स्नेहमेळावा उत्साहात
BOI
Monday, December 10, 2018 | 02:43 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : ‘रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन संस्था सच्चा समाज निर्माण करण्याचे काम करत आहे. दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यावर भर देते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी समाज, शासकीय यंत्रणा, शासन-प्रशासनाने आत्मविश्‍वास दिला पाहिजे,’ असे प्रतिपादन डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.

रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा तिसरा स्नेहमेळावा शहरातील साई मंगल कार्यालयात नऊ डिसेंबर २०१८ रोजी झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नाकाडे, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, खजिनदार शशाक जडे, गंगाराम रसाळ, माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन बापट, सुवर्णा येरीम, व्यवसाय मार्गदर्शक दीपाली राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे हे स्वतः अपघातामुळे अपंग झाले; पण त्यांनी रडत न बसता आपल्यासारख्या अपंग बांधवांना प्रेरणा देऊन नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी प्रेरित केले.वैद्यकीय व्यवसायात आलेल्या अनुभवाचे कथन करताना डॉ. परकार म्हणाले, ‘माझ्या हॉस्पिटलमध्ये हातावर चालत चालत एक मुलगी आली. मला प्रश्‍न पडला, की हिला तपासावे कसे? कारण बेडची उंची साडेतीन फूट. नंतर तीच म्हणाली की, मी रुग्ण नाही हो, भावाला आणले आहे तपासण्यासाठी. हे ऐकून मी तिला सलाम केला आणि तिला गुरू मानले. ती हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मदतीसाठी येत असते.’

‘माझा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये होता. तो आजारी पडला त्या वेळी त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. हॉस्पिटलमधून घरी आणतेवेळी तिथल्या समाजकल्याण विभागातून वहिनीला फोन आला. तुमच्या पतीला चालता येणार नसल्याने घरात व्हीलचेअर फिरवता येईल, अशी रचना आहे का, याची पाहणी करण्यासाठी अधिकारी येणार आहेत. त्यानंतर अधिकार्‍यांनी पाहणी करून रचनेत काही बदल सांगितले. रुग्णांची अशी काळजी घेणारे शासन, प्रशासन आपल्याकडेही असणे आवश्यक आहे. त्यातूनच दिव्यांगांच्या मनात आत्मविश्‍वास निर्माण होईल,’ असे डॉ. परकार यांनी नमूद केले.तहसीलदार विजय दांडेकर यांनी शासनाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली; तसेच नाकाडे यांचे कौतुक करून स्वतः अपंगत्वावर मात करून ते चांगली संस्था चालवत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गजानन बापट यांनी अवयवदानाविषयी प्रबोधन केले.

‘समाजाची परतफेड करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. मला जगायचे आहे आई-वडिलांसाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी. मनुष्य देह एकदाच मिळतो त्यामुळे हे जीवन सार्थकी लावू या,’ असे आवाहन दिव्यांगमित्र किरण धनावडे यांनी केले.गंगाराम रसाळ यांनी ‘३५ वर्षे शासकीय नोकरीतून सेवा केली; पण या संस्थेत तीन वर्षे जी सेवा करत आहे, त्यातून समाधान मिळत आहे,’ अशी भावना व्यक्त केली. मनात अंधश्रद्धेला थारा करू नका, शरीराला दोष देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

मेंदी कलाकार रुखसार दावत म्हणाल्या, ‘माझे शिक्षण एमएपर्यंत झाले असून, राष्ट्रीय सेवा योजनेतही काम केले. पोस्टर मेकिंग, मेंदी स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळविली आहेत. सादिकभाईंशी ओळख झाल्यानंतर मी या संस्थेत काम सुरू केले. संकटाला सामोरे जाणे ही एक कला आहे आणि संस्थेमुळे ही कला मला साध्य झाली.’

माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी मंडणगड ते राजापूर या सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव कामानिमित्त रत्नागिरीत आल्यास त्यांच्या एक-दोन दिवस राहण्याची व जेवणाची सोय निवळी येथे माहेर संस्थेत करू, अशी ग्वाही दिली.नगरसेवक सोहेल मुकादम म्हणाले, ‘आपण किती जगलो ते महत्त्वाचे नाही, आपल्यामुळे किती लोकांच्या चेहर्‍यावर हसू आले, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला हे महत्त्वाचे. दिव्यांग बांधवांनी भावनिक विश्वात गुंतून उदास राहू नये. हे बांधव शरीराने दिव्यांग दिसले, तरी मनाने अपंग नाहीत. सादिकभाईंच्या कामामुळेच या संस्थेने खूप मोठी भरारी घेतली आहे. त्यांच्या जिद्दीने संस्था दिव्यांगांसाठी मोठी कामगिरी करत आहे. या सार्‍यांच्या जिद्दीला सलाम करतो.’

रत्नागिरी नगरपालिकेत तीन टक्के दिव्यांग निधीअंतर्गत ६६ जणांना व्यवसायासाठी साहित्य वाटप, घरघंटी, शिलाई मशीन, आइस्क्रीम फ्रिजरचे वितरण केल्याची माहिती नगरसेवक मुकादम यांनी या वेळी दिली.

पावस येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रगती खातू यांनी नाकाडे यांच्या कामाचे कौतुक केले.दरम्यान, एसटीमध्ये दिव्यांगांना आसन दिले जात नाही, जिल्हा परिषदेतून रेशन कार्डावर अपंग शिक्क्यासाठी डी फॉर्म उपलब्ध नाही, मदत निधीतील रक्कम ऑनलाइन जमा करावी, अशा मागण्या दिव्यांगांनी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांच्याकडे केल्या. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी रसाळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेसाठी काम करणार्‍या समिधा कुळ्ये, सुवर्णा येरीम, अविनाश भुवड, अशोक पांचाळ, संदेश भोसले, श्रद्धा आंब्रे, नितीन सावंत, किशोर भोसले, कल्पना सावंत, मारुती ढेपसे, संजय कदम, हेमलता साळवी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. म्हात्रे यांनी केले. उर्मिला विचारे यांनी सूत्रसंचालन केले. किरण धनावडे यांनी अहवाल वाचन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Priya berde About 250 Days ago
👍
0
0

Select Language
Share Link
 
Search